आपल्या इच्छेविरुद्ध आपण इतरांशी एकमत होतो आणि इथंच आपल्या आयुष्याची फसगत सुरू होते. पुढे जाऊन हीच सवय आपल्याला जडते आणि आपण आनंदी जीवन गमावून बसतो.
- शोभना कसबेकर shobhana.kasbekar@gmail.com
आपल्या इच्छेविरुद्ध आपण इतरांशी एकमत होतो आणि इथंच आपल्या आयुष्याची फसगत सुरू होते. पुढे जाऊन हीच सवय आपल्याला जडते आणि आपण आनंदी जीवन गमावून बसतो. स्वतःवर प्रेम करायलाही विसरतो. खरं तर अंतर्मनाला पटणारं असं स्वच्छंदी जीवन जगणं हेच खरं जीवन.
आपल्या सगळ्यांनाच मनासारखं जगायचं असतं. जीवनात हवं ते करायचं अन् हवं ते मिळवायचं असतं. पण हे वास्तवातील जीवन नव्हे, ते आहे निव्वळ कल्पनाविलास. जगणं म्हटलं की बंधनं हवीच; नाती जपणं तर हवंच हवं. कारण या बंधनात आनंद आहे, समाधान आहे; पण बंधनाच्या मर्यादा मात्र आपल्याला सांभाळता येणं जरुरीचं आहे.
स्वतःच्या मनासारखं जगण्यापेक्षा दुसऱ्यांची मनं संभाळत जगणंच बहुतेकांच्या पदरात पडतं. आपण लोकांना जोडलं तर आपलं भाग्य उजळेल यासाठी माणसं जोडायची असतात. त्यांची मनं ओळखायची असतात. अनेकांशी एकरूप होऊन जगायचं असतं. आपण या वचनाचं पालन करत जगणं पसंत करतो; पण उत्तर काळात कुठं तरी आपल्या मनाला खंत वाटत राहते, ती म्हणजे आपल्या अंगी असलेल्या कला, आवडीनिवडी विसरून गेलेलो असतो. आपण स्वतःसाठी जगत नसून, दुसऱ्यांच्या मनाला जपण्यासाठी जगत आहोत. काही गोष्टी मनाला पटत नसतात; पण त्यांना विरोध केल्यास आपण एकटे बाजूला पडू या विचाराने आपल्या इच्छेविरुद्ध आपण त्यांच्याशी एकमत होतो आणि इथंच आपल्या आयुष्याची फसगत सुरू होते. पुढे जाऊन हीच सवय आपल्याला जडते आणि आपण आनंदी जीवन गमावून बसतो. स्वतःवर प्रेम करायलाही विसरतो. खरं तर अंतर्मनाला पटणारं असं स्वच्छंदी जीवन जगणं हेच खरं जीवन. भविष्यकाळात जगताना तक्रारीचा सूर नको.
आपण ‘हो’ला हो करण्याची सवय लावून घेतली, तर खूप वेळा आपल्या इच्छा अपुऱ्या राहतात. आपण स्वतःवर अन्याय करत असतो आणि दुःखी होत असतो. त्यापेक्षा आपण स्पष्टपणे आपले परखड विचार मांडू शकलो, तर त्यात आपलं भलं होणार असतं. आपल्या गरजा आपणच ठरवायच्या असतात आणि त्या भागवण्यासाठी आयुष्याचं नियोजन आपणच करायचं असतं. स्वतःचं हित साधणं हा गुन्हा नव्हे. आपल्याला जे काही करायचं ते समजून करावं. त्यात सर्वस्व ओतावं तरच कामाचा आनंद आपण पुरेपूर लुटू शकाल. हे करताना मनासारखं घडलं नाही तर खंतही नसावी. कारण सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. मनासारखं वागलो तर मनःशांती मिळवू शकाल. नाही तर मनाची घुसमट होईल; पण हे नककीच सोपं नाही. हे सर्व करण्यासाठी आपल्याला स्वतःचा विश्वास मिळवता आला पाहिजे. दुसऱ्याच्या प्रत्येक मताशी सहमत होण्याचा अट्टहास सोडून द्या. टीकाकारांना उत्तर देण्याची हिंमत ठेवा. विरोध करताना मात्र आपले विचार समर्पक आहेत याची आपल्याला खात्री हवी. नाती ही जपण्यासाठी असतात. तो जीवनाचा आनंददायी ठेवा असतो, पण ही नाती सांभाळताना जर वैयक्तिक नुकसान होणार असेल तर वेळीच जागं व्हायला हवं. आपलं वागणं बदलायला हवं, म्हणजे आपल्यावर शोक करण्याची वेळ येणार नाही. स्वार्थ साधलात तरच त्या साथीला महत्त्व आहे. नेहमी आपल्या भल्याचीच साथ हवी. स्वाभिमान जपलात तरच आपलं व्यक्तिमत्त्व खुलणार आहे. दबावाखाली जगण्यात मजा नाही.
जीवनाचा खरा अर्थ जगूनच कळतो. जगण्याचा अनुभव फार महत्त्वाचा. भूतकाळ आणि वर्तमानकाळापेक्षा भविष्यकाळ महत्त्वाचा ठरतो. कधी कधी भविष्य आपल्या जीवनाला अचानक कलाटणी देऊन जाते. अशा वेळी संस्कारांचे डोळे मिटून पालन करणं धोक्याचं ठरू शकतं. संस्कारांच्या पदराखाली आपण मोठे होतो. विचारांची पक्वता वाढत जाते; पण कधी कधी हेच संस्कार कालबाह्य ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. खूप वेळा संस्कार डावलल्यामुळे प्रगती साधण्याची शक्यता असते. प्रगती होण्यासाठी पाय मागे खेचणारे संस्कार विसरायचे असतात. जगणं धोका देऊ शकतं.
जीवनात दोन गोष्टी निवडायच्या असतात. एक म्हणजे आहे त्या परिस्थितीत जगावं का?दुसरी मनाला हवं तसं आयुष्य कसं मिळवायचं? आपली योग्य निवड आपल्याला मानसिक स्वास्थ्य देईल; पण यासाठी अडचणींचा सामना करण्याची मानसिक तयारी हवी. स्वार्थगुण हा वाईट गुण असला, तरी आपल्या प्रगतीला चालना देणारा आहे. प्रगतीच्या साधनेतून आपण आपलं हित साधू शकतो. स्वतःसाठी जगणं हा गुन्हा नव्हे. सामाजिक कार्य करतानासुद्धा आपल्या मनात सामाजिक सुख मिळवण्याचा स्वार्थ असतोच मुळी. यासाठी आपल्या हिताच्या गोष्टी साधायला शिका.
मनासारखं जगणं मात्र प्रत्यक्षात खूप कठीण असतं. अडचणी सहन कराव्या लागतात. त्यामुळे मानसिक ताण वाट्याला येतोच. त्यातून परत उभारी घेणं जरुरीचं असतं. मनासारखं घडलं नाही, तर त्रास करून घेऊ नये. स्वतःशी प्रामाणिक राहून जगायला शिकलं पाहिजे. मिळालेल्या यशावर समाधान मानायला हवं. अनैतिक मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. आपल्या जगण्यावर आपण भरभरून प्रेम करायलाच हवं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.