भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) जागतिक उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारातील मोठा हिस्सा काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून मोठं पाऊल टाकलं आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) जागतिक उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारातील मोठा हिस्सा काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून मोठं पाऊल टाकलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ‘गगनयान मोहिमे’ला ‘एलव्हीएम३-एम२’च्या यशामुळे बळ मिळालं आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ची या वर्षीची दिवाळीची सुरुवात मोठ्या धडाक्यात झाली. गेल्या दोन वर्षांपासून दाटलेलं कोरोनचं मळभ दूर सारून आपल्याकडील सर्वांत वजनदार उपग्रह प्रक्षेपक ‘एलव्हीएम३-एम२’चं गेल्या रविवारी (ता.२३) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ‘वन वेब’ या ब्रिटिश कंपनीचे ३६ दूरसंचार उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीरीत्या सोडण्यात आले. मध्यरात्री १२ वाजून सात मिनिटांनी झालेल्या प्रक्षेपणानंतर ७५ मिनिटांनी हे उपग्रह आपल्या कक्षेत सोडण्यात आले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणतः १६०० किलोमीटर ते २००० किलोमीटर उंचीवरील कक्षेला ‘लो अर्थ ऑर्बिट’ म्हणतात. या कक्षेमध्ये उपग्रह २७ हजार किलोमीटर प्रतितास वेगानं परिभ्रमण करतात.
यासाठी ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’नं (एनएसआयएल) ‘वन वेब’शी करार केला होता. एनएसआयएलची स्थापना २०१९ मध्ये झाल्यापासून त्यांचा हा पहिला करार होता, त्याचा पहिला टप्पा यशस्वी झाला ही त्यांच्यासाठीही समाधानाची बाब आहे. ‘वन वेब’ ही जगभरात दूरसंचारजाळं असलेली कंपनी आहे. ‘भारती एंटरप्रायझेस’ ही ‘वन वेब’मधील प्रमुख गुंतवणूकदार आहे. सरकारी सेवांना आणि खासगी उद्योगांना इंटरनेटसेवा देण्याचं काम ही कंपनी करते. भारतातही २०२३ पर्यंत दूरसंचारसेवा सुरू करण्याची घोषणा ‘वन वेब’नं केली आहे. ‘वन वेब’ नं एकूण ६४८ उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यातील १०८ उपग्रह ‘इस्रो’ अवकाशात सोडणार आहे. त्यांपैकी ३६ उपग्रहांचं प्रक्षेपण रविवारी करण्यात आलं. या ३६ उपग्रहांमुळे अवकाशातील त्यांच्या उपग्रहांची संख्या ४६२ झाली आहे. अमेरिकेतील उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ प्रकल्पाप्रमाणे हा प्रकल्प असणार आहे. भविष्यातही ‘इस्रो’बरोबर काम करण्याची इच्छा ‘वन वेब’नं प्रदर्शित केली आहे.
बाहुबली ‘एलव्हीएम३-एम२’
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) हा भारताचा सर्वांत यशस्वी उपग्रह प्रक्षेपक आहे; परंतु वजनदार उपग्रह सोडण्याची त्याची क्षमता नाही. त्यामुळे ‘जिओसिक्रोनस सॅटेलाइट लॉँच व्हेइकल’ म्हणजेच ‘जीएसएलव्ही’ची निर्मिती करण्यात आली.
याच्या पहिल्या चाचण्या फारशा यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे त्यात सुधारणा करत ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या प्रक्षेपकाची निर्मिती करण्यात आली. आता त्याचं नामकरण ‘एलव्हीएम३-एम२’ असं करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये उपग्रह सोडण्याची क्षमता भारताकडे निर्माण झाली आहे.
‘एलव्हीएम३-एम२’ हा तीन टप्पे असलेला प्रक्षेपक आहे. यात पहिला टप्पा घनरूप इंधनाचा, दुसरा टप्पा द्रवरूप इंधनाचा, तर तिसरा टप्पा क्रायोजेनिक इंजिनाचा आहे. ‘एलव्हीएम३-एम२’चं वजन ६४१ टन आहे, त्याद्वारे चार टनांचा उपग्रह जिओसिक्रोनस कक्षेत, तर आठ टन वजनाचा उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडला जाऊ शकतो. त्यामुळेच याला ‘बाहुबली’ असंही संबोधलं जातं.
या कक्षांचे उंचीनुसार तीन प्रकार आहेत
1) निम्नस्तरीय कक्षा : पृथ्वीच्या वातावरणात १६० ते २००० किलोमीटर. उंचीदरम्यान असलेली कक्षा.
2) मध्यमस्तरीय कक्षा : पृथ्वीच्या वातावरणात २००० ते ३५७८६ किलोमीटर. उंचीदरम्यान असलेली कक्षा. पृथ्वीच्या पृष्ठापासून वातावरणात ३५७८६ किलोमीटर. उंचीवरून उपग्रहांबरोबर पृथ्वीच्याच गतीनं पृथ्वीभोवती फिरता येते.
3) उच्चस्तरीय कक्षा : पृथ्वीच्या वातावरणात ३५७८६ किलोमीटरपासून पुढील उंचीदरम्यान असलेली कक्षा.
पृथ्वीला केंद्रबिंदू मानून म्हणजेच पृथ्वीभोवती वर्तुळाकार फिरण्याची कक्षा दोन प्रकारांत केलेली आहे.
(१) विषुववृत्तीय कक्षा, (२) ध्रुवीय कक्षा ( पृथ्वीला समांतर आणि लंब दिशेत असलेल्या कक्षा).
भूस्थिर कक्षा : विषुववृत्तीय प्रतलाच्या संदर्भानं विषुववृत्तीय कक्षेत किंवा समांतर अवस्थेत पृथ्वीच्या फिरण्याबरोबरच उपग्रहाचीही असलेली फिरण्याची कक्षा भूस्थिर (जिओस्टेशनरी) कक्षा म्हणून संबोधली जाते. विषुववृत्तीय कक्षेतील भूस्थिर कक्षेबाबत विषुववृत्तापासून उत्तर किंवा दक्षिण दिशेनं सुमारे सहा अंशांपर्यंत असलेली कक्षा भूस्थिर कक्षाच मानली जाते. भूस्थिर अशी संज्ञा देण्यामागील कारण म्हणजे, पृथ्वीवरून पाहिलं असता या कक्षेत फिरणारे उपग्रह स्थिर भासतात. मुख्यत्वे संदेशांच्या माध्यमातून दळणवळण साधणारे उपग्रह या कक्षेत असतात.
भूसमकालिक कक्षा : विषुववृत्तीय कक्षेत किंवा समांतर अवस्थेत नसलेला मात्र पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या किंवा परिवलनवेळेशी (२३ तास, ५६ मिनिटं, ४ सेकंद) सुसंगतपणा राखत पृथ्वीबरोबर फिरण्याचा मार्ग भूसमकालिक (जिओसिंक्रोनस) कक्षा म्हणून ओळखला जातो. भूसमकालिक कक्षेत उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात पृष्ठापासून ३५७८६ किलोमीटर उंचीवर असतो.
या कक्षाप्रकारात २०२०० किलोमीटर उंचीवरील कक्षेचं अर्धभूसमकालिक (सेमी-जिओसिंक्रोनस) कक्षा म्हणून वर्गीकरण केलं जातं.
‘इस्रो’वर भरवसा
‘एलव्हीएम३-एम२’च्या यशानं या वर्षीचं सात ऑगस्टचं ‘एसएसएलव्ही’चं अपयश बाजूला सारलं गेलं. प्रक्षेपणानंतर काही काळातच ‘एसएसएलव्ही’चा डेटा मिळणं बंद झालं होतं, तसंच त्याचा संपर्क तुटला होता. काही वेळा अपयश पदरात पडलं असलं तरी ‘इस्रो’ ही जगातील अत्यंत विश्वासार्ह अवकाश संशोधन संस्था म्हणून गणली जाते. या वर्षी ऑगस्टपर्यंत ‘इस्रो’नं ८४ मोहिमा केल्या. त्यापैकी ६७ यशस्वी, पाच अंशतः यशस्वी, तर केवळ दहा मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. याशिवाय १०० हून अधिक परदेशी मोहिमांत ‘इस्रो’चा सहभाग होता.
क्षमता वाढवावी लागणार
‘एलव्हीएम३-एम२’ प्रक्षेपकाद्वारे जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात सोडता येणार असले तरी जागतिक पातळीचा विचार करता हा मध्यम क्षमतेचा उपग्रह प्रक्षेपक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, ‘स्पेस एक्सच्या फाल्कम-९’चं देता येईल. त्या प्रक्षेपकाद्वारे २३ हजार किलो वजनाचा उपग्रह अवकाशात सोडता येऊ शकतो, त्यामुळे ‘एलव्हीएम३-एम२’ची क्षमता भविष्यात वाढवावी लागणार आहे.
किफायतशीर
उपग्रह प्रक्षेपक जेवढा विश्वसनीय तेवढीच त्याची वजन नेण्याची क्षमताही महत्त्वाची असते, तसंच तो किती किफायतशीर आहे यालाही महत्त्व आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही) लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये एक किलो वजन (पेलोड) घेऊन जाण्याचा खर्च साधारणपणे १४ लाख रुपये आहे, तर ‘एलव्हीएम३-एम२’द्वारा हाच खर्च ५.७ लाख रुपये एवढाच आहे. ‘नासा’च्या ‘अॅडव्हान्स्ड् स्पेस ट्रान्स्पोर्टेशन प्रोजेक्ट’द्वारा दिल्या गेलेल्या माहितीनुसार, एक पाऊंड (साधारण अर्धा किलो) वजन अवकाशात घेऊन जाण्यासाठी १० हजार डॉलर, म्हणजे साधारणतः आठ लाख रुपये खर्च येतो. हा खर्च १०० पटींनी कमी करण्याचं त्यांनी लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळे बहुतेक सर्व अवकाश संशोधन संस्था फेरवापर करता येणाऱ्या प्रक्षेपकांचा वापर करण्याचा आग्रह धरत आहेत. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांच्या मते, फेरवापर करता येणारा प्रक्षेपक वापरला तर हा खर्च दहा पटींनी कमी होऊ शकतो; परंतु भारत या तंत्रज्ञानापासून खूप दूर आहे. भारतानं यासाठी ‘न्यू जनरेशन लॉँच व्हेइकल’ (एनजीएलव्ही) तयार करण्याची योजना आखली आहे; परंतु यावर दशकभरात काम होणं अवघड असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
जागतिक बाजारपेठेची स्थिती
जागतिक उपग्रह प्रक्षेपणाची बाजारपेठ ३६० अब्ज डॉलरच्या घरात आहे. ती पुढील २०३० पर्यंत ४४२ अब्ज डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. कोरोनाकाळात त्यात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, आता या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. जागतिक बाजारपेठेतील केवळ दोन टक्के वाटा भारताचा आहे. तो वाटा आठ टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारनंच लोकसभेत ही माहिती दिली होती.
उपग्रहप्रक्षेपणाच्या क्षेत्रातील भारताचा हिस्सा २०२५ पर्यंत १२.८ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता ‘डेव्हलपिंग द स्पेस इकोसिस्टिम इन इंडिया : फोकसिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ’ या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. छोट्या उपग्रहांची वाढती मागणी हे याचं प्रमुख कारण असेल.
अवकाश संशोधनक्षेत्राशी संबंधित १०० स्टार्टअप भारतात सुरू झाले आहेत. त्यांचाही या वाढीत हातभार असणार आहे.
भारताच्या जीडीपीच्या ०.२३ टक्केच हिस्सा ‘इस्रो’साठी खर्च केला जातो. कोरोनाकाळामुळे ही तरतूद कमी झाली असल्याचे ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज्’चं निरीक्षण आहे. जीडीपीच्या तुलनेत अवकाश संशोधनावरील तरतूद वाढवल्यास जागतिक बाजारपेठेतील भारताचा हिस्साही वाढू शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अमेरिकेशी, चीनशी स्पर्धा
उपग्रहप्रक्षेपणाच्या क्षेत्रात भारताची सर्वात जास्त स्पर्धा अमेरिकेशी व चीनशी असणार आहे. ‘इस्रो’ आणि तिच्या उपकंपन्या सोडून उपग्रहप्रक्षेपणाच्या क्षेत्रात नऊ-दहा मोठ्या कंपन्या जागतिक पातळीवर कार्यरत आहेत. त्यांत फ्रान्सची ‘एरीनस्पेस’, चीनची ‘चायना ग्रेट वॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन’, जर्मनीची ‘युरोकोट लॉँच सर्व्हिस’, रशियाची ‘कोसमोट्रास’, जपानची ‘मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज्’, आणि अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल लाँच सर्व्हिसेस इन्कॉर्पोरेशन’, ‘ऑर्बिटल एटीके’, ‘स्पेस एक्स’, ‘यूएस स्पेसफ्लाइट इंडस्ट्रीज’ यांचा समावेश आहे. भारताच्या ‘अँट्रिक्स’ व ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ या ‘इस्रो’च्या व्यावसायिक शाखांना मोठ्या जागतिक स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे.
नव्या प्रक्षेपकाच्या निर्मितीचे ध्येय
‘एलव्हीएम३-एम२’च्या यशानंतर ‘इस्रो’नं नव्या मोहिमेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बाजारातील विश्वसनीय उपग्रहप्रक्षेपकांची वाढती गरज लक्षात घेऊन किफायतशीर आणि अत्याधुनिक अशा प्रक्षेपकाच्या निर्मितीवर काम सुरू झालं आहे. ‘इंडिया स्पेस काँग्रेस’मध्येच ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याची माहिती दिली. सध्या आराखड्यावर काम सुरू आहे. एक किंवा दोन वर्षांत नवा प्रक्षेपक तयार होण्याची शक्यता आहे.
याशिवाय लघु उपग्रह प्रक्षेपकवाहन अर्थात् ‘एसएसएलव्ही’च्या चाचण्या लवकरच करण्यात येणार आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर त्यामार्फतही उपग्रहप्रक्षेपणाची सोय उपलब्ध होईल. ध्रुवीय उपग्रहप्रक्षेपक अर्थात् पीएसएलव्ही हा भारताचा सर्वांत यशस्वी प्रक्षेपक आहे. त्याचाही वापर सुरू आहे; परंतु ज्या वेळी ‘जिओसिंक्रोनस लॉँच व्हेइकल’चा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा भारताला मर्यादा येतात. ‘एलव्हीएम३-एम२’द्वारे त्यावर मात करता येईल. सध्या ‘एलव्हीएम३-एम२’द्वारे दोन वेळा प्रक्षेपणं करता येतात; परंतु, पुढील वर्षात ही संख्या सहावर आणि त्यापुढील दोन वर्षांत ती संख्या वर्षाला १२ पर्यंत नेण्याचं ‘इस्रो’चं उद्दिष्ट आहे.
‘कृषी’साठी उपग्रहाचा प्रस्ताव
भारतातील कृषिक्षेत्र प्रामुख्यानं मॉन्सूनवर अवलंबून आहे; त्यामुळे त्यात अनिश्चितताही मोठ्या प्रमाणावर आहे. या क्षेत्राच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी दोन उपग्रह अवकाशात सोडण्याचा प्रस्ताव ‘इस्रो’नं कृषी मंत्रालयाकडे दिला आहे. या प्रकल्पाला ‘भारतीय कृषी उपग्रह कार्यक्रम’ असं नाव देण्यात आलं आहे. हवामानाचा अंदाज, पीकपाहणी, नुकसानीची पाहणी, उत्पादनाचा अंदाज, जमिनीची पाहणी आदी गोष्टींसाठी हे उपग्रह वापरले जाऊ शकतील. सध्या आपल्याकडे असलेले उपग्रह इतर कामांसाठीही वापरले जात असल्यानं त्यांना मर्यादा येतात. फक्त ‘कृषी’साठी उपग्रह सोडल्यानं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.