Hith Strike
Hith Strike Saptarang
सप्तरंग

कोण होतास तू , काय झालास तू !

सुनंदन लेले saptrang@esakal.com

हिथ स्ट्रीकला चुकीच्या वागणुकीबद्दल आयसीसीच्या लाचलुचपत विभागान दोषी ठरवून क्रिकेटपासून क्रिकेटपासून ८ वर्ष लांब राहण्याची शिक्षा ठोठावली आणि माझ्या मनात विचारांचे वादळ माजले. महत्त्वाची बाब म्हणजे हिथ स्ट्रीकने कबूल केले आहे की त्याने चुकीच्या माणसांशी संपर्क ठेवला आणि गैरप्रकार केला. ज्या खेळाडूनं वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ज्याने झिंम्बाब्वे संघाचे नेतृत्व केले. ज्याने वॉरविकशायर सारख्या नामांकित इंग्लिश कौंटी संघाचेही नेतृत्व केले. ज्याला क्रिकेट जाणकार म्हणून निवृत्तीनंतर मोठमोठ्या संघांनी प्रशिक्षक नेमले आणि सर्वांत लक्षणीय म्हणजे झिंम्बाब्वे देशातील बुलावायो गावाजवळ गडगंज कौटुंबिक संपत्तीचा वारस असलेल्या हिथ स्ट्रीकला लाचलुचपत विभागाने पकडून भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार शिक्षा ठोठावण्या इतपत गैरकृत्य करायची अवदसा का आठवली हे मला पडलेले मोठे कोडे आहे.

बाळाचे पाय पाळण्यात दिसले

स्ट्रीक घराण्यातच क्रिकेटचे बाळकडू आहे. हिथचे वडील डेनिस हे सुद्धा उत्तम क्रिकेटर होते. त्यांना नित्यनियमाने क्रिकेट खेळताना बघूनच हिथला क्रिकेटची आपसूक आवड लागली. अंगापिंडाने मजबूत असलेल्या हिथला नव्या क्रिकेट चेंडूने वेगात गोलंदाजी करायला आवडायची. लहान वयात त्याच्यातील गुणवत्ता हेरली गेली आणि लवकरच त्याच्याकरता माशोनालँड परगण्याच्या क्रिकेट संघाची दारे उघडली गेली. इतकेच काय डेनिस आणि हिथ म्हणजे पिता पुत्रं याच संघाकडून एकत्र प्रथम श्रेणीचा सामना खेळले तेव्हा लोकांच्या कौतुकाला पारावार राहिला नाही.

जोरदार पदार्पण

१९९३-९४ च्या मोसमात पाकिस्तान दौर्‍यावर जाणार्‍या झिंम्बाब्वे संघात हिथ स्ट्रीकला पहिल्यांदा निवडले गेले. रावळपिंडी कसोटी सामन्यात या पठ्ठ्याने जोरदार कसोटी पदार्पण करताना आठ फलंदाजांना बाद करायची करामत करून दाखवली. पहिल्या सामन्यातील यशाने हिथ भुरळून गेला नाही. त्याने संपूर्ण मालिकेत चांगला मारा करून तब्बल २२ फलंदाजांना बाद केले ज्यामुळं त्याला मालिकेच्या मानकऱ्याचे बक्षीस दिले गेले. गोलंदाजांबरोबर हिथ स्ट्रीक बर्‍यापैकी भरवशाची फलंदाजीही करू लागला. बघता बघता त्याचे नांव दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजले जाऊ लागले.

२००१ मध्ये भारतीय संघ झिंम्बाब्वे दौर्‍यावर गेला जो माझ्याकरता खूप लक्षात राहणारा ठरला. कारण साधे होते, पत्रकार म्हणून संपूर्ण दौर्‍यावर वार्तांकनाकरता जाण्याचा माझ्याकरता तो पहिला प्रसंग होता. त्या दौर्‍यात झिंम्बाब्वे संघाचा कर्णधार हिथ स्ट्रीक होता. बुलावायोला पहिला कसोटी सामना होता ज्याचा अभ्यास करताना मला समजले की हिथ स्ट्रीक त्याच भागात लहानाचा मोठा झालाय. सरावादरम्यान भेटून थोड्या गप्पा मारल्यावर मी हिथ स्ट्रीकला विचारले की मला तुझ्या घरच्यांना भेटायला आवडेल. तर त्याने मला आणि जोसेफ हुवर नावाच्या बेंगलोरच्या पत्रकाराला हाती पत्ता लिहून देत चक्कं एक रात्र घरी राहायला यायचे निमंत्रण दिले. एक दिवसीय मालिकेकरता बुलावायोला परत आलो असताना ठरल्या दिवशी आम्ही हिथ स्ट्रीकने दिलेल्या पत्त्यावर जायला निघालो.

पाऊण तासाचा कारचा प्रवास करून बुलावायोच्या बाहेर पडल्यावर आम्हांला रॅबीट फार्मची पाटी दिसली. मग लक्षात आले की हिथ स्ट्रीकच्या कुटुंबाची तब्बल ५०० एकराची जागा आहे. यात एक ना दोन थेट पंधराशे गायी पाळल्या होत्या. इतकेच नाही तर रॅबीट फार्मच्या आवारात वन्य जीवनाचा आस्वाद घ्यायला खासगी गेम ड्राईव्ह होते. हिथ स्ट्रीकला अर्थातच वन्य जीवनाची सखोल माहिती होती जी तो उघड्या जीपमधून चक्कर मारताना आम्हांला सहजी देत होता. अनेक वन्य प्राणी रॅबीट फार्मच्या ५०० एकर जागेत मुक्त संचार करत होते. स्ट्रीक कुटुंबाचे घर प्रचंड होते. खास आफ्रिकन शैलीत ते सजवले होते.

रॉबर्ट मुगाबेंचे सरकार आल्यावर खरे तर उलटा वर्णद्वेष झिंम्बाब्वेमध्ये झाला होता ज्यात कृष्णवर्णीय लोकांनी श्वेतवर्णीय लोकांचा छळ चालू केला होता. बर्‍याच श्वेत वर्णीय लोकांच्या जमिनींना कृष्णवर्णीय लोकांनी धाकधपटशा करून हडप केले होते. यातून स्ट्रीक कुटुंब बचावले होते कारण हिथ स्ट्रीक आणि त्याच्या वडिलांचे सरकार दरबारी चांगली वजन होते. हिथ स्ट्रीक देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असल्याने त्याला कोणी हात लावला नव्हता. कित्येक वर्ष हिथ स्ट्रीक इंग्लिश कौंटी संघाकडून खेळताना भरपूर पैसे कमावत होता. गेली काही वर्ष जगातील विविध टी ट्वेन्टी संघांकरता हिथ स्ट्रीक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मानाने काम करत होता. मग प्रश्न पडल्यावाचून राहात नाही की इतके सगळे असूनही हिथ स्ट्रीकला चुकीच्या मार्गाने जाण्याची अवदसा का सुचली.

गंभीर आरोप

आयसीसीच्या लाचलुचपत विभागाने जे आरोप हिथ स्ट्रीकवर लावले ते बघा.

सट्टेबाजांना म्हणजेच संघाशी संबंध नसलेल्या लोकांना संघाच्या व्यूहरचनेची माहिती देणे

संघाच्या योजनांची माहिती नको त्या लोकांना कळावी म्हणून चुकीच्या माणसांची ओळख संघातील खेळाडूंशी करून देणे

सट्टेबाजांकडून मिळालेल्या अत्यंत महागड्या वस्तूंची माहिती न देणे

संघ व्यवस्थापनेचा भाग असताना अज्ञात व्यक्तींच्या संपर्कात राहणे आणि त्याची माहिती न पुरवणे

वर नमूद केलेले आरोप खूप गंभीर आहेत. आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार हिथ स्ट्रीकच्या गैरवर्तणुकीवर आयसीसी बरेच दिवस नजर ठेवून होती. सुरुवातीला हिथ स्ट्रीकने आयसीसीने लावलेले आरोप नाकारले. विविध पुरावे दिल्यावर अखेर हिथ स्ट्रीकने गुन्ह्याची कबुली दिली. आयसीसीने आठ वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावताना हिथ स्ट्रीकला जेरीस आणले. ६५ कसोटी सामने आणि १८९ एक दिवसीय सामने खेळलेल्या झिंम्बाब्वे देशाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या आणि घरातून अत्यंत सधन असलेल्या हिथ स्ट्रीकला काहीही कमी नसताना चुकीचे पाऊल टाकण्याची इच्छा का झाली हे प्रश्न मला भेडसावतोय. म्हणून ते गाणे आठवले... कोण होतास तू काय झालास तू.

का घडतं असं...

जेव्हा जेव्हा क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार, लाचलुचपत किंवा सामना निश्चितीचं प्रकरण समोर येतं तेव्हा मला एकच प्रश्न भेडसावतो तो म्हणजे सगळे चांगले असताना श्रीखंड खायचं सोडून खेळाडूला शेण खाण्याची हौस का येते. माजी कर्णधार अझरुद्दीन भारतीय संघावर राज्य करत असताना त्याने अत्यंत चुकीच्या लोकांबरोबर संधान साधले आणि चुकीच्या गोष्टी केल्या. कष्ट करून कमावलेले नाव त्या चुकांनी पुसले गेले. तीच गोष्ट हॅन्सी क्रोनिएच्या बाबतीत झाली. क्रोनिएला त्याचे खेळाडू मोठा भाऊ मानत होते. मग सगळं चांगलं चालू असताना सट्टेबाजांबरोबर संधान साधून क्रिकेटला दगा देण्याचं दुष्कृत्य का सुचलं. श्रीसंतची तशीच कहाणी आहे २००७ आणि २०११ चा विश्‍वकरंडक जिंकणार्‍या संघाचा श्रीसंत भाग होता. पैसा मान मरातब सगळं घरी पाणी भरत असताना श्रीसंतनं स्पॉट फिक्सींगचे प्रयत्न करून काय मिळवलं आणि आता झिंम्बाब्वेचा माजी कप्तान हिथ स्ट्रीकची बातमी कानावर आली. नुसतेच क्रिकेटमुळे नव्हे तर हिथ स्ट्रीक सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला आलेला माणूस. क्रिकेटने त्याला काय नाही दिले. मग पैसा मान आदर सगळे भरल्या घरात पाणी भरत असताना परत त्याने तीच चूक केली, जी चूक अझरुद्दीन आणि क्रोनिएने केली. फरक इतकाच आहे की अझरुद्दीन आणि क्रोनिएने खेळत असताना गैरकृत्याचे पाप केले आणि हिथ स्ट्रीकने प्रशिक्षक म्हणून. सर्व दोषींना शिक्षा झाली, इतकेच काय क्रोनिएने आपला जीव गमावला आता तरी खेळाडू, प्रशिक्षक, संयोजक यातून बोध घेणार का? घरातील वडीलधारे जुने जाणते लोक याला शनीचा फेरा म्हणतात. तो शनीचा फेरा आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून सतर्कता कशी ठेवणार ? हा खरा सवाल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT