सातारा

कृषी पर्यटनातून मिळणार तरुणांना रोजगार; साताऱ्याचा राज्याच्या कृषी धोरणात समावेश

उमेश बांबरे

सातारा : कृषी विकासाला चालना देण्यासाठी नव्या कृषी धोरणात शासनाने कृषी पर्यटनावर जोर दिला आहे. कृषी पर्यटन केंद्रांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता दिली आहे. यासाठी आता शासनस्तरावरून प्रशिक्षणासह इतर मदत मिळणार असून, एक ते पाच एकर शेती असलेला शेतकरी असे पर्यटन केंद्र उभारून त्यातून रोजगारनिर्मिती करू शकणार आहे. सातारा जिल्हा परिषदेने 2012 मध्ये तत्कालीन कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला होता. आता तोच निर्णय राज्य शासनाने आपल्या कृषी धोरणात समाविष्ट केलेला आहे. 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय आदी कृषी संलग्न विषय एकत्र केल्यास कृषी पर्यटनाला निश्‍चितपणे चालना मिळू शकते, हे लक्षात घेऊन शासनाने नुकत्याच लागू केलेल्या कृषी धोरणात कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वैयक्तिक शेती, कृषी सहकारी संस्था, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या भागिदारी तत्त्वावरील संस्था यांना याचा लाभ घेता येणार आहे. कृषी पर्यटन केंद्र स्थापन करण्यासाठी शहराबाहेरील एक किलोमीटरच्या क्षेत्रात किंवा खेडेगावात असलेली किमान एक ते पाच एकर शेती आवश्‍यक आहे. तेथे 24 तास पाण्याची उपलब्धता असावी, तसेच शेती सदर शेतकरी व त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे असावी. 

कृषी पर्यटन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या खोल्या या शक्‍यतो पर्यावरणपूरक असाव्यात, त्या बांबू, जांभा दगड, झोपडी आदीपासून बनविलेल्या असाव्यात. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी लागणार नाही. पर्यटन केंद्रात भोजनाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागह आदी सोयी उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. हे कृषी पर्यटन केंद्र शांत, सुंदर व स्वच्छ परिसरात असावे, केंद्रात विविध पीकपध्दतीचा अवलंब करावा, तसेच घरगुती जेवणाची सोय असावी, घोडेस्वारी, बैलगाडी, विविध हंगामातील कामे दाखविण्याची सोय असावी, तसेच पारंपरिक खेळांची सोय असावी. पारंपरिक मनोरंजनाची सोय करावी. तसेच येथे शेतीतील ताजा माल विक्रीसाठी उपलब्ध करावा. 

पर्यटन केंद्र प्लास्टिकमुक्त असावे, सौरऊर्जा, पवन ऊर्जेचा वापर करावा. या केंद्रास पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी किमान एक सहल किंवा भेट आयोजित करण्यात यावी आदी बाबी बंधनकारक असतील. तसेच पर्यटन केंद्रात निवासी, मनोरंजनात्मक, तंबू निवारा आदी सोय असावी. पर्यटन केंद्रास घरगुती दराप्रमाणे वीजबिलाची आकारणी होणार आहे. तसेच अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षणही शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी पर्यटन केंद्रासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी प्रथम नोंदणी शुल्क अडीच हजार रुपये तर पाच वर्षांनी एक हजार रुपये नूतनीकरण शुल्क भरावे लागणार आहे. 

तत्कालीन कृषी विकास अधिकारी माईनकरांची संकल्पना 

सातारा जिल्हा परिषदेत 2012 मध्ये तत्कालीन कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी ही संकल्पना राबविली होती. त्यासाठी जिल्हा बॅंकेने काही कृषी पर्यटन केंद्रांना आर्थिक मदतही केली होती. त्यावेळी थोड्या फार प्रमाणात कृषी पर्यटन केंद्रे जिल्ह्यात निर्माण झाली होती. पण, आता शासनाच्या कृषी धोरणातच हा विषय समाविष्ट झाल्याने एक ते पाच एकर जमीन असलेला शेतकरी कृषी पर्यटन केंद्र स्थापन करून त्यातून आपला आर्थिक विकास साधू शकणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT