Worldcup Football Competition
Worldcup Football Competition Sakal
सप्तरंग

फुटबॉलजीवी!

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

आपल्या देशात सर्वाधिक क्रेझ अर्थातच क्रिकेट आणि क्रिकेटपटूंची ! त्यांच्याबरोबर फोटो काढणं हे जीवन सार्थकी झाल्याची भावना निर्माण करत असतं.

आपल्या देशात सर्वाधिक क्रेझ अर्थातच क्रिकेट आणि क्रिकेटपटूंची ! त्यांच्याबरोबर फोटो काढणं हे जीवन सार्थकी झाल्याची भावना निर्माण करत असतं. क्रिकेटपटूंबरोबरचे असे फोटो लागलीच शेअर करून लाइक्सचा पाऊस पाडण्यात काय ती धन्यता मानली जाते, जणू स्वर्गातला देवच भेटला ! असो, काही दिवसांपूर्वी आपल्याकडे जरा वेगळंच घडलं, चक्क फुटबॉलच्या विजेतेपदाच्या करंडकाला आपला हात लागावा आणि तो फोटो व्यवस्थित यावा यासाठी केवढी ती धडपड आणि तीसुद्धा कोणाची, तर पश्चिम बंगालचे महामहीम राज्यपाल ला गणेशन यांची ! त्यासाठी त्यांनी कोणाला, तर भारताचा महान आणि विश्वविक्रमवीर फुटबॉलपटू, ज्याने विजेतेपदाचा करंडक जिंकला, त्या सुनील छेत्रीला बाजूला केलं... देशातील सर्वांत जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरँड करंडक स्पर्धेत विजेतेपद जिंकल्यानंतर करंडक प्रदान करण्याच्या कार्यक्रमात घडलेला हा प्रसंग. काही सेकंदांचा तो क्षण; पण तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि अर्थातच नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. आपणच जणू करंडक जिंकला अशा आविर्भावात राज्यपाल छेत्रीला बाजूला करत फोटोसाठी प्रयत्न करत होते.

हा प्रसंग घडला; पण काय बदल होतोय हे कळतंय का ? फोटोसाठी; पण ही धडपड क्रिकेटकरिता नाही, तर फुटबॉलसाठी आहे आणि तेही देशांतर्गत स्पर्धेकरिता. कोण म्हणतं क्रिकेट हा आपल्या देशात सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे? कोलकतामध्ये घडलेल्या या घटनेनंतर तरी फुटबॉलही तेवढंच लोकप्रिय आहे, की ज्याची भुरळ चक्क राज्यपालांनाही पडावी.

अर्थात, फुटबॉल हा भूतलावरचा सर्वाधिक पसंतीचा खेळ. त्याकाळी टीव्ही नव्हता तरी पेले यांची महती पोहचलीच होती. फुटबॉलचा जादूगार दिएगो मॅराडोना याचा खेळ कलरफूल टीव्हीवर त्या काळातील अनेकांनी पाहिला. त्यानंतर ब्राझीलचा रोनाल्डो, रोनाल्डिन्हो हे सुपरस्टार होते. आता तर लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो अशा अनेकानेक खेळाडूंचे सामने आपल्या देशात ओटीटीवर पाहिले जातात. विश्वकरंडक स्पर्धेत पात्रता मिळत नसली, तरी आपल्याकडं फुटबॉल तेवढंच लोकप्रिय आहे, जेवढी क्रिकेटची चर्चा होते, तेवढीच फुटबॉलचीही, यावर राज्यपालांनी मोहोर उमटवली. फुटबॉलचा करंडक देण्यासाठी झालेल्या या धडपडीची दखल ‘फिफा’ने तर घेतली असेलच; पण कॉर्पोरेट क्षेत्राने दखल घेतली आणि क्रिकेटच्या अर्ध्याने पैसा दिला, की फोटोसाठीची ती धडपड सार्थकी लागली म्हणायचं.

बिच्चारा छेत्री

असं समजू या, की तो क्रिकेटचा सामना होता आणि रोहित शर्मा, हार्दिक पंड्या किंवा विराट कोहली यापैकी एक जण विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर गेला आणि त्याला छेत्रीप्रमाणे बाजूला केलं असतं, तर काय अनर्थ घडला असता. पण बिच्चारा छेत्री, राज्यपालांनी बाजूला केल्यावर तो निमूटपणे मागे गेला. चेहऱ्यावर जराही नाराजी दाखवली नाही, उलट स्मितहास्यच कायम ठेवले. त्यानंतर ना कोणती पोस्ट, ना काही टिप्पणी. खेळाडू असावा तर असा. छेत्रीची महती रोहित किंवा विराटपेक्षा अधिक आहे. दोनशेहून अधिक देशांत खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल खेळातील तो खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या मेस्सी आणि रोनाल्डो यांच्याशी स्पर्धा करत आहे.

सध्या भारतीय फुटबॉल क्षेत्रात मोठी घडामोड घडली आणि पुढच्या महिन्यात घडणार आहे. भारतीय फुटबॉल संघटना बरखास्त झाली, त्या ठिकाणी प्रशासकीय समिती आली; पण फिफाला हे मान्य नसतं. म्हणजेच तिसऱ्या घटकाच्या हस्तक्षेपाला विरोध असतो, म्हणूनच त्यांनी भारतीय फुटबॉलला निलंबित केलं. पुढे निवडणूक झाली. अर्थात, त्यात राजकीय हस्तक्षेप होताच; पण निवडून येणारे अध्यक्ष कल्याण चौबे हे माजी फुटबॉलपटू आहेत. त्यांनी निवडणुकीत माजी विक्रमवीर कर्णधार बायचुंग भुतियाला पराभूत केलं. हे होत असताना राजकीय शक्ती कार्यरत होती असा आरोप बायचुंगने केलेला आहे. लोकशाहीने निवडणूक झालेली असली, तरी राजकीय शक्ती कार्यरत असणं, हे आपल्याकडे नवं नाही... मुळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्पर्धा स्थानिक असो वा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, व्यासपीठावर राजकीय व्यक्तींची खुर्ची हक्काची असते. स्थानिक कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात राजकीय लोकांचं आर्थिक साहाय्य घ्यावंच लागतं. एवढंच कशाला, हरियानात काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत राजकीय व्यक्तींकडून होणाऱ्या खेळाडूंच्या ओळख परेडसाठी सामने नियमापेक्षा अधिक काळ थांबवले जात होते. मैदानावर खेळाडूंव्यतिरिक्त लोकांचीही मोठी रांग लागत होती, हे वेगळंच.

आता पुढे होणारी घटना पाहू या. पुढील महिन्यात आपल्या देशात १७ वर्षांखालील महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. असं यजमानपद फार मोठं असतं, त्याला किती प्रसिद्धी मिळेल किंवा त्याची किती चर्चा होईल हा भाग वेगळा; पण फुटबॉल विश्वकरंडक, मग तो कोणत्याही वयोगटातील असो, त्याच्या नकाशावर भारत दुसऱ्यांदा येणार आहे. क्रिकेटची विश्वकरंडक आयोजित करण्याइतकं हे सोपं नसतं. ‘फिफा’चे नियम फारच काटेकोर असतात. अर्थात, याअगोदर १९ वर्षांखालील मुलांची विश्वकरंडक स्पर्धा भारतात झाली आहे, त्यामुळे अशी नियमावली आपल्या संघटनांना ओळखीची आहे, त्यामुळे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात कोणी राजकीय व्यक्ती नसेल आणि असलीच तर फोटो आणि व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित दिसण्यासाठी करंडक देण्याकरिता विजेत्या कर्णधाराला मागे करण्याचा प्रकार होणार नाही, अशी अपेक्षा करू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT