गोरे हे धडाकेबाज आमदार असून राष्ट्रवादीच्या आमदारांना थेट अंगावर घेण्याची ताकद त्यांच्यात आहे.
सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) बालेकिल्ल्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची धुरा एखाद्या आमदारावर सोपवली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आमदारकी अशी वाटचाल केलेल्या धडाकेबाज आमदार जयकुमार गोरेंच्या (Jayakumar Gore) खांद्यावर ही नवी जबाबदारी देतानाच भाजपने (BJP) आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला नामोहरम करण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. ही नवीन जबाबदारी पेलताना त्यांना पक्षातील नव्या- जुन्यांची मोट बांधत दिग्गज नेत्यांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागणार आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सात सदस्य जिंकत जिल्हा परिषदेत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असून, आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांसह बाजार समितींच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात आमदार गोरेंच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू केली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातून कौतुक होत असले, तरी भाजपची वाढविलेली ताकद व निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे लक्षात घेता मावळते जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) समर्थकांत थोडा नाराजीचा सूर आहे. या नाराजांची नाराजी दूर करत पुन्हा पक्षात सक्रिय करताना त्यांना विश्वास द्यावा लागणार आहे. भाजपमधील नवीन व जुन्यांचा संगम करून पक्षाची तालुकानिहाय बांधणीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, भरत पाटील, मदन भोसले या दिग्गज नेत्यांची साथ मिळणेही गरजेचे आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील भाजपच्या कार्यकर्त्यांचीही त्यांना मोट बांधावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे कार्यकर्ते व समर्थक अद्यापही द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यांना भाजपमध्ये सक्रिय करून घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
मुळात आमदार गोरे हे धडाकेबाज आमदार असून, राष्ट्रवादीच्या आमदारांना थेट अंगावर घेण्याची व त्यांना नामोहरम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यांचा हा आक्रमकपणा दाखवताना भाजपच्या साचेबद्ध बांधणीत त्यांना वाटचाल करावी लागेल. त्यासाठी त्यांना आपल्यात काही बदलही करावे लागणार आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यापासून काही नाराज झालेल्यांना पुन्हा सामावून घ्यावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, जावळी, फलटण, माण, खटाव, वाई, खंडाळा या तालुक्यांत भाजपची ताकद आहे. आता कोरेगाव, पाटण व वाई तालुक्यांत त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तेथे भाजपची गटबांधणी करावी लागेल.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार असूनही शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंना भाजपसोबत राहण्यासाठी आमदार गोरेंना प्रयत्न करावे लागतील. फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे आमदार गोरेंचे मित्र असल्याने त्यांना फलटणमध्ये थोडे सोपे जाईल, तरीही पारंपरिक विरोधक म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याशी त्यांना दोन हात करावे लागतील. जिल्हाध्यक्ष म्हणून वाटचाल करताना सर्व तालुक्यांत लक्ष देताना आपल्या हक्काच्या माण, खटाव मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही काळजी त्यांना घ्यावी लागेल.
मावळते जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या काळात भाजपने जिल्हा परिषदेत पाऊल ठेवले. पक्षाची बुथनिहाय बांधणी करून सातारा, कऱ्हाड, फलटण तालुक्यांत पक्षाची ताकद निर्माण केली. त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना भाजपने प्रदेशवर संधी दिली आहे. आता पावसकरांनी जिल्ह्यात निर्माण केलेली ताकद आणखी वाढविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आमदार गोरेंना पेलावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.