prithvi-shaw
prithvi-shaw 
सप्तरंग

पृथ्वीची परिक्रमा

शैलेश नागवेकर nshailu@gmail.com

सचिन तेंडुलकर असो की विराट कोहली असो, कारकीर्दीच्या परिक्रमेत अडथळ्यांचा सामना या महान आणि दिग्गज खेळाडूंनाही करावा लागलेला आहे; पण या ग्रहणाचा कालावधी जेवढा कमी तेवढी दुष्टचक्राची सावलीही मर्यादित. अर्थात्, त्यासाठी मनापासून केलेले प्रयत्न, घेण्यात येणारी अपार मेहनत आणि नेमकेपणा तेवढाच मोलाचा असतो. भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर काही वर्षांपूर्वीच नव्या पृथ्वीचा उदय झाला होता. शालेय क्रिकेटमध्ये चारशेपेक्षा अधिक धावांचा विक्रम केल्यानंतर या पृथ्वीची दखल क्रिकेटच्या भूमंडळावर घेण्यात येऊ लागली होती. १९ वर्षांच्या आतील विश्वकरंडक जिंकल्यानंतर पृथ्वीचा भारतीय संघातील प्रवेश दूर नव्हता. त्याचे सेहवागस्टाईलचे फटके नजरेचं पारणं फेडणारे होते. पदार्पणाच्या सामन्यात शतक करूनही पृथ्वीनं, आपण ‘लंबी रेस का घोडा’ आहोत हे स्पष्ट  केलंच होतं. मात्र, टिपूर चांदण्याची पौर्णिमा जशी येते तशीच काळीकुट्ट अमावास्याही येत असते. तो परिक्रमेचा भागच असतो. त्यातून सर्वांनाच जावं लागतं; पण पौर्णिमेच्या काळात मिळवलेला (कमावलेला) प्रकाश अंधारातही ऊर्जा देत असतो आणि नव्या उमेदीकडे वाटचाल करण्याचा मार्गही दाखवत असतो. मात्र, हा अंधार जरा जास्तच काळ राहिला तर अस्तित्व पणास लावणाराही ठरतो. पृथ्वी शॉ यानं गेल्या तीन महिन्यांत प्रकाश-अंधाराचा हा खेळ अनुभवला आणि अस्तित्वाची जाणीव झाल्यामुळेच त्यानं नव्या प्रकाशाकडे झेप घ्यायला सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटीत उघडे पडलेले फलंदाजीतले दोष आणि मायदेशात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत केलेल्या सर्वाधिक धावा, त्यात असलेलं एक द्विशतक, तसंच मुंबईला मिळवून दिलेलं विजेतेपद. या बदलात बरंच काही घडलं. तळमळीनं केलेले प्रयत्न आणि अडचणींवर मात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली की मार्ग सापडतो हे या पृथ्वीचं ग्रहण सुटत असल्याचं दर्शवत आहे. 

नैसर्गिक तंत्र आणि घोटून केलेले काही बदल सफाईदारपणा आणत असले तरी काळानरूप त्यात न जाणवणारे दोष नकळतपणे निर्माण होत असतात, म्हणून खेळाडूंना नेहमीच आरशाची गरज असते. हा आरसा हितचिंतकांपेक्षा स्वतःचा असला तर उत्तमच! मेलबर्न कसोटीतून वगळल्यानंतर पृथ्वीनं प्रथमच स्वतःचा शोध घेतला आणि त्यामुळेच त्याला मार्ग सापडला. ‘त्या दौऱ्यात दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतर आपण रूममध्ये रडलो,’ अशी कबुली त्यानं नुकतीच एका मुलाखतीत दिली.

हे दुःखच त्याच्यासाठी अंधार सरून सूर्योदयाच्या किरणाची आशा दाखवणारं होतं. याचं पहिलं श्रेय जातं ते मुंबई क्रिकेट संघटनेला, त्यांनी उपकर्णधारपदी नियुक्ती केली. श्रेयस अय्यरची भारतीय संघात निवड होणार हे अपेक्षित होतं आणि त्यानंतर नेतृत्व पृथ्वी शॉच करणार होता. अशा वेळी झपाटलेला सेनापती योद्धा म्हणूनही फारच धोकादायक असतो. अंतिम सामन्यात पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. त्याला उचलून मैदानबाहेर न्यावं लागलं. तो परत मैदानात येण्याची शक्यता दुरावत होती; पण हा जखमी योद्धा पुन्हा मैदानात आला. संघाला दिशा दाखवली आणि फलंदाज म्हणून उत्तर प्रदेशाच्या गोलंदाजांवर हल्ला करून मुंबईच्या विजयाचा पायाही त्यानं भक्कमपणे घातला.

वादाची किनार
पदार्पणात मायदेशातील वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका गाजवल्यानंतर पृथ्वीला २०१८ च्या ऑस्ट्रेलियादौऱ्यासाठी हक्काचं स्थान मिळालं; परंतु पहिल्या कसोटीच्या अगोदर झालेल्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. ‘तिसऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल,’ असं प्रशिक्षक रवी शास्त्री सांगत होते; परंतु त्यानंतर नेमकं काय घडलं हे उघड झालं नाही. मात्र, पृथ्वी या संपूर्ण दौऱ्याला मुकला. या दुखापतीतून सावरल्यानंतर देशातील क्रिकेटवर त्यानं लक्ष केंद्रित केलं. सन २०१९ मध्ये इंदूर इथं झालेल्या ‘मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धे’त, खोकला झाल्यामुळे ही बाब संघव्यवस्थापनाला न सांगता, इंदूरमधील मेडिकलमधून त्यानं खोकल्यावरचं औषध आणलं व घेतलं. मात्र, उत्तेजकचाचणीत तो दोषी आढळला आणि त्याला आठ महिन्यांच्या बंदीला सामोरं जावं लागलं. कारकीर्द सुरू होत असताना बसलेला हा मोठा धक्का होता. 

बंदी संपल्यानंतर मुंबईतील पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतक केल्यानंतर ‘आता माझी बॅट बोलणार,’ अशी त्यानं हातानं केलेली कृती अनेकांना पटली नव्हती. कोरोनाच्या साथीच्या अगोदर झालेल्या न्यूझीलंडदौऱ्यात त्याला भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळालं हे सुदैव; पण त्यातही त्याला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता.

दुष्टचक्राचा योगायोग
योगायोग कसा असतो पाहा...२०१८ च्या ऑस्ट्रेलियादौऱ्यात दुखापतीमुळे पृथ्वी संघातून बाहेर गेला. पुढं येणाऱ्या ग्रहणाचे ते संकेत होते; पण त्यानं ते दुर्लक्षित केले. २०२१ च्या त्याच ऑस्ट्रेलियात सुमार कामगिरीमुळे तो संघातून बाहेर गेला आहे. हे एक वर्तुळ पूर्ण झालं; पण या वेळची धग भवितव्य पणाला लावणारी होती, म्हणूनच मायदेशी परतल्यावर सचिन तेंडुलकरकडे मार्गदर्शनासाठी तत्काळ घेतलेली धाव आणि त्याच्या सल्ल्यानुसार मुंबईतील हुशार मार्गदर्शक, तसंच आयपीएलमधील त्याच्या दिल्ली संघाचे आता सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्याबरोबर केलेला प्रामाणिक सराव हे पृथ्वीचे ग्रह-तारे आता त्याला अनुकूल होत असल्याचे शुभसंकेत देत आहेत.  

आता स्पर्धा कठीण
भारतीय संघातून एकदा बाहेर गेल्यानंतर पुनरागमन करणं पदार्पणापेक्षाही आव्हानात्मक असतं. मुळात तुम्हाला पुन्हा कर्तृत्व सिद्ध करावंं लागतं आणि तुमच्यासाठी जागी रिकामी व्हावी लागते. पृथ्वीनं ‘हजारे करंडक स्पर्धे’तून स्वतःला सिद्ध केलं; पण जागा निर्माण होणं हे नशिबाच्या हाती असतं.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT