saptrang sakal
सप्तरंग

सिरपूरचे सुरंग टीला मंदिर : गूढतेचा अविष्कार

सुरंग टिला मंदिर हे छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील सिरपूर शहरात स्थित सातव्या शतकात बांधले गेलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे.

शेफाली वैद्य (shefv@hotmail.com)

राउळी मंदिरी

आज आपण जे मंदिर बघणार आहोत ते अतिशय वेगळ्या बांधणीचे, एकमेवाद्वितीय असे मंदिर आहे. सुरंग टिला मंदिर हे छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील सिरपूर शहरात स्थित सातव्या शतकात बांधले गेलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. सुरंग म्हणजे भुयार आणि टीला म्हणजे छोटा डोंगर. संपूर्ण पांढऱ्या ग्रॅनाईटमध्ये चाळीस फूट उंचीच्या भव्य चौथऱ्यावर बांधलेले हे मंदिर प्रथमदर्शनी पहाता दक्षिण अमेरिकेतल्या माया संस्कृतीत आढळणाऱ्या पिरॅमिड सारखे दिसते. कुतूहलाची गोष्ट म्हणजे भारतीय पुरातत्वखात्यातर्फे ज्यांनी या मंदिराचे उत्खनन करून हे मातीत बुडलेले मंदिर जगासमोर आणले, त्या प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञ अरुण कुमार शर्मा यांच्यामते या मंदिराचे पूर्ण बांधकाम हे मायामत या भारतीय शिल्पशास्त्रातील प्राचीन ग्रंथानुसार झालेले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने २००७ मध्ये या मंदिराचे उत्खनन केले. तत्पूर्वी हे मंदिर मातीच्या एका विशाल ढिगाऱ्याआड लपलेले होते ज्याला स्थानिक लोक ’सुरंग टीला’ म्हणून ओळखत असत. लोकांची अशी धारणा होती की या ढिगाखाली एक भुयार आहे आणि त्यात शापित गुप्तधन लपलेले आहे.

मी हे मंदिर स्वतः अरुणकुमार शर्मा यांच्याबरोबर पाहिले. अरुणकुमार यांनी सांगितले की जेव्हा या ढिगाऱ्याचे उत्खनन सुरू होते तेव्हा शाप आणि अपमृत्यूच्या भीतीने कोणीही कामगार इथे उत्खनन करण्यास तयार नव्हता. शेवटी अरुणकुमार शर्मा यांनी स्वत: कुदळ घेऊन खोदकाम सुरू केले आणि त्यानंतरच कामगार कामाला तयार झाले.

महानदीच्या अगदी काठावर असलेले हे विशाल पश्चिमाभिमुख मंदिर पंचायतन शैलीत बांधलेले आहे. मंदिराला पाच गर्भगृहे आहेत ज्यापैकी चार गर्भगृहात चार वेगवेगळ्या दगडांपासून घडवलेली चार रंगांची शिवलिंगे आहेत - पांढरी, काळी, लाल आणि पिवळी आणि पाचव्या गर्भगृहात श्री गणेशाची मूर्ती आहे. ह्या पांचही गर्भगृहांना जोडणारा सभामंडप हा ३२ स्तंभांवर तोललेला होता पण आज हे सर्व स्तंभ कोसळलेले आहेत आणि त्यांचे अवशेषच काय ते आपल्याला दिसतात.

हे मंदिर सातव्या शतकात राजा महाशिवगुप्त बालार्जुनाने बांधले होते. सिरपूर किंवा श्रीपूर ही त्याची राजधानी होती. सुरंग टीला ह्या नावाने आज ओळखले जाणारे हे भव्य शिवमंदिर मायामत ह्या प्राचीन शिल्पशास्त्रातील ग्रंथानुसार बांधले गेले आहे. असे मानले जाते की देवांचा शिल्पी जो विश्वकर्मा, ह्याच्या पांच पुत्रांपैकी माया ह्या पुत्राने मायामत हा स्थापत्यशास्त्रावरचा ग्रंथ रचला. मायामातीतील सिद्धांतानुसार वर्णाश्रम पद्धतीनुसार चारी वर्णांना स्वतंत्र मंदिरे बांधायचा अधिकारहोता, आणि प्रत्येक मंदिरात शिवलिंग त्या त्या वर्णानुसार वेगळ्या रंगाच्या दगडातून घडवलेले असे पण प्रतिष्ठा झाल्यावर सर्व वर्ण सर्व शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकत असत. ह्या सिद्धांतानुसारच सुरंग टिला येथील शिवमंदिर बांधले गेले होते.

विशेष म्हणजे डॉ. शर्मा यांच्या मते सातव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिराच्या पायामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने भूकंपविरोधी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शिवमंदिराच्या प्रत्येक गाभार्‍यासमोर एक मीटर लांब, अर्धा मीटर रुंद आणि साठ फूट खोल असे विवर खोदून त्यात व्हॅक्यूम बनवून ते सील करण्यात आले होते. भूकंपाच्या लहरी व्हॅक्युम मध्ये प्रसारीत होऊ शकत नाहीत, त्यामुळे अकराव्या- बाराव्या शतकात सिरपूरमध्ये भीषण भूकंप होऊन पूर्ण शहर उध्वस्त झाले, ह्या मंदिराच्या चौथऱ्याच्या पायऱ्या उखडून वाकड्या झाल्या आणि खांब पडले, पण मंदिराचा मुख्य चौथरा आणि गर्भगृहे सुरक्षित राहिली. पण पूर्ण शहर उध्वस्त झाल्यामुळे लोकांनी भीतीने तिथून स्थलांतर केले आणि हळूहळू काळाच्या ओघात हे शिवमंदिर एका मातीच्या ढिगाऱ्याखाली लपले गेले.

आज हे मंदिर गूढतेची अनुभूति आपल्याला देते. चाळीस दगडी पायऱ्या चढून जेव्हा आपण वर पोचतो तेव्हा एकेकाळचा बत्तीस स्तंभांवर उभा असलेला सभामंडप आपले स्वागत करतो. आज हे खांब ढासळलेले आहेत, तरीही त्यांच्यावरची नक्षी, कोरीव काम, वर कोरलेले गूढ अतिमानवी चेहेरे आपल्याला एका वेगळ्याच जगात नेतात. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरपासून फक्त ८४ किमी अंतरावर असलेल्या सिरपूरमधले हे अद्भुत शिवमंदिर आपल्या प्राचीन इतिहासाची साक्ष देत आजही भक्कम उभे आहे. सिरपूरच्या लक्ष्मण मंदिराबरोबरच हे ही मंदिर पुरातन श्रीपूरची कीर्ती आजही आपल्याला सांगते.

सुरंग टीला मंदिर हे एक अद्वितीय आणि भव्य वास्तुशिल्प आहे. अश्याप्रकारची शुभ्र चुनखडीच्या दगडात एका उंच चौथऱ्यावर बांधलेली पिरॅमिड सारखी दिसणारी रचना भारतात तुम्हाला इतर कुठेही मंदिर स्थापत्यात आढळणार नाही. हे मंदिर त्याच्या वेगळ्या स्थापत्यासाठी आवर्जून बघितलेच पाहिजे असे आहे.

शेफाली वैद्य

shefv@hotmail.com

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT