anthony fauci and joe biden
anthony fauci and joe biden Sakal
सप्तरंग

सुप्रशासन हीच गुरुकिल्ली!

सुनीता नारायण saptrang@esakal.com

कोरोनाच्या विषाणूमध्ये होत जाणारे बदल आणि अमेरिकेतला सत्ताबदल या दोन्ही घटना जवळपास एकाचवेळी घडत होत्या. जानेवारीच्या मध्यावधीत अमेरिकेत दर दिवशी जवळपास दोन लाख नवीन कोरोनाबाधित आढळत होते. २० जानेवारी रोजी जो बायडेन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रं आपल्या हाती घेतली आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत दरदिवशी आढळणारी नवी रुग्णसंख्या ५० हजारापर्यंत खाली आली.

आता अनेकजण यावर असाही युक्तिवाद करतील, की अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आधीच उच्चांक गाठल्यामुळे हळूहळू ती ओसरणे हे नैसर्गिकच होते. पण वस्तुस्थिती अशी आहे, की कोरोना साथीला अटकाव करण्यात ‘सुप्रशासन’ हा एक कळीचा मुद्दा आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विषाणूसंदर्भातील सर्व शास्त्रीय पुरावे धुडकावून लावले आणि सार्वजनिकरीत्या सभा-मेळावे घेऊ नका आदी सल्ले धुडकावून लावले, इतकंच नव्हे, तर मास्क वापराचेही सर्व नियम धाब्यावर बसवले. बायडेन आल्यावर मात्र हे चित्र बदलले. प्रत्येक सरकारी कामकाजाच्या बैठकीत ते काटेकोरपणे मास्कचा वापर करतात. स्वतः देशाचा अध्यक्ष जेव्हा गांभीर्याने आणि जबाबदारीने वागतो, तेव्हा नागरिकांमध्ये तसं वागण्याचा संदेश नक्की पोचतो. त्यामुळे खूप मोठा फरक पडतो. एवढंच नाही, तर अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्याचे ध्येय ठेवून सरकार झपाटून कामाला लागले. ११ मेपर्यंत देशातील सुमारे ३६ टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले, आणि जुलैपर्यंत सर्व नागरिकांना लस मिळेल, असे सरकारचे ध्येय आहे. याचाच अर्थ अमेरिकेचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होण्याच्या मार्गावर येत आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा उसळी मारली, आणि अमेरिकी प्रशासनाने त्यावरून काही धडेही घेतले. ज्येष्ठ वैज्ञानिक सल्लागार अँथनी फौसी यांनी अमेरिकेच्या सिनेट सदस्यांना असे सांगितले, की या विषाणूचं गांभीर्य पुरेसं लक्षात न घेता निष्काळजीपणे वागणे, ही भारताची सर्वांत मोठी आणि गंभीर चूक ठरली. भविष्याचा कसलाच विचार न करता, अंदाज न घेता भारतात पूर्वीप्रमाणेच व्यवहार सुरू करण्यात आले, लॉकडाउन उठल्यानंतर लोक बेदरकारपणे वागू लागले, जणू काही संकट पूर्णपणे संपलेलेच आहे !

आता अमेरिकी प्रशासन कोरोनासंदर्भातील दीर्घकालीन उपाययोजनांवर गंभीरपणे विचार करत आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा गती देतानाच सार्वजनिक आरोग्य सुविधांवर अधिक खर्च आणि गुंतवणूक करण्यावर त्यांचे काम चालू आहे. शिवाय आपले नागरिक यापुढेही या विषाणूपासून सुरक्षित राहावेत, यासाठी लशीच्या ‘बूस्टर शॉट्स’वर काम सुरू आहे. आत्ता, हे सारे लिहीत असतानाही माझ्या कानावर सतत रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सच्या सायरनचे आवाज पडत आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करत जाणाऱ्या विषाणूचे थैमान बघत बघत मी हे लिहिते आहे. रोजचा दिवस हा नवी भीती आणि साशंकता घेऊन येतो आहे. रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा संपल्यावर किंवा ऑक्सिजन यंत्रणा कोलमडल्यावर प्राणवायूअभावी तडफडून मरणारे रुग्ण आम्ही पाहिले आहेत. स्मशाने ओसंडून वाहत असताना रुग्णाच्या मित्र आणि नातेवाईकांची आपल्या माणसाला शेवटचा निरोप देण्याची केविलवाणी धडपड पाहिली आहे. अशा अनेक भीषण घटना आणि बातम्यांचे आम्ही साक्षीदार आहोत.

नदीच्या पाण्यातून तरंगत जाणारे मृतदेह आम्ही पाहिले आहेत. इथे राज्य आणि केंद्र सरकारांमधील रस्सीखेच आणि संघर्ष सोडून द्या, याचं मूळ कारण हेच आहे की मृतांची संख्या या दुसऱ्या लाटेत प्रचंड वाढली आणि आपल्याकडे मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावण्याची सोय आणि जागा, स्मशाने उपलब्ध नाहीत. मानवी जीवनाचे हे भोग कधी न विसरता येण्याजोगे आहेत. आता तर या विषाणूने ग्रामीण भागातही हातपाय पसरले आहेत. मागच्या वर्षी आपल्याला खात्रीने वाटत होते की ग्रामीण भागातील लोकांची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली असल्यामुळे आणि ते निसर्गाच्या अधिक जवळ असल्यामुळे हा विषाणू त्यांच्यावर फारसा परिणाम करू शकणार नाही. काही दिवस चित्र तसेच होते, कोरोना अजून त्याच्या घरापर्यंत आला नव्हता. परंतु ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधांचा अभाव आणि अशा आपत्तीशी लढण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे तेथे हे संकट पोचल्यास पुढील लढा कठीण जाऊ शकतो, असे इशारे देण्यात आले होते. परंतु तेंव्हा तसे न घडल्यामुळे लोक गाफील राहिले. ‘हा श्रीमंतांचा आजार आहे’ असेही म्हटले जाऊ लागले. परंतु फार काळ ही परिस्थिती टिकली नाही. आता हा विषाणू सर्वदूर जाऊन पोचला आहे, गावात, खेड्यात जिथे आरोग्य सुविधा, टेस्टिंगच्या सोयीही उपलब्ध नाहीत. हे दुःस्वप्नातीलही एक दुःस्वप्न आहे, असे मी म्हणेन. आपण लवकरच या महासाथीवरही मात करू, आणि विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल, करतेच आहे ही मला खात्री आहे. पण कशाची किंमत देऊन? आप्तस्वकीयांना गमावण्याच्या दुःखातून हजारो कुटुंबे गेली आहेत, आत्ताही जात आहेत. ज्या कुटुंबाने घरातील एकमेव कमावती व्यक्ती गमावली आहे, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांमधील कर्त्या व्यक्तीच विषाणूला बळी पडल्या आहेत, त्यांनी काय करायचे? लहान मुले अनाथ झाली आहेत, त्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहायचे? हे शब्द नुसते लिहितानाही मनाचा थरकाप उडतो आहे. कोणाची चूक, काय बरोबर, भूतकाळातील चुका हे सारे उगाळत बसण्याची आत्ता वेळ नाही. दोषारोप करून उपयोग नाही.

प्रश्न एवढाच आहे, की त्या चुकांमधून योग्य ते धडे घेऊन भविष्यात आपण सक्षमपणे परिस्थितीला सामोरे जाणार आहोत का? जर याचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर अजून एक न भूतो न भविष्यती अशी लाट येऊन आपल्याला गिळंकृत करेल.

आपण निसर्गावर मात केली आहे, असा फाजील आत्मविश्वास बाळगण्याएवढे औद्धत्य आपल्यात नक्कीच आहे. त्यामुळे आता पुढील काही गोष्टी आपण शिकायला आणि मनावर घ्यायलाच हव्यात : पहिली गोष्ट म्हणजे, आपण आपल्या वैज्ञानिक संस्थांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या आपले शास्त्रीय मत मांडू शकतील आणि नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करू शकतील. यामुळे राज्यकर्त्यांनी आपल्या परस्परविरोधी हितसंबंध आणि संघर्षांमुळे या बाबींकडे जरी कानाडोळा केला तरी शास्त्रीय पुराव्यांच्या बाबतीत तडजोड करावी लागणार नाही. दुसरा मुद्दा, आपण आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी काही ठोस पावले उचलणार आहोत का? ( यात टोकन गिफ्ट म्हणून व्हेंटिलेटर्स पाठवणे या गोष्टीचा समावेश होऊ शकत नाही, शिवाय एका खात्रीशीर बातमीनुसार हे व्हेंटिलेटर्स पुरेसे कार्यक्षमदेखील नाहीत) जे करायला हवे हे नुसते माहीत आहे, ते आता प्रत्यक्षात केले गेले पाहिजे. महासाथीच्या काळात भारताची उडणारी दाणादाण ही लज्जास्पद नाही, तर परिस्थिती सुरळीत असतानाही निकृष्ट अवस्थेत असणारी आपली आरोग्यव्यवस्था हा खरा शरमेचा मुद्दा आहे.

तिसरी गोष्ट, आपण वेगाने आणि प्रभावी लसीकरण राबवून या विषाणूला हरवणार आहोत का? केंद्र सरकारने काढलेल्या निविदांद्वारे हे काम प्रभावीरीत्या होऊ शकेल. जेणेकरून आपण सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करू शकतो. यासाठी सध्या विविध लशींवरून आणि त्यांच्या खरेदीवरून चालू असणारा सावळा गोंधळ थांबायला हवा. चौथी गोष्ट ही की सुप्रशासनाची कला आपण केव्हा शिकणार आहोत? सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिकांनीही शोधलेल्या विविध कोरोनाप्रतिबंधक उपायांची आपल्याला रोज माहिती होत आहे. त्यांनी केवळ या प्रश्नाला भिडण्याचेच धाडस दाखवलेले नाही, तर विषाणूची दिशा बदलण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. हे केवळ मानवी चिकाटी आणि जिद्दीचे प्रतीक नाही, तर सुप्रशासनदेखील येथे महत्त्वाचे आहे. हेच लक्षात ठेवून आपण आता पुढेही वागले पाहिजे. हीच आता आपली आशा आहे. पण मिळालेला धडा कायम लक्षात ठेवून सातत्याने तसे वागणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे, हे आता विसरून चालणार नाही.

(सदराच्या लेखिका सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एनव्हायर्नमेंटच्या प्रमुख आणि पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)

(अनुवाद : तेजसी आगाशे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT