सातारा

कऱ्हाड-पाटणात वरुणराजाचे रौद्ररुप, खरीप पिकांची मोठी हानी

सकाळ डिजिटल टीम

कऱ्हाड/पाटण (जि. सातारा) : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कऱ्हाड-पाटण तालुक्‍यात मुसळधार पाऊस कोसळला. ऐन खरिपाच्या काढणीत पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसाने खरीप हंगामातील पिके शेतात कुजण्याच्या मार्गावर आहेत. शेतात पाणी साचले असून ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाचे पाणी आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने कोयना व कृष्णासह उपनद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठावरील शेती पाण्याखाली आहे. प्रशासनाने नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला, तर कऱ्हाड-विटा राज्यमार्ग काही काळ बंद झाला होता. 

कऱ्हाड-पाटण तालुक्‍यात गेले तीन दिवस दुपारी पाऊस सुरू व्हायचा. तास-दीड तास पाऊस पडायचा व पुन्हा उघडीप घेत होता. मात्र, गुरुवारी सकाळी नऊ वाजता रिमझिम पावसाच्या सरी पडण्यास सुरवात झाली. सायंकाळी सातनंतर रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे सखल भागातील शेतात पाणी साचले. नदी, नाले, ओढे वाहू लागले आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या काढणीस वेग आला असतानाच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खरीप पिकांची काढणी खोळंबली आहे. शेतात पावसाचे पाणी साचून भात, ऊस आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पाण्यामुळे सोयाबीन शेतातच कुजण्याच्या मार्गावर आहे. काढणीचा कालावधी होऊन गेल्याने भात पिकांत कसच राहिलेला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके शेतात पावसामुळे कुजत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी शनिवारी (ता. 17) घटस्थापना होत आहे. या दिवसापर्यंत पाऊस थांबला नाही तर पुन्हा नऊ दिवस उघडणार नाही, अशी भीती शेतकरी जुन्या परंपरेतील अंदाजानुसार व्यक्त करीत आहेत. 

कऱ्हाड-विटा राज्यमार्ग पाण्याखाली 
ओगलेवाडी : कऱ्हाड-विटा राज्यमार्ग नेहमीप्रमाणे पाणी साचून पाण्याखाली गेला. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. पाण्याचा अंदाज नसल्याने वाहनचालक गाडी चालवत पाण्यात शिरत आहेत व नंतर गाडी बंद पडली की ढकलत आणत आहेत. गजानन हाउसिंग सोसायटी परिसरातील व्यावसायिकांनी काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार मोऱ्या बंद केल्यामुळे सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी वाट मिळेल, त्या दिशेने मार्ग काढत लोकांच्या घरामध्ये घुसले. गजानन सोसायटीच्या परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे रहिवाशांना घरात पाणी शिरू नये, यासाठी रात्र जागून काढावी लागली. अंगणात लावलेली वाहने रात्री आलेल्या पाण्यामुळे अर्धी बुडाली होती. 

विंग परिसरात पावसाचे थैमान 
विंग : पावसाने विंगसह विभागात थैमान घातले. ठिकठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. रात्रभर पाऊस झाल्याने खरिपाच्या काढणीच्या ऐन मोक्‍यात व्यत्यय आला आहे. सोयाबीन, ज्वारीसारखी पिके काढणीतून पुढे गल्याने काळी पडली आहेत. कडबा भिजून नुकसान झाले आहे. वाळवण भिजूनही नुकसान झाले आहे. घराच्या भिंती कोसळल्याच्या घटनाही येथे घडल्या. पावसाच्या अंदाजावर मागील आठवड्यात रब्बीची पेरणी ठिकठिकाणी झाली आहे. अतिपावसाने त्याच्या उगवण क्षमतेची भीती व्यक्त होत आहे. 

पाणी घुसून व्यावसायिकांचे नुकसान 
उंडाळे  :  मुसळधार पावसामुळे टाळगाव येथील बस स्थानकालगत नव्याने उभारलेल्या नयनदीप अपार्टमेंटच्या तळभागातील सात दुकान गाळ्यांत पाणी गेल्याने दुकानदारांचे साहित्य, माल भिजून सात लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी दुकान मालकांकडून होत आहे. 

कोयना धरणातील आवक वाढली 
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गेल्या 24 तासांत कोयनानगरला 64 मिलिमीटर, नवजात 67, तर महाबळेश्वरमध्ये 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना जलाशयात प्रतिसेकंद 34,211 क्‍युसेक पाण्याची आवक होऊ लागली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने सहा वक्र दरवाजांतून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. 34,211 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा, अपहरणात वडिलांचा सहभाग; गुन्ह्यातली कार घराबाहेर, आईने पोलीसांवर सोडले कुत्रे

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

SCROLL FOR NEXT