book review
book review 
सप्तरंग

वयात येणाऱ्या मुलींच्या भावविश्वाचं चित्रण

स्वाती यादवाडकर

कुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी "कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन ऋतूंच्या दरम्यानचा काळ जसा बदलांचा असतो, तसाच मुलांसाठी जीवनातल्या दोन टप्प्यांना जोडणारा हा काळ असतो. ऋतुसंधीचा काळ! महाजन यांनी अबोध वयातल्या मुलींचं भावविश्व उलगडून सांगणाऱ्या अनेक घटना कथारूपानं सहज फुलवल्या आहेत. कुमारवयीन मुलींचा नाजूक कोलाहलाचा काळ शब्दात मांडत, वाचकाला या वयोगटातील मुला-मुलींकडं पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन या कथा देतात. वाचताना पालक म्हणून आपणही अंतर्मुख होत जातो.

एखादी कळी उमलताना तिच्यासाठी भोवतीची परिस्थिती, निसर्ग, झाडाची क्षमता, मिळणारं पोषण हे सगळेच घटक खूप महत्त्वाचे असतात. महाजन यांच्या प्रत्येक कथेतली कळी अशीच वेगवेगळ्या घरांतली आहे. तिच्याभोवतीची सामाजिक, आर्थिक स्थिती, घरातले नातेवाईक, शाळा, मित्र-मैत्रिणी यांचं भावविश्व या सगळ्यांचा तिच्या वाढीवर आपोआप परिणाम होत असतो. काही वर्षांपासून परदेशी असणारा बाबा घरी येतो, तेव्हा अडनिड्या वयातल्या प्रणिताला बाबाला स्वीकारणं सोपं नसतं. तिची ओढाताण समजून घेणारी आई ती आणि तिचे वडील यांच्यातला तणाव कसा समजुतदारपणे हाताळते, हे लेखिका मोठ्या खुबीनं मांडते. मुलांनाच नव्हे, तर पालकांनासुद्धा ही घालमेल सहजतेनं हाताळायला शिकवणारी "स्वीकार' ही कथा. "हा: हा: ही: ही:'मधल्या दिव्यासारखी अभिरुचीसंपन्न घरातली आनंदी मुलगी लेखिका एकीकडं साकारते, तर दुसरीकडं तितक्‍याच ताकदीनं नजरानाची विकल आणि हतबल घालमेल दुसऱ्या कथेत व्यक्त करते. "आनुवंशिक'सारखी कथा वाचताना डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.

मुलगा आणि मुलगी यांची लहानपणापासून घट्ट असलेली मैत्री, मुलं मोठी झाल्यावर, पौगंडावस्थेत आल्यावर हाताळणं ही मुलांपेक्षा पालकांसाठी खरोखर एक टास्क असते. पुस्तकातल्या काही कथा या मैत्रीचे कॅलिडोस्कोपप्रमाणं वेगवेगळे पैलू दाखवत जातात. सहजतेनं आणि सामंजस्यानं मुला-मुलींचं हे मैत्र त्यांना न दुखावता कसं हाताळायचं, फुलवायचं, योग्य वळणानं न्यायचं हे कथेतून सहजरीत्या उलगडत जातं. काही कथा तर मुलांपेक्षा पालकांना प्रकाशवाटेकडं नेतात, असं म्हटलं, तर ती अतिशयोक्ती होऊ नये. आईच्या माघारी मुलाला आणि मुलीला सांभाळणारे बाबा मुलगी वयात येण्याच्या काळात सैरभैर होतात. मुळात या काळात मुलीच्या वडिलांनी ही बाब कशी सांभाळून, समजून घेतली पाहिजे, मुलींची मानसिकता कशी ओळखली पाहिजे यावर नेमका प्रकाश "चोरी', "प्रतिज्ञा' या गोष्टींमधून टाकला गेला आहे.
स्वप्नातल्या जगात रमणारं हे वय. क्षणात हसणारं, रडणारं, स्वत:लाच सांभाळू न शकणारं वय. हल्लीच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात पालकांनासुद्धा या पिढीला सांभाळायला कठीण जातं आहे. यातून मुलं आणि पालक यांच्यात दरी निर्माण होताना दिसते आहे. मोबाईल , इंटरनेटवर रमणारा मुला-मुलींचा हा वयोगट नेमका घरापासून दूर आणि इतर गोष्टींकडं आकर्षिला जाताना दिसत आहे. ज्यावेळी मुलींना भावनिक, मानसिक आधाराची, घरच्यांच्या समजुतीच्या उबेची गरज असते, नेमकं तेव्हाच त्यांच्याकडं दुर्लक्ष होत आहे का, असे प्रश्न हल्ली पडतात. याचे विपरीत परिणामदेखील आपण समजात उमटताना पाहतो. अशा स्थितीमध्ये या छोट्या छोट्या कथा उत्तम समुपदेशकाचं काम करतात. सकारात्मक कथाबीज, नेमकं मनोविश्‍लेषण आणि नात्यांना बांधून ठेवणारं सूत्र यांमुळं "कळ्यांचे ऋतू' हा कथासंग्रह वेगळा ठरतो.

पुस्तकासाठी ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांनी अगदी नेमक्‍या शब्दांत अक्षरभाष्य केलं आहे. मलपृष्ठावर द. भि. म्हणतात तसं, "या बीजकथा आहेत. पालकांनी, कुमारिकांनी, शिक्षकांनी या बीजकथांच्या डोळ्यांनी स्वत:कडं पाहिले पाहिजे.' पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चितारलेली निसर्गाच्या वेगवेगळ्या रंगात रमलेली अल्लड, स्वमग्न कुमारिका अन्‌ तिच्याभोवती फुललेला फुलोरा अतिशय समर्पक आहे. प्रसन्न आहे.

आश्‍लेषा महाजन यांचं हे पुस्तक मानसशास्त्रीयदृष्ट्या; तसंच समुपदेशनासाठीदेखील उत्तम आहे. या पुस्तकाचे कुमारवयीन मुला-मुलींसाठी अभिवाचनाचे प्रयोग ठिकठिकाणी होतात. इतकंच नव्हे, तर लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या नभोवाणी केंद्रावर "कळ्यांचे ऋतू' ही कथामालिका प्रदर्शित होत आहे. लेखिकेनं म्हटल्याप्रमाणं "कळ्यांचे ऋतू' मिरवणाऱ्या समंजस झाडांना हा कथासंग्रह अर्पण असल्यानं प्रत्येक पालकांनी आपल्या घरी संग्रही ठेवावा, असा हा उत्तम कथासंग्रह आहे.

पुस्तकाचं नाव : कळ्यांचे ऋतू
लेखिका : आश्‍लेषा महाजन
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे (020-24450260)
पृष्ठं : 104, मूल्य : 130 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT