dr uatkrant kurlekar
dr uatkrant kurlekar sakal
सप्तरंग

हे वेड चांगलं आहे

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

फुटबॉलचा सण अर्थात विश्‍वकरंडक स्पर्धा कतार देशात साजरा होत आहे आणि एकाहून एक धमाल निकाल स्पर्धेच्या सुरुवातीलाच समोर येत आहेत.

फुटबॉलचा सण अर्थात विश्‍वकरंडक स्पर्धा कतार देशात साजरा होत आहे आणि एकाहून एक धमाल निकाल स्पर्धेच्या सुरुवातीलाच समोर येत आहेत. माजी विश्वविजेत्या संघांना पराभवाचे धक्के बसत असताना नव्या दमाचे संघ जगाला चकित करून सोडत आहेत. स्पर्धेत खेळत असलेल्या तमाम खेळाडूंची शारीरिक तयारी बघून थक्क व्हायला होत आहे, अशी जबरदस्त तयारी प्रत्येक संघाने जगातील सर्वांत मोठ्या खेळाच्या स्पर्धेकरिता केली आहे.

रात्री उशिरापर्यंत जागून भारतीय लोक दर्जेदार खेळाचा आस्वाद घेत आहेत, तरी पाश्चिमात्य देशांतील लोक ‘भारतीय लोक खेळ बघणारे आहेत, खेळणारे नाहीत’ असे टोमणे मारत असतात. भारतात खेळसंस्कृती आहे का नाही, हा चर्चेचा विषय आहे. बदल एकच झाला आहे की, कानीकपाळी ओरडून नव्हे तर स्वानुभवाने बऱ्‍याच लोकांना ‘आरोग्यम् धनसंपदा’ची जाग आली आहे. तरुण पिढी अजूनही ‘अंगठेबहाद्दर’ म्हणजेच मोबाईलला चिकटलेली दिसत असताना मध्यमवयीन लोकांनी विविध खेळांत भाग घेऊन मारलेली लांब उडी लक्षात घेण्यासारखी आहे.

निराशेच्या गर्तेतून बाहेर यायला प्रीती म्हस्के या महिलेने पाच वर्षांपूर्वी सायकलिंग चालू केलं. सायकल चालवताना त्यांच्या खुंटलेल्या आयुष्याला गती आली. सायकलिंग करताना मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती अशी काही जादू करून गेली की, प्रीती म्हस्केंनी एकामागोमाग एक सायकलिंगच्या धमाल मोहिमा केल्या. देशातील सहा हजार किलोमीटरच्या सुवर्ण चतुर्भुज मोहिमेपासून ते काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास त्यांनी हसत हसत सायकलवरून केला. नुकताच त्यांनी गुजरात ते अरुणाचल प्रदेश हा ४ हजार किलोमीटरचा प्रवास ‘सोलो सायकलिस्ट’ म्हणून पूर्ण केला. हा प्रवास करताना त्यांनी अवयवदानाचा संदेश भारतभर पोहोचवण्याकरिता प्रयत्न केले. प्रीती म्हस्केंची नैराश्य ते गिनीज रेकॉर्डची कहाणी वेड लावणारी आहे.

गोव्यात दरवर्षी हाफ आयर्नमॅन शर्यत भरवली जाते. या शर्यतीची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, बोलायची सोय नाही. एक ना दोन, तेहतीस देशांमधून एकूण १ हजार ४५० अ‍ॅथलिटस्नी गोवा हाफ आयर्नमॅन शर्यतीत भाग घेतला. तुम्ही म्हणाल, त्यात विशेष काय आहे? सांगतो. तब्बल ३२ वेळा संपूर्ण आयर्नमॅन शर्यत पूर्ण केलेल्या पुण्याच्या कौस्तुभ राडकरने तयार केलेल्या ५५ खेळाडूंनी या शर्यतीत भाग घेतला. हाफ आयर्नमॅन शर्यत शरीराची आणि मानसिक तयारीची परीक्षा बघते, कारण भाग घेणाऱ्‍या खेळाडूला पाण्यातून जवळपास दोन किलोमीटर पोहावं लागतं, त्यानंतर ८० किलोमीटर सायकलिंग करावं लागतं आणि शेवटी २१ किलोमीटर पळावं लागतं. तुम्हाला पाहिजे त्या वेगाने रमतगमत शर्यत पूर्ण करता येत नाही, कारण प्रत्येक टप्प्यावर कट ऑफ वेळ ठरलेली असते.

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, ज्यांच्याकडे भरपूर वेळ मोकळा पडलेला आहे, त्यांनाच अशा शर्यतीची तयारी करून भाग घेता येणं शक्य आहे. तुम्हाला सांगतो, खूप गैरसमज आहे हा. ते पटण्यासाठी एकच उदाहरण देतो. पुण्यातील अतिशय हुशार, अनुभवी आणि निष्णात कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर योगेश पंचवाघ यांनीही गोव्याची हाफ आयर्नमॅन शर्यत पूर्ण केली. ‘‘प्रबळ इच्छा असली तर कितीही व्यग्र वेळापत्रकातून माणूस आपली आवड किंवा छंद जोपासायला वेळ काढू शकतो. मी सकाळी खूप लवकर उठून दर आठवड्यात दोन दोन दिवस नेमून एकेका शर्यतीची तयारी केली. हाफ आयर्नमॅन शर्यत गोव्यात असल्याने हवामानाचं आव्हान होतं.

खुल्या पाण्यात पोहायची शर्यत मला सर्वांत आव्हान देणारी ठरली. पण शर्यत पूर्ण केल्यावर एकच गोष्ट समजली ती म्हणजे, आपण वळवू तसं शरीर वळतं. आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता खूप जास्त असते, आपण ती नीट पडताळून बघत नाही. हाफ आयर्नमॅन शर्यत पूर्ण करताना मला त्याची जाणीव झाली,’’ डॉक्टर योगेश पंचवाघ यांनी आपला अनुभव सांगताना स्पष्ट केलं.

भारतात मॅरेथॉन पळण्याची गोडी बऱ्याच लोकांना लागली आहे, ज्यात टाटा उद्योग समूहाचे मुख्य अधिकारी चंद्रशेखरन यांचा समावेश आहे. सांगण्याचा मतलब असा की, नुसत्या तरुण पिढीत हे वेड लागलेलं नाहीये, तर आपापल्या नोकरीत उत्तम काम करत असतानाही लोक वेळ काढून पळण्याचा छंद जोपासत आहेत. ४२.१९५ किलोमीटर अंतराची शर्यत पळून पूर्ण करणं येऱ्‍यागबाळ्याचं काम नसतं हे वेगळं सांगायची गरज नाही. ४२ किलोमीटर शर्यत पळणं हाच अचाट पराक्रम वाटतो, तर तीच शर्यत २० डिग्री उणे तापमानात बर्फावर पळून पूर्ण करण्याच्या शर्यतीला तुम्ही काय म्हणाल मला सांगा?

होय, दरवर्षी अल्बेट्रॉस अ‍ॅडव्हेंचर नावाची कंपनी ऑक्टोबर महिन्यात ग्रीनलँड देशात ही शर्यत भरवते. २००१ या वर्षापासून ही शर्यत जगभरातील अ‍ॅथलिटस्ना मोह पाडते, कारण ही शर्यत तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कठोर सत्त्वपरीक्षा बघते. पोलर सर्कलच्या जवळ चालू होणारी ही शर्यत स्पर्धकांना सतत बर्फावरून पळायला लावते आणि त्याबरोबर कधीकधी पोलर अस्वलाचं दर्शनही घडवते.

पोटाच्या विकारांच्या शस्त्रक्रिया करण्यात तरबेज असलेल्या डॉक्टर उत्क्रांत कुर्लेकर यांनी वयाची ५५ वर्षं उलटून गेली असताना ही पोलर सर्कल मॅरेथॉन पूर्ण करून आश्चर्याने तोंडात बोट घालायची वेळ आणली आहे. बऱ्‍याच मॅरेथॉन शर्यतींत भाग घेतल्यावर उत्क्रांत कुर्लेकरना पोलर सर्कल मॅरेथॉनने भुरळ पाडली. ६ तास ४ मिनिटांत शर्यत पूर्ण केल्यावरही डॉक्टर उत्क्रांत बढाया मारत नाहीत. ‘‘अरे मला जी शर्यत पूर्ण करायला ६ तास लागले, ती शर्यत खरे तरबेज आणि तंदुरुस्त अ‍ॅथलिट्स तीन तासांच्या आसपास वेळेत पूर्ण करतात, त्यामुळे माझं कौतुक करण्यासारखं काहीच नाहीये,’’ डॉक्टर उत्क्रांत नम्रतेने सांगतात, जे ऐकल्यावर लाजायला होतं.

खूप लोकांना असे प्रयत्न करणं हा अचरटपणा वाटत असेल, जो मला भारावून टाकणारा अनुभव वाटतो. तंदुरुस्ती राखायचं आणि स्वतःच्याच क्षमतेला आव्हान देण्याचं लागलेलं वेड मला मोह पाडतं आहे. जेव्हा प्रीती म्हस्केंसारखी गृहिणी किंवा योगेश पंचवाघ - उत्क्रांत कुर्लेकरांसारखे प्रथितयश डॉक्टर आपल्या कामातून वेळ काढून असा छंद जोपासतात, तेव्हा भारावून जायला होतं. वाटतं की, हे वेड चांगलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT