gyanvapi masjid
gyanvapi masjid sakal
सप्तरंग

कोंदटलेली ‘ज्ञानवापी’

प्रशांत पाटील

आपल्या देशात यापूर्वीही बऱ्याचदा इतिहास हा वादग्रस्त मुद्दा ठरलेला आहे; परंतु आज एकविसाव्या शतकातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून इतिहासाचं पुनर्लेखन केले जात आहे.

- शशी थरूर

इतिहासावरून होणारे वाद आपल्या देशात आता अतिप्राचीन काळापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. वाराणसी इथल्या ‘ज्ञानवापी’ मशिदीची व्हिडिओ-तपासणी करण्याच्या न्यायालयीन आदेशानंतर निर्माण झालेल्या ताज्या वादळानं ही बाब पुन्हा एकदा समोर आणली आहे. एका पाडलेल्या मंदिराच्या जागेवर या मशिदीची उभारणी झाली आहे या गृहीतकाच्या आधारे अशा तपासणीची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. ही गोष्ट सिद्ध झाली तर मग अयोध्येतील रामजन्मभूमीप्रमाणेच त्याही मंदिराच्या पुनर्उभारणीची मागणी अपरिहार्यपणेच पुढं येईल.

‘परंपरावादी लोक इतिहासाला आडवे जात ‘थांब, थांब’ असं ओरडत असतात,’ हे विल्यम बकलेचं वचन प्रसिद्ध आहे.

आपले हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रवादी मात्र इतिहासाला उद्देशून ‘मागे वळ, होतास तिथंच परत जा,’ असा पुकारा करत असतात. भूतकाळाविषयी त्यांच्या मनात फार मोठा आदर आहे म्हणून ते इतिहासाचा पुनर्शोध घेऊ इच्छितात असं नव्हे, तर भूतकाळाच्या पुनर्शोधनाद्वारे भोवतालच्या वर्तमानाला त्यांना त्यांच्या कल्पनेनुसार आकार द्यायचा असतो.

आपल्या देशात यापूर्वीही बऱ्याचदा इतिहास हा वादग्रस्त मुद्दा ठरलेला आहे; परंतु आज एकविसाव्या शतकातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून इतिहासाचं पुनर्लेखन केले जात आहे. आजही हिंदुत्ववादी आंदोलन भूतकाळाच्याच कह्यात असल्याची ही एक चिंताजनक खूणच म्हणावी लागेल. भारतीय मुसलमानांना बेकायदेशीर ठरवण्याच्या हेतूनं मोगलांना राक्षसी स्वरूपात रंगवलं जाते. मुसलमानांना ‘बाबर की औलाद’ म्हणून हिणवलं जातं. ते भारतभूमीचे पुत्र नव्हेत तर आक्रमक बाबराचे वारस ठरवले जातात. मोगलांनी मंदिरांचा विध्वंस केल्याचा आरोप करत कट्टर हिंदू त्यातील प्रमुख मंदिरांची पुनर्उभारणी करू इच्छितात. पूजास्थळांसंबंधीचा १९९१ चा कायदा, ‘जैसे थे’ परिस्थिती कायम राखली पाहिजे, असं बंधन घालतो व अशा पुनर्उभारणीला प्रतिबंध करतो; परंतु त्याची या धर्मांधांना फिकीर नसते.

अयोध्यातील विजयामुळे धर्मवेड्या हिंदूंची तहान भागेल असं ज्यांना वाटत होतं त्यांच्या एव्हाना लक्षात येऊ लागलंय की, या धर्मांधाची अवस्था विशिष्ट रक्ताला चटावलेल्या वाघासारखी झालीय. त्यांना आता तसल्याच रक्ताची न शमणारी तहान लागलीय. उद्ध्वस्त बाबरी मशिदीच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या मंदिराप्रमाणेच ‘ज्ञानवापी’चाही मुद्दा ते उकरून काढत आहेत. सुमारे पाचेकशे वर्षांपूर्वी सोसावा लागलेला कथित अपमान पुसून टाकून त्यांना आता इतिहासावर सूड उगवायचा आहे. या सूडयात्रेचा अंत होणार तरी कधी?

इतिहास, मिथक, धर्म आणि दंतकथा या चारही गोष्टी आपल्या भारतभूमीत परस्परांत बेमालूम मिसळून गेलेल्या दिसतात. आपण लोक बऱ्याचदा त्यातील फरक जाणूच शकत नाही. अयोध्येतील संबंधित जागेत राममंदिर बांधावं असा निवाडा सर्वोच्च न्यायालयानं दिला. ‘हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे,’ असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं.

यातून दोन गोष्टी ध्वनित झाल्या. पहिली ही की, कायदेशीर तरतुदींपेक्षा अशा प्रकारच्या भावनांना अधिक महत्त्व आहे. आणि दुसरी अशी की, बाबरी मशीद पाडणं हे जरी बेकायशीर कृत्य असलं तरी अल्पसंख्याकांच्या भावना बहुसंख्याकांच्या भावनांच्या तुलनेत कमी महत्त्वाच्या आहेत. या निवाड्याची निष्पत्ती अशी की, मालमत्तेच्या गुन्हेगारी विध्वंसाचा मुद्दा असलेल्या एका भूमिविवादाचा निकाल प्रत्यक्ष विध्वंसकांच्या बाजूनं लागला; परंतु पणाला लागलेल्या गोष्टींची व्याप्तीच इतकी प्रचंड होती की, ज्यांच्या विरोधी हा निकाल लागला ते त्या परिसरातील मुस्लिम शांत राहिले.

बहुसंख्य मुस्लिमांच्या दृष्टीनं अयोध्येचा वाद हा काही एका विशिष्ट मशिदीपुरताच मर्यादित वाद नव्हता. वस्तुतः हा विवाद एकंदर भारतीय समाजातील त्यांच्या स्थानासंबंधीचा होता.बाबरी मशिदीचा विध्वंस हा देशाच्या बहुलतावादी लोकशाहीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला बांधून ठेवणाऱ्या सामंजस्यावरील उघडउघड घालाच आहे असं त्यांना वाटलं. इतरांच्या दृष्टीनं मात्र विध्वंस आणि हिंसा यांचं लांच्छन लागलेल्या एका प्रदीर्घ विवादानंतर आलेल्या या न्यायालयीन निकालानं घटनात्मक प्रक्रिया विधिपूर्वक पुनर्स्थापित केली होती. संपूर्ण उत्तर भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधांत विष कालवणारा हा प्रश्न या निकालामुळे एकदाचा बाजूला पडेल आणि समाजात शांतता नांदेल यावर बहुतेकांचं एकमत होतं. ‘ज्ञानवापी’तील सध्याच्या घडामोडी ही आशा अस्थानी असल्याचंच सूचित करतात.

खरी गोष्ट अशी आहे की, अयोध्येत जे घडलं त्याकडे राष्ट्रीयत्वाच्या हिंदुत्ववादी धारणेचा विजय आणि नवहिंदुत्वाच्या उभारणीतील एक पायाभूत टप्पा म्हणून पाहिलं गेलं. धर्मवेड्या लोकांना त्यामुळे अधिकच चेव चढला. सर्वधर्मीय सहजीवनाचं तत्त्व धाब्यावर बसवण्यात आलं. राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेतून मुस्लिमांच्या अलगीकरणाला अधिकचचालना मिळाली. खुद्द पंतप्रधानांनी त्या ठिकाणी येऊन पूजा केली. शासकीय यंत्रणेचा उघडउघड सहभाग असलेला अयोध्येतील तो समारंभ म्हणजे अधिकृत राष्ट्रीय धर्म घोषित करण्याच्या मार्गावरील एक महत्त्वाचं पाऊल होतं. अशा रीतीनं ‘हिंदुराष्ट्र’ आपल्या डोळ्यांदेखत उभारलं जाऊ लागलं आहे.

हीच प्रक्रिया ‘ज्ञानवापी’त नव्यानं आरंभली जात असल्याची दुश्चिन्हं आता दृष्टोत्पत्तीस येत आहेत. क्षणभर असं गृहीत धरू की, ही मशीद खरोखरच एका उद्ध्वस्त केल्या गेलेल्या मंदिराच्या जागी उभारण्यात आली आहे; पण आता साडेचारशे वर्षं उलटून गेल्यावर बदल्याच्या भावनेनं पुन्हा तो जुना व्रण उकरून काढून आपण आपापसातील संघर्षाचं वादळ उठवलंच पाहिजे का? कित्येक वर्षांपूर्वीच बऱ्या होऊन गेलेल्या जखमा मुळीच न नखलता तशाच अस्पर्श्य राखल्या तर चालणारच नाही का? मशीद नष्ट करून त्याजागी एक मंदिर उभारण्यामुळे भूतकाळातील दुष्कृत्याचं परिमार्जन तर होणारच नाही; उलट एक नवंच दुष्कृत्य आपल्या हातून घडेल.

वाराणसीत पुन्हा चिंतेचं सावट पसरलं आहे. या वेळी भारतीय मुस्लिम विरोध करतील. पुन्हा हिंसाचाराला तोंड फुटेल. इतिहासाच्या बेड्यात अडकलेल्यांची नवनवी पैदास भरभरून होत राहील. पुढील पिढ्यांनी परिमार्जन करत राहावं म्हणून नवनवीन अन्यायांची ओळख त्यांना करून देण्याची दक्षता ते घेत राहतील. इतिहासाचा वापर बळी म्हणून करताना भाजपाला आज मोठा आनंद वाटत असेल; परंतु भूतकाळ पुसून टाकण्याच्या तीव्र लालसेपायी ते आपणा सर्वांचाच भविष्यकाळ धोक्यात आणत आहेत.

(सदराचे लेखक हे खासदार आणि माजी राजनैतिक अधिकारी असून, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT