- संजय करकरे
अंगावर किंचित शहारे आणणाऱ्या थंडीत आमची जिप्सी सकाळी आगरझरी गेटमधून जंगलात शिरली. बांबूची दाट झाडी व त्यात लपलेले वेगवेगळे पाणवठे बघतच दोन तास संपले. इतक्यात दोन गाड्यांना कुठलातरी संदेश मिळाला आणि त्या झटक्यात जंगलातून बाहेर पडून मुख्य रस्त्याकडे गेल्या. आम्हीही त्यांच्या मागोमाग.
आमची गाडीही मुख्य रस्त्यावर लावली. शंभर फूट दूर रस्त्यावरून चार वाघ आमच्या दिशेने चालत येताना दिसले. या जंगलातील प्रसिद्ध असणारी ती ‘शर्मिली’ नावाची वाघीण होती. तिने तिच्या पिल्लांना रागावणे, फटकारणे, आक्रमण करणे यासह पकडापकडी हे सारे धडे देताना आम्ही बघितले. तो दिवस होता ३० ऑक्टोबर २०१८...
जंगलात वाघ बघायला मिळणे हे किती कठीण व दुरापास्त असते हे प्रत्यक्ष जंगलात फिरू लागल्यानंतरच समजते. मला आठवते, भर एप्रिल महिन्यात ताडोबामध्ये सातव्या सफारीला मी वाघ बघितला आहे. कितीतरी वेळा व्याघ्र प्रकल्पात वाघ न दिसताच परत आल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
ताडोबातील वाघ दिसलाच पाहिजे, अशा अट्टहासापोटी एका प्रसंगाला मला सामोरे जावे लागले. झाले असे की, आम्ही निसर्ग शिक्षणाचे काम करत होतो. त्यासाठी इंग्लंडमधील बॉर्न फ्री फाऊंडेशन संस्था मदत करीत होती.
त्यांना आमच्या कामाबाबत फिल्म करायची होती. ही सर्व कामे मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या काठावरील जंगलात असल्यामुळे साहजिकच त्या फिल्ममध्ये वाघ असणे हे अपरिहार्य होते. अत्याधुनिक कॅमेरे आणि छायाचित्रकारांची एक टीम मध्य भारतातील जंगलात हे सर्व टिपण्यासाठी दाखल झाली.
प्रत्येकाचे कामाचे शूटिंग झाले. कान्हा, पेंच (मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र) आणि अन्य व्याघ्र प्रकल्प बघूनही झाले; पण वाघ काही या टीमला टिपता आला नाही. अखेर ताडोबात हमखास वाघ दिसणार आणि संजय त्यांना वाघ दाखवणारच, या खात्रीने ही सर्व टीम मोहर्लीत दाखल झाली. माझ्यावर वाघ दाखवण्याची जबाबदारीच नव्हे तर चक्क दबाव आला होता.
ऑक्टोबर महिन्यातील तो शेवटचा आठवडा होता. पर्यटन सुरू होऊन काही दिवसच झाले होते. ताडोबातील कोअरमध्ये एक व बफरची एक सफारी मी राखून ठेवली होती. सायंकाळची सफारी कोअरमध्ये झाली.
हिरवेकंच जंगल, खळखळाट करत वाहणारे पाणी, नयनरम्य ताडोबा तलाव, त्यावरील सूर्य अस्ताला जात असणारा मनोहारी नजारा, अशी एक ना अनेक दृश्य आम्ही उघड्या गाडीतून टिपत होतो. वाघाला शोधण्यासाठी सर्वांची नजर भिरभिरत होती. काही मोजक्या तृणभक्षी प्राण्यांवरच गोऱ्या कॅमेरामनला समाधान मानावे लागले.
रात्री रिसॉर्टमध्ये गप्पांचा फड रंगला, पण फिरून फिरून विषय वाघ आणि त्याचे छायाचित्रण यावरच येऊन थांबत होता. आता खऱ्या अर्थाने माझेही टेन्शन वाढले. एवढ्या दूरवरून आलेले हे परदेशी पाहुणे वाघ न बघताच परत जाणार आणि कुठलेतरी वाघाचे फुटेज टाकून आपल्या कामाची फिल्म पूर्ण करणार, असे आता मलाही वाटू लागले होते. कोअरमध्ये वाघ दिसला नाही, बफरमध्ये काय दिसणार, मीही निराश झालो होतो. आमची सकाळची फेरी मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी बफरमध्ये होती.
अंगावर किंचित शहारे आणणाऱ्या थंडीत आमची जिप्सी सकाळी आगरझरी गेटमधून जंगलात शिरली. आगरझरीचे जंगल मला कमालीचे आवडते. या जंगलाचे बदलणारे रूप मी बघितले आहे. या परिसरात पूर्वी मुक्तपणे चरणाऱ्या गाई, सायकल व मोटरसायकलवरती फिरणारी माणसे येथे बघितली आहेत.
मात्र ताडोबाच्या बफर क्षेत्रात हा सर्व परिसर आल्यावर त्याचा झालेला कायापालट विस्मयकारक असाच आहे. जंगलाला संरक्षण दिले तर काय चमत्कार घडू शकतो हे येथे चांगले अनुभवता येते. इरई धरणाचे पसरलेले पाणी, पाण्याच्या काठावर असणारी गवती कुरणे, बांबूची दाट झाडी व या झाडीत लपलेले वेगवेगळे पाणवठे.
येथे सारेच अनोखे आहे. आताच्या सफारीत या कुठल्याही गोष्टींकडे माझे लक्ष नव्हते. गाईड आणि जिप्सी चालकाला आमचा उद्देश स्पष्ट शब्दांत सांगितल्यामुळे ते पण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. दोन तास झाले.
माझाही धीर संपत चालला होता. अंगात भिनलेली ओलसर थंडी नाहीशी झाली होती, पण इतक्यात दोन गाड्यांना कुठलातरी संदेश मिळाला आणि त्या झटक्यात जंगलातून बाहेर पडून मुख्य रस्त्याकडे गेल्या. आम्हीही त्यांच्या मागोमाग मुख्य रस्त्यावर आलो. रस्त्यावर एक गाडी थांबली होती.
आमची गाडी व अन्य दोन गाड्या त्या जिप्सीला खेटून लावल्या. साधारणत: शंभर फूट दूर रस्त्यावरून चार वाघ आमच्या दिशेने चालत येताना दिसले. माझ्या जिवात जीव आला. मनावरील ताण एकदम हलका झाला.
यानंतरचा पुढचा अर्धा तास ते वाघ, आमच्या दोन-चार गाड्या आणि तो छायाचित्रकार यांनाच जणू समर्पित होता. या जंगलातील प्रसिद्ध; पण भित्र्या स्वभावाची ती ‘शर्मिली’ नावाची वाघीण होती. सकाळी आठ सव्वाआठच्या सुमारास, सूर्याच्या अनोख्या प्रकाशात त्या परदेशी छायाचित्रकाराला असे काही सुंदर फुटेज मिळाले की त्याने मला मिठीच मारली.
यावेळी या वाघिणीने साधारणतः आपल्या अकरा-बारा महिन्यांच्या पिल्लांना जे काही धडे दिले ते आमच्या समोरच घडले. रागावणे, फटकारणे, लपतछपत आक्रमण करणे यासह पकडापकडी व पळापळी हे सारे आम्ही बघितले. एक पिल्लू जंगलाच्या आत गेले ते बाहेर आलेच नाही, पण उर्वरित दोन पिल्लांनी आणि ‘शर्मिली’ने सर्व खेळ ‘हाउसफुल’ केला. तो दिवस होता ३० ऑक्टोबर २०१८.
साधारणतः २०११-१२ च्या सुमारास जन्म झालेली ‘शर्मिली’ आगरझरीच्या जंगलाचे वैभव होती. २०२३ च्या पावसाळ्यात आगरझरी बफरला लागून असलेल्या वढोलीच्या प्रादेशिकच्या जंगलात तिचा मृत्यू झाला. येथील गाईडच्या म्हणण्यानुसार ताडोबाच्या जंगलात प्रसिद्ध झालेल्या ‘कॅटरिना’ म्हणजेच ‘पुछकटी’ वाघिणीचे ‘शर्मिली’ हे पिल्लू होते.
‘माधुरी’, ‘छोटी मधु’ यांच्या सहवासात, तसेच त्यांच्या सोबतीनेच ‘शर्मिली’ या बफरच्या जंगलात चांगलीच रमली. या परिसरात असणाऱ्या ‘खली’ तसेच ‘तारू’ नावाच्या नर वाघांसोबत तिने घरोबाही केला. आगरझरीच्या जंगलात गाईडचे काम करणाऱ्या मनोज मडावीने सांगितले की, या वाघिणीने आतापर्यंत पाच वेळा पिल्लांना जन्म दिला.
पहिल्या तीन वेळा तिचे मिलन ‘खली’ नावाच्या एका जबरदस्त आकाराच्या नर वाघासोबत झाले होते. ‘खली’ या नावातच सर्वकाही आले. पहिल्यांदा दोन, दुसऱ्यांदा तीन, तर तिसऱ्या वेळी तीन पिल्ले तिला झाली होती. २०२२ मध्ये ‘तारू’सोबत मिलन होऊन तिला चार पिल्ले झाली होती. मात्र ही चारही पिल्ले मोठी होऊ शकली नाहीत. कोळसा वनपरिक्षेत्रातून आलेल्या ‘शंभू’ नावाच्या नराने या सर्व पिल्लांना संपवले.
मी ५ जून २०२२ ला ही चारही पिल्ले आणि ‘शर्मिली’ याच जंगलातील ‘झरण’ नावाच्या पाणवठ्यावरती बघितले होते. सकाळी सातच्या सुमारास आमची एकटी जिप्सी या पाणवठ्यावर थांबली असतानाच दाट झाडीतून ही वाघीण चालत पाण्यावरती आली. तिच्यापाठोपाठ तिची साधारणतः चार महिन्यांची चारही पिल्ले सोबत होती.
पाणी पिऊन झाल्यावर दाट व ओलसर सावलीत ती आरामात झोपली. यानंतर अर्धा-पाऊण तास आम्ही या पिल्लांची पळापळी, दूध पिणे आणि वेगवेगळ्या तऱ्हा अनुभवत होतो. नंतर आम्ही ही जागा सोडून दुसरीकडे निघून गेलो.
या पिल्लांना नंतर नर वाघाने टप्प्याटप्प्याने मारण्यात आल्याचेही कानावर आले. जंगलांचा नियम काहीसा विचित्रच आहे. आपला वंश वाढवण्यासाठी, तो पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व प्राणिमात्रांची धडपड सुरू असते. त्यामुळे असे प्रसंग वाघांच्या जंगलात वारंवार घडत असतात.
‘शर्मिली’ या वाघिणीला तिच्या काहीशा घाबरट स्वभावामुळेच हे नाव येथील गाईडने दिले होते. सडपातळ शरीरयष्टी असणाऱ्या ‘शर्मिली’चा डावा डोळा, तिला झालेल्या जखमेमुळे काहीसा दबला होता. अन्य वाघिणींच्या तुलनेत तिचा चेहरा आकाराने लहान होता. डोळ्यावर जखम कधी झाली याबाबत एकवाक्यता नाही. शिकार करताना तिला जखम झाल्याचे सांगितले जाते.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी व देवाडा बफरक्षेत्र तेथे दिसणाऱ्या वाघांमुळे कमालीचे प्रसिद्ध झाले आहे. जंगलाचा हा परिसर अतिशय सुरेख असल्यामुळे आणि पाण्याची मोठी उपलब्धता असल्यामुळे या परिसरात सातत्याने वाघांचे वास्तव्य बघायला मिळते.
परिणामी या क्षेत्राकडे पर्यटकांचा ओढा गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढला आहे. या जंगलात आतापर्यंत ‘शर्मिली’ने सर्वाधिक दर्शन देऊन पर्यटकांना सातत्याने खूश केले होते. आता तिची उणीव येथे काम करणाऱ्या गाईडना जाणवत आहे.
काही वाघ फार मोठी कीर्ती अथवा नाव कमवत नसले तरी त्यांचा ठसा त्या परिसरावर कायम कोरला जातो. या ठशात मला ‘शर्मिली’ बघायला मिळाली.
(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.) sanjay.karkare@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.