David Warner
David Warner Sakal
सप्तरंग

जिथं फुलं वेचली...

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात अगदी नाण्यासाराख्या ! डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाच्या मागेही काळोख असतो पण आपल्याला दिसते लखाखणारे तेज. आयपीएलचेही अगदी असेच आहे. पैसा, प्रसिद्धी आणि कमालीची लोकप्रियता म्हणजेच केवळ आयपीएल नाही. आयपीएल एखाद्या अप्सरेप्रमाणे आहे. तिच्याबरोबर खेळाडूंना रोमांन्स हवाहवासा वाटतो, पण त्यावेळी भानही ठेवणे तेवढेच गरजेचे असते जरा कोठे बिनसले तर पश्चात्तापाची वेळ येते. जेथे तुम्ही फुले वेचलेली असतात तेथेच गोवऱ्या वेचण्याची वेळ येते आणि ते फारच त्रासदायक असते. कारण म्हणतात ना, ९९ चांगल्या गोष्टी केल्या असतील पण एक वाईट गोष्टच अनेकांच्या लक्षात रहाते आणि ती बोचतही रहाते. हैदराबाद संघाचा माजी यशस्वी कर्णधार आणि सध्या संघातून वगळण्यात आलेला डेव्हिड वॉर्नर हेच अनुभवत आहे.

आयपीएलचे हे महाजाल २००८ पासून सुरू झाले. पहिल्या स्पर्धेपासून ते आत्तापर्यंत अनेक चांगले वाईट प्रसंग जवळपास प्रत्येकाने अनुभवले असतील. बीसीसीआयचे विद्यामान अध्यक्ष सौरव गांगुली अभिनेत्या शाहरुख खान याची मालकी असलेल्या कोलकाता संघाचा चेहरा होते. परंतु गांगुलीचा फॉर्म उतरला तेव्हा तो नकोसा झाला होता. पण ऑस्ट्रेलियाचा एकेकाळचा सुपरस्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला आयपीएलने ब्रम्हांडाची पूर्ण सफर करून आणली. ही आयपीएल कोणाही जिंको, कोणकोणते खेळाडू स्टार होवो, ते नावारुपाला येवो, परंतु वॉर्नर ही या स्पर्धेची दुसरी बाजू ठरली आहे

मुळात वॉर्नर ही एक वेगळी असामी आहे. ऑस्ट्रेलिया संघातून खेळताना त्याने अनेक अद्वितीय खेळी केलेल्या आहेत. भारताचा एक ऑस्ट्रेलिया दौरा असा होता की वॉर्नर द्विशतकांशिवाय हटतच नसायचा. शतकी खेळी केल्यानंतर खरं तर बॅट उचांवून आनंद व्यक्त केला जातो, पण वॉर्नर हवेत उंच उडत हेल्मेट उंचावायचा त्याची ती पोझ प्रतिस्पर्धी संघांना घायाळ करणारी असायची.

ऑस्ट्रेलियाकडून त्याला कर्णधारपद कधी मिळाले नाही, पण आयपीएलमध्येही तो हैदराबाद संघाचा चेहरा होता. २०१४ मध्ये तो या संघात आला आणि २०१८ मध्ये त्याने संघाला चॅम्पियन बनवले. हैदराबाद संघात तसे एकापेक्षा एक सरस खेळाडू नसतानाही सर्वांकडून सांघिक कामगिरी करून घेत त्याने हे भव्यदिव्य यश मिळवून दिले होते. ते २०१८ आणि आत्ता २०२१ या तीन वर्षांत वॉर्नर रावही झाला आणि रंकही झाला.

बॅड पॅच सर्वांनाच येत असतो. त्यातून कोणाचीही सुटका नसते. पण लगेचच सावरतो आणि गाडी पुन्हा रुळावर आणतो तोच महान होत असतो. देशाकडून खेळताना कधी कधी सावरण्याची संधी अधिक वेळाही मिळते, पण आयपीएल या व्यावसायिक स्पर्धेत तुमच्यासाठी मोजलेल्या पैशाचे मोल प्रत्येक वेळी द्यावे लागते अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवला जातो. वॉर्नरच्या बाबतीत हे घडले यावर विश्वास बसत नाही. ही आयपीएल संपलेली नाही, वॉर्नरला भले तो जेवढे सामने खेळला त्यात धावा करता आल्या नाहीत, पण हैदराबादच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तो संघासोबत मैदानात आला नाही तर हॉटेलमध्ये स्वतःच्या रुममध्ये बसून सामना पाहात होता आणि टिव्हीवर सामना सुरू असतानाचा फोटो त्याने सोशल मिडियावर पोस्ट केला. तुम्ही मला पुन्हा या आयपीएलमध्ये मैदानावर पाहू शकणार नाही असे एका हैदराबाद संघाच्या चाहत्याला दिलेले त्याचे उत्तर हेलावणारे होते.

एकदा ठेच लागल्यावर सुधारण्याची संधी मिळाल्यास स्वतःला भाग्यवान समजायला हवे. वॉर्नरला तशी ती मिळाली होती. मुळात या आयपीएलचा पहिला भाग भारतात झाला त्यावेळीही त्याचा फॉर्म हरपलेला होता. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले, पुढच्या सामन्यात त्याला वगळण्यातही आले, परंतु वॉर्नर मैदानात राहिला. राखीव खेळाडूप्रमाणे तो मैदानावरील खेळाडूंना पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य सहकाऱ्यांना देत राहिला आपण टीममॅन आहोत हे तो जाणीवपूर्वक दाखवत होता. कारण हैदराबाद संघाच्या विजेतेपदाचे रोपटे त्यानेच लावले होते. ती पहिला टप्पा भारतातच पूर्ण झाला असता तर पुढचे सर्व सामने खेळण्याची संधी वॉर्नरला मिळाली नसतीही. पण कोरोनामुळे स्पर्धा स्थगित झाली आणि वॉर्नरला अमिरातीत होत असलेल्या या टप्प्यात नवी उभारी घेत खेळण्याची संधी मिळाली, परंतु चार महिने लोटले तरी अपयशाने त्याची पाठ सोडली नाही आणि अखेर गोवऱ्या वेचण्याची वेळ त्याच्यावर आली.

पुन्हा पडू शकतो धावांचा सडा...

ही आयपीएल संपल्यावर काही दिवसांतच याच ठिकाणी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. वॉर्नर हा ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची फलंदाज आहे. आत्ताच जर त्याचा अशा प्रकारे आत्मविश्वास खचलेला असेल तर विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसू शकतो. आता वॉर्नर खचून जातो की पुन्हा फुलांचा सडा पाडतो याचे सर्व भवितव्य त्याच्याच हाती आहे.

मॅक्सवेल झिरोचा हिरो होतो तेव्हा...

वॉर्नर आणि हैदराबाद यांचे नाते आता संपलेले आहे, हे नक्कीच, परंतु काही दिवसांत आयपीएलमध्ये दोन नवे संघ येणार आहेत आणि काही महिन्यात नव्याने खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मागणी वाढणार आहे. हीच वॉर्नरसाठी संधी असेल. कारण जसा रावाचा रंक होतो तसा रंक पुन्हा रावही होऊ शकतो ही पण आयपीएलची तिसरी बाजू आहे. ऑस्ट्रेलियाचाच ग्लेन मॅक्सवेल हे उत्तम उदाहण आहे. गेल्या वर्षी याच अमिरातीत झालेल्या स्पर्धेत तो पंजाब संघातून खेळत होता. स्पर्धेत त्याला एकही षटकार मारता आला नाही. संघासाठी विजयाची सोपी संधी त्याला पूर्णत्वास नेता आली नव्हती. त्याच्यासाठी आयपीएल संपल्यातच जमा होती, परंतु विराट कोहलीच्या बंगळूर संघाने त्याला हात दिला आणि आता तो याच अमिरातीत षटकारांचा पाऊस पाडतोय...स्पर्धा तीच, मैदानेही तीच पण काळ बदलला आणि फरक पडला म्हणूनच वॉर्नरने मॅक्सवेलपासून स्फूर्ती घ्यायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT