Vikruti sakal
सप्तरंग

विकृती

मनुष्य हे रसायनच वेगळं आहे, कोणाला कशात आनंद मिळेल सांगता येत नाही. आमच्या लहानपणी गावात एक साप पकडणारा माणूस होता, जो फावल्या वेळात सरडे पकडायचा.

सकाळ वृत्तसेवा

मनुष्य हे रसायनच वेगळं आहे, कोणाला कशात आनंद मिळेल सांगता येत नाही. आमच्या लहानपणी गावात एक साप पकडणारा माणूस होता, जो फावल्या वेळात सरडे पकडायचा.

- सोनाली लोहार sonali.lohar@gmail.com

एक बातमी वाचली. एक भटका कुत्रा जखमी अवस्थेत प्राणीमित्रांना सापडला. डॉक्टरांनी तपासल्यावर कळलं, की कोणी तरी त्या कुत्र्याच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला होता. असं काही वाचलं, की डोकं बधिर होतं. माणसाने किती विकृत असावं त्याची ही उदाहरणं...

मनुष्य हे रसायनच वेगळं आहे, कोणाला कशात आनंद मिळेल सांगता येत नाही. आमच्या लहानपणी गावात एक साप पकडणारा माणूस होता, जो फावल्या वेळात सरडे पकडायचा. त्या सरड्याच्या शेपटीला दोरी बांधून त्याच्या तोंडात तंबाखू कोंबायची, मग थोड्या वेळाने तंबाखूच्या ग्लानीत सरडा उड्या मारायला लागला, की ते या माणसाला भयंकर आवडायचं. हे चूक आहे हे कळण्याइतपत आमचं तेव्हा वय नव्हतं. त्यामुळे त्याने टाळ्या पिटल्या की आम्ही पोरंही टाळ्या पिटायचो. पुढे कधी तरी वाडीतल्या वडीलधाऱ्यांच्या हे नजरेला पडलं आणि मग ते भयंकर प्रकार एकदाचे थांबले. त्या सरड्याच्या डोळ्यातली ग्लानी आणि तोंडाच्या चिंध्या झालेल्या त्या श्वानाच्या डोळ्यातली ग्लानी ही एकच असावी.

इंग्रजीमध्ये ‘सॅडिस्ट’ हा शब्द आहे. म्हणजे अशी व्यक्ती, जी क्रुरतेने किंवा इतरांना वेदना देऊन आनंद मिळवते. वेदना ही शारीरिकच असते असे नव्हे. काही जणांना दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय समाधानच वाटत नाही.

एका ओळखीच्या कुटुंबात घरच्या यजमानांना पत्नीला सतत कुजकट घालून- पाडून बोलत राहण्याची सवय आहे, अगदी परक्यांदेखतही हाच प्रकार चालतो. जेवायला बसलं तरी ताटातल्या प्रत्येक पदार्थाला दणकून नावं ठेवायची, ‘जेवणात कशी चवच नाही, आईच कसा उत्तम स्वयंपाक करायची, लग्न झाल्यापासून आपण कसा फक्त पालापाचोळाच खातोय’ हे सगळं बोलता बोलता महाशय पोट भरून ढेकरही देतात. त्यांचं जेवण होईस्तोवर शेजारी बसलेल्या त्यांच्या धर्मपत्नीच्या घशात मात्र आवंढा दाटून आलेला असतो. पत्नी हे सगळं निमुटपणे का सहन करते हे सुरुवातीला कळणं अवघड होतं, मग लक्षात आलं, की काही जीव जन्मतःच मुके असतात.

याचं पुढचं टोक म्हणजे ही विकृती घराच्या शयनगृहापर्यंतही पोहोचते. शारीरिक संबंधांत जोडीदाराला वेदना किंवा इजा पोहोचवल्याखेरीज काही व्यक्तींना सुख अनुभवता येत नाही. अशा घरगुती हिंसाचाराच्या आणि वैवाहिक बलात्काराच्या घटना बहुधा चार भिंतींआडच राहतात आणि त्यानेच या विकृतीला खतपाणी मिळून ती अधिकच बळावत जाते. अर्थात, हे प्रकार पुरुषांकडूनच होतात असंही नाही. सासूकडून सुनेला केला जाणारा किंवा सुनेकडून सासू-सासऱ्यांना दिला जाणारा शारीरिक आणि मानसिक छळही एकप्रकारे विकृतच. पत्नीकडून शाब्दिक आणि शारीरिक अत्याचार होतोय अशाही काही तक्रारी आता पोलिस ठाण्यात यायला लागल्या आहेत. गर्दीचा फायदा घेऊन स्त्रीच्या अवयवांना केले जाणारे ओंगळ आणि असह्य वेदना देणारे स्पर्श ते अत्यंत अमानुष बलात्काराच्या घटना, या प्रकारांना माफीच नाही. बलात्कारातील भीषण हिंसा ही तर विकृत गुन्हेगारी मनोवृत्तीचंच लक्षण आहे.

माणसं अशी का वागतात या प्रश्नाचं शास्त्र अनेक पद्धतीने उत्तर देतं. वाईट संस्कार, व्यसन, मेंदूच्या रचनेतील दोष, काही संप्रेरकांचे जास्त प्रमाण, अनुवांशिकता, सिरोटोनिन या न्यूरोट्रान्समीटर कमी असणं, कुटुंबातील वातावरण, चुकीच्या परंपरांचा पगडा अशी अनेकविध कारणं असू शकतात. या सर्व विकृतींना, मनोविकारांना नावंही आहेत, त्यावर उपचारही आहेत, पण अशी व्यक्ती भविष्यात बदलेलच याची खात्री नसते. त्यामुळे गुन्हा झालाच तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रकाशात आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची हिंसा हा गुन्हा आहे आणि त्याचबरोबर ती सहन करणारा किंवा ती होत असताना ते बघून तिऱ्हाईत म्हणून गप्प बसणारा हे दोन्हीही दोषी ठरतात.

एका श्वानाच्या तोंडाच्या उडालेल्या चिंध्या हे केवळ निमित्तमात्र झालं. समाजातल्या अशा प्रत्येकच विकृतीला वाचा फोडण्याचा आणि वेळीच आवर घालण्याचा पण या उत्तरायणाच्या शुभमुहूर्तावर सुजाण नागरिक म्हणून करू या!

(लेखिका व्हॉईस थेरपिस्ट आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

Marathi Kannad : 'मराठी घरातच बोलायची, अंगणवाडीत चालणार नाही'; कन्नड अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना सज्जड दम, नोटीस देऊन कारवाईचे आदेश

संतापजनक! 'जातिवाचक शिवीगाळ करु बार्शीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग'; कोणी नसताना घरात घुसले अन्..

SCROLL FOR NEXT