Carrom
Carrom sakal
सप्तरंग

मी कॅरम बोलतोय... !

शैलेश नागवेकर

अगदी खरं खरं मनापासून सांगा... माझ्या ‘अंगाखांद्यावर’ तुम्ही किती जण खेळलाय? म्हटलं तर मी लाकडाचं फळकूट, पण माझ्या गुळगुळीत आणि मुलायम शरीरावर मिरवणाऱ्या सोंगट्या राणीसारखी वावरणारी क्वीन आणि स्ट्रायकरची सफाईदार कलात्मकता, त्यावर फिरणारी मुलायम बोटं... खुर्ची किंवा टेबलवर बसल्या बसल्या कसं मनमुराद आनंद देणारा. बोटांचा व्यायाम तर होतोच पण एकाग्रताही किती तीक्ष्ण करावी लागते हे तुम्ही अनुभवलेले आहेच.

जगभरातला कुठलाही खेळ घ्या, त्यांच्या तुलनेत मी सुद्धा काही कमी नाही... हां, मी मात्र पडलो सर्वसामान्य म्हणून कदाचित माझ्याकडं पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन तुमच्या क्रिकेट-फुटबॉल एवढा नसेलही पण मी तुमच्या सर्वांचा लाडका आहे हे नक्कीच ! त्याचं कारण असं... हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असला तरी क्रिकेट म्हणजे सर्वस्व. लहान मूल थोडं मोठं झालं, की प्लॅस्टिकची बॅट आणून दिली जाते.

काही हरकत नाही ! प्रत्येकाची आवड निवड. पण मला सांगा. एकत्र कुटुंबात मी छोट्या रूपात का होईना असायचोच. भले काही जणांनी टाइमपासचा खेळ म्हणून मला दुर्लक्षित केलं असेल. पण पत्ते खेळण्यापेक्षा माझा सहवास कितीतरी पटीनं चांगलाच की राव !

आता जरी मी नकोसा झालो असलो, तरी राज्य सरकारचे आभार मानतो कारण या पूर्वी अनेक वर्षे माझ्या लाडक्या खेळाडूंना छत्रपती पुरस्कार मिळत होता. थोडीथोडकी नव्हे तर माझी २५ ‘अपत्यं ’ हा सन्मान अभिमानानं मिरवत आहेत. याचा अर्थ दुर्लक्षित करण्याइतका मी नावडता नाहीच. मग आत्ताच असं काय झालं ?

नवा सेनापती नवं राज्य आलं, नवा विचार आला की काही बदल होतात हे मान्य पण मला ‘ब्लॅक टू फिनिश’ करणं पटलं नाही भाऊ. दुःख असह्य झालं आणि जरा कानोसा घेतला... का बरं मला या सन्मानातून वगळलं असावं ? तर त्याचं कारण कळलं, की जो खेळ ऑलिंपिक, आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धांत खेळला जात नाही त्यांना वगळण्यात आलं आणि त्यात माझा नंबर लागला.

नसेल हो मी अशा भव्यदिव्य स्पर्धेचा मानकरी, नसेल कदाचित माझी क्षमता. पण मी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असलेला मराठमोळा खेळ आहेच की... आणि हो, तुमच्याकडं सर्व इतिहास असतोच तरी एक आठवण करण्याचं धाडस करतो, माझं पालकत्व सांभाळणारे माझे निस्सीम भक्त जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अगदी जागतिक विश्व अजिंक्यपद स्पर्धाही खेळवतात.

आपल्या महाराष्ट्रातील माझी ३० अपत्यं आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स आहेत. तीन विश्वविजेते आहेत. बरं वेळच्या वेळी सर्व आर्थिक कागदपत्रेही सादर करतात आणि व्यवहारही चोख ठेवतात.

पुन्हा एकदा सांगतो, माझा कोणावर राग नाही किंवा कोणाशी तुलनाही करायची नाही, पण काही गोष्टींचा विचार आल्याशिवाय राहवत नाही. छत्रपती पुरस्काराच्या यादीत असे अनेक खेळ आहेत की जे ऑलिंपिक, आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धांत नाही, पण त्यांचा विचार विशेष पुरस्कारासाठी केला जातोय.

अजून एक गोष्ट आवर्जून सांगतो. आपल्याकडंच नव्हे तर इतर सर्वत्र ज्या क्रिकेट खेळाचे गोडवे गायले जातात आणि आपल्या छत्रपती पुरस्कारासाठी विचार केला जातो तो हा खेळ यंदा प्रथमच आशियाई स्पर्धेतला खेळला गेला. अजून ऑलिंपिकमध्ये खेळला जायचाय... असो शेवटी तुम्ही मायबाप ! पण काय सांगू ! गतवर्ष सरताना आणि नव्या वर्षाचा सूर्य उगवताना माझ्याकडं मात्र सूर्यास्त झालाय.

माझ्या डोक्यावर असणाऱ्या साध्या बल्बचा दिवा मंद होतोय... मुळात माझ्या फार मोठ्या आशा-अपेक्षा नव्हत्याच मुळी. तुम्हाला निखळ आनंद आणि कुटुंब जोडत राहाणं हीच माझी तुमच्यापाशी असलेली बांधिलकी. मला काहीही नको हो. पण एक सन्मान जो माझे ऊर भरून आणतो... जे नाव आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देतं आणि प्रचंड ऊर्जा देतं ते आपले महाराज... आराध्य दैवत अर्थात शिवछत्रपती यांच्या नावानं मिळणारा पुरस्कार !

राज्य शासनाच्या क्रीडा खात्यानं इतर सात खेळांसह मलाही वगळलं हो...! माझ्या अंगाखांद्यावर खेळत आपली कला आणि कौशल्य सादर करत श्रेष्ठत्व मिळालं तरी इतरांऐवजी गलेलठ्ठ राशी नाही मिळायची. मिळायचा तो शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचा अमूल्य सन्मान !

आणि हो... दुःखाचे एकेक अश्रू ढाळत असताना एका गोष्टीचे स्मरण झालं. आठवा ती लॉकडाउनची भयाणता. घराबाहेर पडणं मुश्कील होतं. चार भिंतीत कसेबसे दिवस रेटले जात होते. कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि गमावले जाणारे जीव असह्य करत होते, पण ज्यांच्या घरात माझं अगोदरपासून वास्तव्य होतं त्यांचा मी सोबती झालो होतो.

दिवसरात्र मी त्यांच्या दिमतीला हजर होतो. भले तो विरंगुळा असेल पण तुमची केलेली सेवा माझ्यासाठी मोठी होती. तुमचं हे प्रेम माझ्यापासून कोणी हिरावू शकत नाही. हेच प्रेम अनेक पुरस्कारांच्या सन्मानाचं बळ देणारं आहे. मी आहे तसाच राहणार आहे. तुमचं प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा कारण ही पिढी मोबाइलमध्ये गुंततेय.

त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मला हाक मारा. आणि हो काही जण तर मोबाइलमध्ये माझं अॅप तयार करून खेळतात. तसं करू नका, प्रत्यक्ष माझ्या अंगाखांद्यावर खेळा आणि अनुभवा मनमुराद आनंदाचा ठेवा !!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT