कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या निवडणुकीसाठी (Karad Municipal Election) स्थानिक नेते सक्रिय झाले आहेत. त्याची पालिकेच्या वर्तुळात जोरात चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil), माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज (MLA Prithviraj Chavan) यांच्या भूमिकांवर स्थानिक आघाड्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) यापूर्वीच पक्षाच्या चिन्हावर लढण्याची घोषणा केली आहे, तर पालकमंत्री पाटील यांच्या लोकशाही आघाडीने (Lokshahi Aghadi) पक्षविरहित सर्वसमावेशकतेचा नारा देत आघाडीव्दारे निवडणुकांची घोषणा केली आहे. आमदार चव्हाण यांची अद्यापही भूमिका जाहीर नाही. त्यांच्याही गोटामध्ये स्वबळासहित स्थानिक आघाड्यांसाठी मतमतांतरे आहेत. त्यामुळे पृथ्वीराजबाबांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. पक्ष, नेत्यांसह स्थानिक पालिकेतील नेते आघाड्यांठी सक्रिय आहेत. त्यामुळे पालिकेच्या राजकीय घडामोडी रंगतदार होणार आहेत.
पालिकेच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेते सक्रिय झाले आहेत.
पालिका निवडणुकांची ‘एक वॉर्ड, एक नगरसवेक’ पद्धतीने वॉर्ड रचना करण्याचे आदेश आल्याने याबाबत लगबग सुरू आहे. त्यामुळे पाच वर्षांतील राजकीय घडामोडींच्या उकळ्या पाकळ्या आता निघतीलही. तरीही खालच्या पातळीवरील आरोप, त्याबाबत प्रत्त्युत्तराने ढासळणारी पातळी असे वातावरण असतानाच होणारी निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. आमदार चव्हाण यांचा क्लिन चेहरा घेऊन मागील वेळी लढलेल्या ‘जनशक्ती’ने निकालानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची सोडलेली साथ आजही कऱ्हाडकरांच्या स्मरणात आणण्याचे काम विरोधक करत आहेत. त्यामुळे पृथ्वीराजबाबा यांच्या गटाकडून सावध हालचाली आहेत. त्याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. अनेक भाजपवासीय बाबांच्या गटात दाखल आहेत. मात्र, उमेदवारीपर्यंत पोचण्याचे त्यांचे मेरिट अद्यापही स्पष्ट नाही.
पावसकर गटाशी बाबा गटाचे सौख्य सर्वश्रुत आहे. स्थानिक आघाडीसाठी शिवराज मोरे, शहराध्यक्ष राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, इंद्रजित गुजर यांच्यावर असलेली मदार अद्यापही कसदार व्हायला हवी. त्यामुळे अखेरच्या टप्प्यापर्यंत बाबा गटाला लक्षपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीने यापूर्वीच केलेली खांदेपालट महत्त्वाची आहे. थेट जयंत पाटील यांच्याकडे दिलेली सूत्रे परिणामकारक ठरतील, अशी अपेक्षा आहे. त्यापूर्वीचे अध्यक्ष सुभाष पाटील हे आघाडीच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या गटाची थिंक ऑफ लाइन स्पष्ट आहे. गटनेते सौरभ पाटील यांनीही चांगली बांधणी केली आहे. त्याचाही परिणाम दिसतो आहे. ते सगळे कॅश करताना त्यांची होणारी स्थानिक आघाडी मात्र त्यांना विचारपूर्वकच करावी लागणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत भाजपची शकले स्पष्ट आहेत. सरचिटणीस अतुल भोसले यांची कृष्णा विकास आघाडी पालिकेत सक्रिय असते. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी हे पक्षीय चिन्हावर असतात. त्यांच्या जोडीली पक्षीय बांधणीला सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर असतातच, त्यामुळे या सगळ्यांची गोळाबेरीज ‘कमळा’च्या चिन्हावर आणताना पडणारा फरक विरोधकांच्या फायदाचा ठरतो, त्याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे.
कळीचे मुद्दे...
रखडलेल्या मासिक सर्वसाधारण सभा
ठरावांवर स्वाक्षऱ्यांसाठी होणारा विलंब
प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव
सर्वच ठेकेदारांच्या काळ्या यादीची चर्चा
सर्वच लोकप्रनिधी एकमेकांवर करत असलेले टक्केवारीचे आरोप
नगरसवेकांच्या नातेवाईकांची निविदांतील लुडबूड
रखडलेली २४ तास पाणी योजना
रस्त्यांचे खराब कामामुळे होणारे आरोप
हद्दवाढ भागात सुविधांचा अभाव
पालिकेतील बलाबल...
भाजप - नगराध्यांसह पाच
जनशक्ती आघाडी - १६ (उपाध्यक्ष जयवंत पाटील यांचा गट फारकतीत असला तरी जाहीर घोषणा नाही)
लोकशाही आघाडी - सहा
अपक्ष - तीन (दोघांचा भाजपला पाठिंबा - एकजण जनशक्तीकडे)
स्वीकृत नगरसेवक - तीन (दोन जनशक्ती तर एक भाजप्रणीत अपक्ष)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.