Shyam Pethkar writes earth Summer season
Shyam Pethkar writes earth Summer season  sakal
सप्तरंग

ग्रीष्माचे अवतरण

श्याम पेठकर

प्रेमाच्या पराभवानंतर ग्रीष्म तळ्यातल्या वाफाळल्या पाण्यात इथल्या सर्वच जीवांना एक पाऊसशोध घ्यायचा असतो. ग्रीष्मा, मी लिहिलेले हे अवतरण तुला मिळेल, तेव्हा आमच्या घराच्या छपरावर टपटपणाऱ्या कुठल्याही पाऊसथेंबाला अटकाव करू नकोस. लक्षात ठेव, आमचे घर गळते तेव्हाच आमची चूल जळत असते. आमच्या प्रारब्धाचे हे प्राक्तन तुलाच काय, पण असेल अस्तित्वात तर त्या परमेश्वरालाही पुसता येणार नाही.

वसंताचा हेतू नवनिर्मिती असला, तरी वसंताच्या दुर्गुणाचेही कौतुक होते. याचे फार वाईट वाटते ग्रीष्माला. यात या ग्रीष्माचा दोष नाही. कुठलाही ऋतू दोषांचे हे अवतरण भर टळटळीत दुपारी कधीच लिहीत नाही. ग्रीष्माची सकाळच मुळात भर दुपारी होते. ग्रीष्माच्या अविरत हलाखीचे हे अवतरण पृथ्वीला जेव्हा जान्हवीच्या दुधाचा पान्हा फुटला, तेव्हाच लिहिले गेले आहे.

कुठल्याही फुलाची लाली किंवा कुठल्याही पानाचं हिरवेपण, यावर तापट ग्रीष्माचा नेहमीच आक्षेप असतो. भागीरथीच्या दुधाचे प्रत्येक माणसाच्या ओठावरून पुसले न जाणारे हे तुझ्या दुर्भाग्याचे अवतरण! हे अवतरण काही आजच लिहिले गेलेले नाही. त्या आदिमायेने स्वत:च्या करंगळीने जेव्हा या सृष्टिचक्राला गती दिली, तेव्हाच हे भाकीत तुझ्या कपाळी लिहिले गेले. सृष्टीच्या अंताचे भाकीत कुणी केले नाही. करू नये. ग्रीष्मा, तुझ्यात समाधीस्थ झालेल्या दुर्वासाची शपथ! सृष्टीच्या पोटी देवांकुर निर्माण व्हावे म्हणून, कुंतीला ‘देवभूती’ मंत्र देणाऱ्या त्या दुर्वासाची तुझ्यावर कृपा आहे. कुठलेही अनुष्ठान दुर्वास नेमके तुझ्या आमगनानंतरच करायचे. यातले औचित्य ओळखण्यासाठी ऋषींचे हृदय असण्याची काही गरज नाही. कारण कुठल्याही नवनिर्मितीसाठी वासनेचे ऊन इतके तापू द्यावे लागते की, आटून आटून शेवटी त्याचे सोने झाले पाहिजे.

ग्रीष्मा! या जमिनीचे तुला तरी नेमके काय करायचे असते? तर नांगराच्या फाळाने तिची तहान अधोरेखित करण्याआधी, तिची सोनकूस उष्णतेच्या आगीने इतकी तापवून टाकायची असते की, पाण्याचा एक थेंब जरी तिच्या तापत्या वक्षावर पडला, तरी त्याची वाफ व्हावी. थेंबाचे हे स्खलन अनवरत भूमंडळाच्या सर्वांगभर होण्याआधी पृथ्वीचे हृदय इतके तापावे की, तिच्या प्रणयाची पूजा सुरू असताना, या तापलेपणाच्या तेजाचे दीप लागावे.

प्रकाश नेहमी सोन्यासारखाच असतो आणि अग्नी नेहमीच उजळण्याचे काम करीत असतो. ग्रीष्मा, तुझ्या डोळ्यांतील प्रकाश आणि तुझ्या उरातील अग्नी नेहमीच पृथ्वीची कूस उजळण्याचे काम करीत असतो. तुझ्याजवळ येईल ते मंगल. तुझ्याजवळ येईल ते सुवर्ण. तुझ्याजवळ येईल ती सुविद्या. म्हणूनच कुठल्याही व्रताची सुरुवात, दुर्वास तुझ्या आगमनानंतर करतात. अमंगलाचे तुझ्यामध्ये समर्पण होते आणि मंगलाची सुरुवात. म्हणूनच तुझ्या आगमनानंतरच लग्नविधीच्या नावाखाली दोन शरीरांचे मिलन होते. पूर्वी लोक पापी नव्हते तेव्हा लग्नपत्रिकेत सरळ लिहायचे की, आमच्या मुलीचा शरीरसंबंध अमक्या तमक्याशी ठरला आहे. मुळांना तहान लागली असताना पानांवर पाणी शिंपडणारी विकृती ही कधीच संस्कृती होऊ शकत नाही. म्हणून खजुराहोतील संभोगचित्रांना कोणी विकृती मानत नाही. मानू नये. या चित्रांचे रेखांकन ग्रीष्माच्या उन्हात आणि प्रकाशात झाल्याचे संशोधन आता नवीन नाही. एरवी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रंगांना चित्रांच्या अंगोपांगी इतके भिनता येणे शक्य नाही. रंगांना रंगात आणण्यासाठी कुठेतरी धग असावी लागते.

त्रिविध तापांच्या रंगांनीच या कामचित्रांचे अधोरेखन झाले आहे. अंगांच्याही उपांगांनी ही लेणी कोरली गेली आहेत. कुठल्याही क्रांतीचा रंग लाल आणि वैराग्याचा भगवा असतो. कारण उजळणाऱ्या आगीचा रंग लाल आणि जळणाऱ्या आगीचा रंग भगवाच असतो. म्हणून ग्रीष्मा! तू हिरण्यगर्भाच्या वंशजांपैकीच एक. म्हणून तुझ्या वैराग्याचा रंग उन्हाळी उष्ण. रंग हा उन्हाळी उष्णसुद्धा असू शकतो. झाडांची सावली काळी नसून ‘हिरवी’ असते. ज्यात गारपण असते ते काळे कसे राहील? निसर्गाच्या सौंदर्यशास्त्राप्रमाणे सावलीचा रंग ‘गारवा’ असतो. काळा नसतो.

भर दुपारीच पायातील नि:शब्द पैंजणांचा आवाज करीत, खूप खोल विहिरीच्या तळातील पाणी उपसून काढण्याचा बहाणा करून ती येते. ऐन दुपारी, उन्हाळ्यातही, हिरव्याकंच पानांचे देवदत्त लेणे लेवून जुन्या वाड्याच्या परसदारी उभ्या असलेल्या औदुंबराच्या झाडाखालील विहिरीत, कुणी असे बादलीभर पाण्यासाठी याचनामग्न होणे फार यातनामय असते. बादलीभर पाण्यासाठी हे असे होणे म्हणजे, तुझ्या पराभवाचे ते एक विषयांतर असते. अशा पराभवांना आपण असफल आत्महत्यांचे तपशील अकारण जोडत असतो. या तपशिलांचे संदर्भ विहिरीच्या तळातल्या पाण्यापेक्षा डोळ्यांतल्या गाळात विद्यमान असलेल्या दवांइतके संदर्भसार्थ असते. अशा विहिरीपर्यंत येण्यासाठी जुन्या वाड्याच्या भिंती स्वत:ला एक खिंडार पाडून घेतात. भर दुपारी खूप खोल विहिरीच्या तळाशी असलेल्या माणूसभर पाण्यात स्वत:चे आभाळभर आयुष्य असे कायमचे मिटवून टाकायला आलेल्या कुण्या कुँवारणीच्या पोटातील प्रेमाशय तसे औदुंबराच्या फुलासारखेच. अशा एखाद्या कुँवारणीला किंवा संसाराच्या आगीने होरपळलेल्या सवाष्णीला वाड्यामागच्या विहिरीच्या काठावर स्वत:चे पैंजण काढून ठेवताना ग्रीष्मा, तू अनेकदा पाहिले असावेस. वाड्यातल्या गुप्तधनावर पहारा देणारी ती म्हातारी नागीणही अशा वेळी औदुंबराच्या पानांखालच्या सावलीत निवांत निजून राहते. कुणीच कुणाला अशा वेळी थांबवीत नाही.

ग्रीष्मा! मी तुझ्या पोटातल्या आगीत शिरण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. कारण माणसांच्या कातडीला पृथ्वीच्या पश्चात्तापाचे हे अग्निदिव्य सहन करणे कधीच शक्य नसते. ग्रीष्मा! तुझ्या या अखंड बिनसावलीच्या प्रवासात, अवचित कधी तुला जर दुर्वासाच्या कमंडलूतील शिल्लक असलेले कुंतीच्या डोळ्यांतील पाणी कधी गवसलेच, तर एक कर- भर दुपारी खूप खोल विहिरीच्या तळाशी असलेल्या माणूसभर पाण्यात स्वत:चे आभाळभर अस्तित्व बुडवून टाकण्यास आलेल्या त्या कुँवारणीच्या पोटातील ते प्रेमाशय तुला स्वत:च्या आगीने परतविता आले तर पाहा. तसे झाले तर तुझ्या हृदयात लागलेली ही चिरंतन आग कायमची शमविण्यासाठी ही जगन्माता पृथ्वी, स्वत: ऋतुस्नात होण्यासाठी वापरत असलेले सप्त समुद्राचे पाणी तुझ्या पायाशी वाहून देईल.

पण एक लक्षात ठेव हे देताना. वसंताच्या दुर्गुणावर इतके नाराज होण्यासारखे काहीच नसते. प्रेमाच्या पराभवानंतर ग्रीष्म तळ्यातल्या वाफळल्या पाण्यात इथल्या सर्वच जीवांना एक पाऊसशोध घ्यायचा असतो. मी लिहिलेले हे अवतरण तुला मिळेल, तेव्हा आमच्या घराच्या छपरावर टपटपणाऱ्या कुठल्याही पाऊसथेंबाला अटकाव करू नकोस. लक्षात ठेव, आमचे घर गळते तेव्हाच आमची चूल जळत असते. आमच्या प्रारब्धाचे हे प्राक्तन तुलाच काय, पण असेल अस्तित्वात तर त्या परमेश्वरालाही पुसता येणार नाही. कारण घर सारवताना, माजघरातील जन्मखुणा न पुसता सारे घर पवित्र ठेवण्याचे आमच्या मायमाऊल्यांचे कसब, त्या दयाघनालाही अवगत नाही. पुढे नाही लिहवत मला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT