Hima Das 
सप्तरंग

‘हिमा’लयाएवढा आनंद!

शैलेश नागवेकर nshailu@gmail.com

शब्दांत व्यक्त करण्यात येणाऱ्या भावना असोत वा आदरयुक्त वर्तन असो, अशा कृतीनं समोरच्याला क्षणार्धात जिंकता येऊ शकतं; पण डोळ्यांतील भाव किंवा डोळ्यांतील आनंदाची चमक भारावून आणि दिपवून टाकणारी कशी असते याची प्रचीती गेल्या आठवड्यात क्रीडाप्रेमींनी घेतली असेल. गेल्या आठवड्यात सोशल मीडियात एक छायाचित्र प्रसिद्ध झालं आणि ते सर्वांच्या नजरेत भरलं. ते छायाचित्र होतं ॲथलेटिक्समधील भारताची नवी सुवर्णकन्या हिमा दास हिचं. पोलिसाचा गणवेश परिधान केलेलं! त्यात तिच्या डोळ्यात असलेले भाव अपूर्वाईची परमावधी दाखवणारे होते. ‘ढिंग एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणाऱ्या एकवीसवर्षीय हिमा हिची आसाम सरकारनं पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. पदग्रहणाचा हा कार्यक्रम थाटात आणि उत्साहात झाला. लगेचच त्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं आणि अनेकांना त्याचं अप्रूप वाटलं. पोलिसी गणवेशातला हिमाचा थाटमाट यापेक्षा तिच्या डोळ्यातला त्या वेळचा आनंद हा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याएवढ्याच दर्जाचा होता हे त्या छायाचित्रातून दिसत होतं. आयुष्यातील एक मोठं स्वप्न साकार झाल्याची भावना हिमानं लगेचच व्यक्त केली. खेळाडू आणि नोकरी ही सांगड किती आवश्यक आहे हे त्यातून सिद्ध होतं.

भारतीय ॲथलेटिक्ससाठी हिमा दास हे नाव आता नवं नाही. सन २०१८ मध्ये फिनलंडला झालेल्या २० वर्षांच्या आतील जागतिक स्पर्धेत हिमानं ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं व ती रातोरात ती स्टार झाली. डोळे दिपवणारं असं हे यश भारतीय ॲथलेटिक्सला आशेचा किरण दाखवणारं होतं. 

सन २०१९ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही सुवर्णपदकाची भरारी घेणाऱ्या हिमानं एका महिन्यात पाच सुवर्णपदकं मिळवली आणि भारतीय ॲथलेटिक्सच्या क्षितिजावर ढिंग या आसाममधील दुर्गम भागातला हिरा चमकू लागला आहे याची जाणीव सर्वांना झाली. भारतात गुणवत्तेची कमतरता नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही गुणवत्ता आता शहरांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. खेड्यापाड्यांतून, दुर्गम भागातून ती दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही ती बहरून येत आहे. हिमा हे अशा नैसर्गिक गुणवत्तेचं उत्तम उदाहरण. फक्त अशा हिऱ्यांची पारख होणं आणि त्यांना योग्य वेळी संधी मिळणं अत्यावश्यक असतं.

हिमाचं ही शेतकरीकुटुंबातील आहे. वडील रोणजित दास शेतात काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. कुटुंबातल्या सख्ख्या-चुलत मिळून एकूण सदस्यांची संख्या आहे सोळा, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच. हिमाला पाच भाऊ आणि एक बहीण. हिमा नौगाव या गावात राहते. त्या गावात पुराचं संकट नेहमीचंच. परिणामी तिथल्या परिसराचा विकास होणं कठीण; पण हिमा कधी हिरमुसली नाही किंवा कारणा-निमित्तांआड दडली नाही. मैदान मिळो न मिळो, शेतातही धावण्याची तिची तयारी असायची. खरं तर अशा आव्हानात्मक परिस्थितीतूनच अलौकित गुणवत्तेचा श्रीगणेशा होत असतो.

खेळासाठीच जन्म
हिमाचा जन्मच खेळासाठी झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. धावणं, पळणं हा कोणत्याही क्रीडासामग्रीशिवाय खेळला जाऊ शकणारा खेळ. शाळेत असताना आपल्याच वयोगटातील मुलांसोबत तेवढ्याच आक्रमकपणे फुटबॉल खेळणाऱ्या हिमाला फुटबॉलच आवडत होता; परंतु तिचं पदलालित्य आणि पायातला वेग पाहून शाळेतील क्रीडाशिक्षकांनी ॲथलेटिक्सकडे जाण्याचा सल्ला तिला दिला. मात्र, अनवाणी किती धावणार आणि स्पर्धांमध्ये कसं सहभागी होणार? बुटांची सोय झाली, शालेय स्तरावर प्रगती होत राहिली... 

‘आदिदास’ या कंपनीचे बूट असतात हे तिला माहीत होतं; तिनं स्वतःच्या बुटांवर ‘आदिदास’ हे नाव अभिमानानं लिहिलं...पण म्हणतात ना, महान गुणवत्ता असेल तर यश पायाशी लोळण घेतं. ‘आदिदास’ ही जर्मन कंपनी आता बुटांवर हिमाचं नाव असलेले खास बूट हिमासाठी तयार करतं. तिच्या विसाव्या वर्षी एक मोठा ब्रँड तिच्यासाठी एवढं मोठं ‘पाऊल’ उचलत असेल तर आसाम सरकारनंही तिची पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती करणं हे गौरवाचंच आहे.

आसाम सरकारनं हिमाला नोकरी देऊन तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला. पोलिस खात्यातील नोकरी प्रतिष्ठेचीच. साधारणतः उत्तरेकडे किंवा पंजाब राज्यात खेळाडूंना या खात्यात नोकऱ्या दिल्या जातात, खेळाडू म्हणून मिळालेल्या उच्चपदाच्या नोकऱ्या करताना, खेळातून निवृत्त झाल्यावर, त्या पदाला न्याय देण्याची जबाबदारी खेळाडूंची असते. कबड्डीतील सुपरस्टार अनुपकुमार, अजय ठाकूर, महाराष्ट्रात बाजीराव होगडे यांच्यासारखे अनेक खेळाडू-पोलिस कार्यरत होते. हिमाला खेळाडू म्हणून अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. रिओ ऑलिंपिकसाठी पात्रता प्राप्त करायची आहे.

कोरोनामुळे वर्ष फुकट गेलं; पण पतियाळात नुकत्याच झालेल्या इंडियन ग्रांप्री स्पर्धेत हिमानं २०० मीटरमध्ये यश मिळवून आपली ‘सुवर्ण’कामगिरी पुन्हा सुरू केली. तिला आता जूनपर्यंत ऑलिंपिकपात्रता मिळवायची संधी आहे. ती मिळवली तर आणि ऑलिंपिकमध्ये पदक मिळवलं तर आसाम पोलिस उपअधीकक्षपदाची वर्दी परिधान केल्यावर तिच्या डोळ्यांत आनंदाची जी चमक दिसली ती चमक ऑलिंपिकपद जिंकल्यावर अधिक उजळून निघेल यात शंकाच नाही.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT