unresolved conflict break communication separate minds create tension in relationships Sakal
सप्तरंग

‘सोडून द्या’चं सूत्र

काहीतरी सतत मागे ओढत राहतं, आतून टोचत राहतं. अशा प्रत्येक वेळी स्वतःला बजावत राहिलं पाहिजे, ‘सोडून द्यायला शिक’!

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

अप्रिय घटनांमुळे संवाद तुटतो, मनं दुरावतात, नातेसंबंधात तणाव निर्माण होतो. कित्येकदा मनात हे सगळं साठत जाऊन एक क्षण असा येतो की, आपण कसलाच आनंद घेऊ शकत नाही.

काहीतरी सतत मागे ओढत राहतं, आतून टोचत राहतं. अशा प्रत्येक वेळी स्वतःला बजावत राहिलं पाहिजे, ‘सोडून द्यायला शिक’! हे सोडून देणं शिकलं की मनाला सतत ‘स्टोरेज फुल’ ही वॉर्निंग येत नाही. नवीन आठवणी, अनुभव, संवाद सगळं वेचून घ्यायला मनात जागा होते.

‘दार उघड बये दार उघड’ म्हणत महाराष्ट्रातल्या हजारो दारांवर एक थाप पडली. जिने ‘संसारातून वेळ काढुनी खेळ खेळूया नवा’ असं म्हणून महाराष्ट्रातल्या गृहिणींना पैठणीचा खेळ, विरंगुळ्याचे चार क्षण दिले. इतकंच नाही तर नाते संबंधातली वीणदेखील घट्ट केली. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने हे साध्य केलं.

सामान्य माणसाच्या घराचं दार उघडायला जाणारी व्यक्ती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी झाले. आपल्या संवाद कौशल्याने त्यांनी माणसांच्या मनाची कवाडं उघडली आणि त्यानंतर कित्येकींच्या घराला घरपण आलं.

२००४ ते २०१० दरम्यान या कार्यक्रमाचं आकर्षण नसलेली घरं अगदी विरळाच होती. ‘होम मिनिस्टर’ला रंग, रूप, सामान्य परिस्थिती, छोटी घरं-मोठी घरं या कशा कशाचं वावडं नव्हतं. अजूनही नाही.

‘होम मिनिस्टर’चा हा कॅमेरा आणि लवाजमा आमच्या चाळीतही आला होता. तेव्हा उल्हासनगर या मुंबईपासून फारच लांब असणाऱ्या उपनगरातल्या एका चाळीतल्या माणसांना त्याचं वाटलेलं अप्रूप जवळून अनुभवलं.

आमच्या ताईच्या घरातली घाई, गडबड, धांदल, आमच्या मागच्या दाराची ती चिंचोळी गल्ली, त्यात शूटसाठी जमलेली गर्दी. हे सगळं तर तिथे होतंच; पण याच बरोबरीने असूयासुद्धा होती. मला अजून आठवतं, ज्या दिवशी आमच्या चाळीतल्या या भागाचं टेलिकास्ट होता, तेव्हा बरोबर ६.१५ च्या सुमारास केबलचा प्रॉब्लेम झाला होता.

फक्त चाळीतच कुणाच्या घरी टीव्हीवर काही दिसेना. चाळीत एक घर होतं जिथून सगळ्यांच्या घरी केबलच्या वायर जायच्या, तिथे कुणीतरी मुद्दामहून काही बिघाड करून ठेवला होता, पण यावरून आमच्या चाळीत त्या दिवशी आणि त्यानंतरही कधीच कुणीच तावा-तावाने भांडलेलं आठवत नाही.

याच काय कुठल्याच कारणावरून आमच्या चाळीत कधीच हमरी-तुमरीची भांडणं झाल्याचं आठवत नाही. याचा अर्थ तिथे वाद होत नसत असं नव्हतं; पण झालेलं भांडण, वाद, मतभेद या सगळ्यात सगळ्यांनी एक गोष्ट कायम पाळली, ती म्हणजे सोडून देणं.

प्रासंगिक वाद, मतभेद हे कधीच कुणीच कायमचे मनात धरून ठेवले नाहीत की त्यावरून त्या कॉलनीतल्या माणसांनी एकमेकांवर शिक्के मारले नाहीत. चांगल्या घटनेचं मनापासून कौतुक आणि वाईट घटनेतला बोध घेऊन इथली माणसं आजही गुण्या-गोविंदाने राहतायत. आम्ही आता तिथे राहत नाही. चाळ सोडून एक तप झालं तरीही तिथलं जे जे म्हणून चांगलं आहे, वेगळं आहे ते आजही आठवतं.

स्थायू, जल, वायू यांचे जसे गुणधर्म असतात तसेच माणसांचे असतात, जागांचे असतात. वाईट घटना घडल्या की त्या सोडून देणं हा आमच्या चाळीचा गुणधर्म होता. ‘होम मिनिस्टर’ पाहत असतानाही मला ही गोष्ट कायम जाणवत आली.

सासूला सुनेविषयी काही खटकणाऱ्या गोष्टी, नवऱ्याला बायकोविषयी न आवडणाऱ्या गोष्टी आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या गृहिणीला सासू, नवरा यांच्याविषयी न आवडणाऱ्या गोष्टी, आवडत्या गुणांइतकेच विचारले जायचे. बायका याची उत्तरं आधी संकोचून आणि नंतर जरा मोकळेपणाने द्यायच्या.

तेव्हा तेव्हा आदेश बांदेकर त्यांच्यात संवादाचा पूल तयार करताना आग्रहाने वहिनी हे बदलून टाका किंवा मग सासू-सुनेत जुना एखादा वाद झाला असेल किंवा या आवडी-निवडीवरून वादंग होईल, असं त्यांना वाटलं तेव्हा तेव्हा ‘सोडून द्या, पुढे चला’ या सूत्रावर आधारलेलं काही आवर्जून बोलत असत.

या ‘सोडून द्या’ सूत्राने काम करताना त्यांनी अनेक कुटुंबांना एकत्र येण्याचीही आवाहनं केली. प्रेमविवाह केल्याने कित्येक गृहिणी माहेर गमावून बसल्या होत्या, त्यांच्यासाठी आई-वडिलांच्या घराची दारं कायमची बंद झाली होती.

अशा प्रत्येकीत आणि तिच्या हरवलेल्या माहेरातही पूल होण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला मुलांचं सुखच हवं असतं ना, तुमची मुलं सुखात आहेत. जुनं विसरा, त्यांना आपलं म्हणा हे आवर्जून म्हणत आले आहेत.

अप्रिय घटना, मुलांचे वा मोठ्यांचे न पटणारे निर्णय, या सगळ्यामुळे माणसाच्या मनात जवळच्या आणि लांबच्या व्यक्तींविषयी अढी निर्माण होते. अगदी इतकंच काय सहकाऱ्यांविषयी, आपल्या मित्र-मैत्रिणींविषयीही अशी अढी कित्येकांच्या मनात तयार होत असतेच. याने संवाद तुटतो, मनं दुरावतात, नाते संबंधात तणाव निर्माण होतो.

कित्येकदा तर मनात नुसतंच खदखदत राहतं, यात आपल्यावरचा, कधी समोरच्यावरचा राग असतो. या सगळ्यावर सोडून देणं हा अगदी नेटका उपाय असतो. कित्येकदा मनात हे सगळं साठत जाऊन एक क्षण असा येतो की, आपण कसलाच आनंद घेऊ शकत नाही. काहीतरी सतत मागे ओढत राहतं, आतून टोचत राहतं.

अशा प्रत्येक वेळी स्वतःला बजावत राहिलं पाहिजे, ‘सोडून द्यायला शिक’! हे सोडून देणं शिकलं की मनाला सतत ‘स्टोरेज फुल’ ही वॉर्निंग येत नाही. नवीन आठवणी, अनुभव, संवाद सगळं वेचून घ्यायला मनात जागा होते.

जिच्याविषयी मनात अढी, राग होता तिच्याकडे स्वच्छ नजरेने पाहता येतच, पण त्या व्यक्तीकडे पाहताना, तिच्याशी संवाद साधताना आपल्याला मागे खेचणारं ते जे काही असतं ते आपणहून मागे पडतं. विनाकारण असं लहान- मोठं खूप काही साठवून ठेवणारं संवेदनशील मन जरा मोकळा श्वास घेतं.

चिडचिड थांबते आणि आपण अधिक समरस होऊन जे समोर असेल ते अनुभवू लागतो. या सोडून देण्याच्या यादीत गैरसमज, राग, संताप हे सगळं तर हवंच, पण स्वतःविषयी असणारी न्यूनगंडाची भावना सगळ्यात आधी हवी.

जिच्यामुळे आपण स्वतःपासूनही पळत असतोच, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ‘सोडून द्यायला शिका’ हा मंत्र स्वतःकडे नेणारा असतो. कुटुंब, समाज आणि नातीगोती जपताना विसंवादाचे मुद्दे जास्त ताणले तर नातेसंबंध तुटतात. ते तुटण्यापेक्षा जोडण्यासाठीचे प्रयत्न स्वत:हून करणे उचित ठरेल.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT