सप्तरंग

काहे को दे दी जुदाई?

हिरामण (राज कपूर) हा एका गावातला गरीब, भोळाभाबडा गाडीवान; पापभीरू या शब्दाचं मूर्तिमंत प्रतीक असलेला, बैलगाडीतून मालवाहतूक करून गुजराण करणारा.

डॉ. सुनील देशपांडे

हिरामण (राज कपूर) हा एका गावातला गरीब, भोळाभाबडा गाडीवान; पापभीरू या शब्दाचं मूर्तिमंत प्रतीक असलेला, बैलगाडीतून मालवाहतूक करून गुजराण करणारा.

महाभारतातल्या ‘यथा काष्ठं च काष्ठं च...’ या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे, महासागरात लाकडाचे दोन तुकडे एकत्र येतात आणि लाटेच्या तडाख्याने दूर फेकले जातात, त्याप्रमाणे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात. ‘गदिमां’नी हाच आशय ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट... एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ’ (‘पराधीन आहे जगती’) या ओळींमधून व्यक्त केला आहे. थोडक्यात, भेट किंवा मिलन ही तात्कालिक गोष्ट असून, वियोग हेच चिरंतन सत्य आहे.

‘मारे गये गुलफाम’ या कथेत हिरामण आणि हिराबाई या दोघांच्या असफल प्रेमाची कहाणी रंगवताना लेखक फणीश्वरनाथ रेणू यांच्या मनात महाभारतातला हाच दृष्टांत होता काय, ठाऊक नाही; पण हिंदी साहित्यात एक ‘अक्षयलेणं’ होऊन बसलेल्या या कथेनं अनेक पिढ्यांवर गारुड केलंय हे मात्र खरं. ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या तालमीत तयार झालेले बासू भट्टाचार्य एका रात्री ही कथा वाचून एवढे भारावून गेले, की त्याच रात्री त्यांनी ती सलग दुसऱ्‍यांदा वाचून काढली. दुसरा दिवस उजाडला तेव्हा या कथेवर ‘तिसरी कसम’ हा चित्रपट बनवायच्या कल्पनेनं ते झपाटले होते. त्यांना भेटायला आलेले गीतकार शैलेन्द्र यांनादेखील ही कथा इतकी आवडली की, बासूंच्या कल्पनेतल्या या चित्रपटासाठी चक्क निर्माता होण्याची तयारी त्यांनी दर्शविली. तिकीटबारीवर जबर अपयश येऊनही या चित्रपटाची एवढी चर्चा झाली की, पुढं रेणू यांची ही कथा ‘तिसरी कसम’ या नावानंच ओळखली जाऊ लागली.

हिरामण (राज कपूर) हा एका गावातला गरीब, भोळाभाबडा गाडीवान; पापभीरू या शब्दाचं मूर्तिमंत प्रतीक असलेला, बैलगाडीतून मालवाहतूक करून गुजराण करणारा. मोठा भाऊ आणि भावजय यांच्यासोबत राहणाऱ्या हिरामणचं बालपणी लग्न झालेलं असतं; पण त्याची नवरी नांदायला येण्याच्या आदल्या दिवशी मरण पावते, तेव्हापासून पुन्हा लग्न करायचं राहूनच जातं. काळ्या बाजारातल्या मालाची वाहतूक करताना पोलिसांच्या तावडीत सापडलेला हिरामण रातोरात गाडी सोडून बैलांसोबत पळ काढतो, तेव्हा यापुढं अशी कामं न करण्याची ‘पहिली शपथ’ तो घेतो. दुसऱ्या घटनेत, तो करत असलेल्या बांबूच्या वाहतुकीमुळे टांगेवाल्याचा अपघात होतो, तेव्हापासून बांबूची वाहतूक करण्याबाबत त्यानं कानाला खडा लावलेला. ही ‘दुसरी शपथ’.

मालवाहतुकीचं हे लचांड कायमचं संपवण्यासाठी थोडी रक्कम हाती येताच तो नवीन, छताची बैलगाडी विकत घेऊन प्रवाशांची ने-आण सुरू करतो. अशाच प्रसंगात त्याला भेटते हिराबाई (वहिदा रहमान); नावाजलेली नौटंकी कलावंतीण, नावाप्रमाणेच हिऱ्यासारखी लखलखीत आणि चाफ्याच्या फुलासारखी टवटवीत. बाई तशी पैसेवाली; पण एक नौटंकी कंपनी सोडून लपून-छपून दुसऱ्या कंपनीत जात असल्यानं इतरांना रेल्वेनं पाठवून तिने बैलगाडीचा प्रवास पत्करलेला. वीस कोसांचं अंतर पार करताना त्या दोघांना परस्परांची नवी ओळख होते. दोघं प्रेमात पडतात. तो तिच्या दिव्य सौंदर्यावर, ग्रामोफोनच्या तबकडीची आठवण करून देणाऱ्या मंजूळ ( ‘फेनुगिलासी’) स्वरावर भाळतो, तर ती त्याच्या भोळ्याभाबड्या रूपावर आणि निर्मळ, सुरेल गाण्यावर लुब्ध होते. या प्रवासात तिला जो तो गाताना दिसतो. त्याचं म्हणणं, ‘फटे कलेजा गाओ गीत, दुख सहने की यही रीत!’ मुक्कामाला पोचल्यानंतर हिराबाईचे नौटंकीचे खेळ सुरू होतात. तिच्या आग्रहाखातर हिरामणदेखील नौटंकीचा आनंद घेऊ लागतो. जमेल तितका कामधंदा करून मिळालेले पैसे तो तिच्यापाशी ठेवतो. त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा तिचा विचार असला, तरी हा मार्ग तेवढा सोपा नसतो. हिराबाईवर वाईट नजर असलेला गावातला जमीनदार बळजबरीनं तिला हवेलीवर नेऊ पाहतो. तो डाव हाणून पाडला तरी त्याच्याशी कायमचं वैर घेणं परवडणारं नसतं. मधल्या काळातल्या काही कटू प्रसंगांनंतर हिरामण तिला सोडून घरी परत जातो खरा; पण तिची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नाही.

एका बाजूला हिरामणसाठी झुरणारा जीव आणि दुसऱ्या बाजूनं जमीनदाराकडून मिळणाऱ्या धमक्या अशा कात्रीत सापडलेली हिराबाई अखेर हिरामणला विसरून जायचं ठरवते. ही कंपनी सोडून पुन्हा जुन्या कंपनीत जायचा निर्णय ती घेते. जाण्याआधी हिरामणला सांगावा धाडते, ‘मी सोडून निघाल्येय, एकदा भेटून जा.’ निरोप मिळाल्यानं हिरामण येतो; पण कंपनीत तिच्या जागी आता दुसरीच कुणी असते. हिराबाई त्या दिवशीच्याच गाडीनं जाणार असल्याचं त्याला कळतं. जिवाच्या आकांतानं बैलगाडी पळवत तो स्टेशन गाठतो. तिची गाडी निघता निघता तो पोचतो. त्याला बघून ती असोशीनं खाली उतरते. त्याचे सांभाळून ठेवलेले पैसे परत करते, आपली शाल त्याला भेट देते, प्रेमानं समजूत घालून त्याचा निरोप घेते. गाडी सुटते. एक शब्दही न बोलता हिरामण सुन्न होत दूर जाणाऱ्‍या गाडीकडे बघत राहतो. त्याच अवस्थेत स्टेशनबाहेर येऊन बैलगाडी जुंपतो. बैलांना हाकण्यासाठी चाबूक उगारताच मागून तिचा आवाज येतो, ‘नका, मारू नका...’ तो चमकून मागं बघतो; पण तो भासच असतो. त्याचे बैलही जणू निघायला नाखूष असावेत. हिरामण तिरीमिरीनंच त्यांच्यावर ओरडतो, ‘मागं वळून काय बघताय? खा शपथ, पुन्हा कधी कंपनीच्या बाईला गाडीत बसवणार नाही म्हणून!’ ही त्याची ‘तिसरी कसम’! इथं चित्रपट संपतो.

हिरामण आणि हिराबाई यांची ताटातूट हा खरंतर हुरहूर लावणारा; पण या कथेला (आणि चित्रपटालाही) उत्तुंग कलात्मक पातळीवर नेणारा हळुवार प्रसंग. तो ज्यांना सुचला ते लेखक फणीश्वरनाथ रेणू तर श्रेष्ठच; पण हा शेवट जसाच्या तसा चित्रपटात ठेवल्याबद्दल दिग्दर्शक बासू भट्टाचार्य आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे निर्माते शैलेन्द्र यांनाही सलाम! चित्रपटात हा शेवट ठेवू नये, तो ‘सुखांत’ असावा, असा सल्ला हिरामण साकारणाऱ्‍या राज कपूर यांनी दिला होता. नायक-नायिका शेवटी एकत्र येत नाहीत हे आपल्या प्रेक्षकांना रुचणार नाही, असं त्यांचं म्हणणं. यामागे केवळ धंद्याचं गणित होतं, की चित्रपट अपयशी ठरून आपला जिवलग मित्र आणखी गाळात जाऊ नये, ही तळमळ? (स्वतः राज यांना पूर्वी ‘आह’च्या वेळी नायकाचा मृत्यू असलेला शेवट बदलणं भाग पडलं होतं.) ते काही असो; बासू आणि शैलेन्द्र या दोघांनीही राज कपूरचा सल्ला मानला नाही. चित्रपट आहे त्या शेवटासहच प्रदर्शित झाला. नायक-नायिकेचं प्रेम सफल झालेलं दाखवलं असतं तर? ‘....आणि मग ते सुखानं नांदू लागले’ छाप शेवट असलेल्या शेकडो चित्रपटांमध्ये आणखी एकाची भर पडली असती, दुसरं काय!

या चित्रटातली काही लोकप्रिय गाणी

* सजन रे झूठ मत बोलो

* दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में

* सजनवा बैरी हो गये हमार* आ आ भी जा, रात ढलने लगी

* पान खाये सैयां हमारो

* चलत मुसाफिर मोह लिया रे

* लाली लाली डोलिया में

* हाय गजब कहीं तारा टूटा

(सदराचे लेखक हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आणि सुगम संगीताचे जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT