लोणंद - लोणंद- नीरा रस्त्यावर भवानीमाता मंदिरासमोरच्या उतारावर आज रात्री दुचाकीला इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरने पाठीमागून धडक दिल्याने बाळूपाटलाचीवाडी गावचे माजी सरपंच व त्यांचा नातू ठार झाले. या घटनेमुळे बाळूपाटलाचीवाडी गावावर शोककळा पसरली. हणमंत दिनकर धायगुडे (वय ६५) व ओम विजय धायगुडे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.
लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जण बाळूपाटलाचीवाडी येथून लुना मोपेड गाडीवरून (एमएच ११ बीआर ७१९०) लोणंद- नीरा रस्त्यावरून लोणंद बाजूकडून नीराकडे निघाले होते. भवानीमाता मंदिर चढावर आल्यावर तेथे गाडी थांबवून मंदिरात दर्शन करून पुन्हा गाडीवर बसून ते नीराकडे जायाला निघाले होते. त्यावेळी पाठीमागून (लोणंद बाजूकडून) भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने (एमएच १२ एसएक्स ५२१५) लुना गाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये हणमंत धायगुडे हे जागीच ठार झाले, तर जखमी ओमला उपचारासाठी लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, अविनाश शिंदे, अविनाश नलवडे, फैय्याज शेख आदी घटनास्थळी पोचून अपघातात जखमी ओमला दवाखान्यात व हणमंत यांना लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रात्री उशिरा या दोघांचेही शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला असून, चालक फरारी झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे तपास करत आहेत. बाळूपाटलाचीवाडीचे माजी सरपंच हणमंत धायगुडे हे सरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात स्वच्छता अभियानात चांगली कामगिरी केल्याबद्दल गावाला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते स्वीकारला होता. त्याची आठवण आज गावातील प्रत्येकाला झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.