voting
voting  
सातारा

बहुचर्चित कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे मतदान सुरु

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासूनच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनेलमधील दिग्गजांचे भवितव्य आज (मंगळवार) सभासद मतदानातून ठरवणार आहेत. मतदारांचा कौल नेमका कोणाला हे एक जुलै रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. (satara-krishna-sugar-factory-election-2021-voting-begins-sangli)

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांत तिन्ही पॅनेलने चुरशीने प्रचार केला. सत्ताधारी भोसले गटाच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने पाच वर्षांत केलेल्या कामांची जंत्री सभासदांपुढे मांडली. अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलने आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या यशवंतराव मोहिते रयत पॅनेलने आम्हाला का सत्ता हवी, याची मांडणी प्रचारात केली. तिन्ही पॅनेलने गुलाल आपलाच असा दावा केला असला, तरी मतदारांच्या मनात काय होते, हे तीन जुलै रोजी मतमोजणीनंतरच बाहेर येणार आहे.

कारखान्यासाठी दोन्ही मोहित्यांचे मनोमिलन करण्याचे प्रयत्न सुरवातीला झाले. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे निवडणूक तिरंगी झाली असली, तरी चुरशीने लढली गेली. कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने कृष्णाकाठी राजकीय घुसळण झाली. सत्तारूढ जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची प्रचाराची धुरा स्वतः सुरेश भोसले आणि अतुल भोसले यांनी सांभाळली. रयतकडून सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, तर संस्थापक पॅनेलकडून ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाने कंबर कसली होती. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांचा कस लागला होता. त्यामुळे सभा गाजल्या.

आज (मंगळवारी) १४८ केंद्रांत मतदान होत आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर नऊ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एका मतदान केंद्रावर २७० ते ३०० मतदानाची व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस तैनात आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांना ओळखपत्र व मास्कशिवाय मतदान केंद्रांत प्रवेश दिला जात नाहीये. मतदान केंद्रांत मोबाईल नेण्यासही मनाई करण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरु राहील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.

गुलाल आपलाच

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत गुलाल आपलाच असल्याचा विश्वास तिन्ही पॅनेल व्यक्त करत आहेत. तिरंगी लढतीने ग्रामीण भागाचे लक्ष वेधले आहे. रणशिंगाची दुधबी, हलगीचा कडकडाट, नेत्यांच्या विजयाच्या घोषणा आता थंडावल्या आहेत. मतदान उद्या होत असल्याने घाटमाथ्यासह वाळवा तालुका निवडणुकीचाच आहे. ‘कृष्णा’चा भल्याभल्यांचा अंदाज नेहमी चुकतो आहे. तिन्ही पॅनेलनी प्रचाराचे सूत्र चांगले ठेवले होते, सोशल मीडियाचा चांगला वापर झाला. नेत्यांची छायाचित्रे, आश्वासनांचा खैराती होत होत्या. त्या सगळ्याच आता थंडावल्या आहेत. जाहीर प्रचार संपल्याने कृष्णेत कसे होईल याची चर्चा रंगली आहे. क्रॉस वोटिंगचीही चर्चा आहेत.

गावागावांत पैजा अन् खुमासदार चर्चा!

व्यक्तिगत पातळीसह संस्थात्मक पातळीवर एकमेकांवर होणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या धडाडणाऱ्या तोफा साेमवारी थंडावल्या. जाहीर आरोप व त्याला मिळालेल्या प्रत्युत्तराने निवडणुकीतील रंगत वाढली हाेती. चुरस निश्‍चित असल्याने कृष्णाकाठावरील गावागावांत पैजा लागल्या आहेत. कोण बाजी मारणार याची खुमासदार चर्चा रंगली आहे.

महिनाभरापासून एकमेकांच्या विरोधात बेताल आरोप करणारेही नेतेही साेमवारी शांतपणे गावात फिरत होते. विरोधक समोर आला तरी त्याच्याशी स्मितहास्य करून पुढे जात होते. गावागावांत वातावरण टाईट आहे. प्रत्येक जण आघाडीने दिलेले काम चोखपणे करण्यासाठी धडपडत आहे. कृष्णाकाठची स्थिती कारखान्याच्या निवडणुकीने ऐन कोरोना काळातही तापली होती. सत्ताधारी सहकार पॅनेलच्या पराभवासाठी विरोधी संस्थापक व रयत पॅनेलने प्रचाराचा मोठा धुरळा उडविला आहे. त्यामुळे मतदानासह निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आज (मंगळवार) मतदान सुरु झाल्यानंतरही सामान्य शेतकऱ्यांत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. बाजी कोण मारणार त्याच्या पैजा लावल्या जात आहेत. कृष्णाकाठावरील १३२ गावांत ‘कृष्णा’च्या निकालाचे आकर्षण आहे.

सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी प्रत्येक आघाडीने कंबर कसली आहे. कोण काय म्हटले, कोणी काय आरोप केला, याची चर्चा आहे. त्यामुळे घाटावरील भागासह वाळवा, कऱ्हाड तालुक्यातील बागायती भागात निवडणुकीची उत्सुकता आहे.

Krishna Sugar Factory

१४८ मतदान केंद्रे

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी पाचही तालुक्यांत १४८ मतदान केंद्रे आहेत. दोन्ही तालुक्यांतील २२ गावे संवदेनशील आहेत. त्यातील १५ गावे कऱ्हाड तालुक्यातील, तर वाळवा तालुक्यातील आठ आहेत. कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ८६, वाळव्यात ५१, कडेगावला १०, तर खानापूरला एक मतदान केंद्र आहे. एका केंद्रावर २७० ते ३०० मतदानाची सोय करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वडगाव हवेली, कोडोली, बेलवडे बुद्र्रकु, काले, आटके, कार्वे, वाठार, विंग, पोतले, शेणोली, उंडाळे, कोळेवाडी, घारेवाडी, धोंडेवाडी, तर वाळवा तालुक्यातील नेर्ले, पेठ, बोरगाव, रेठरे हरणाक्ष, किल्ले मच्‍छिंद्रगड, कामेरी, लवंडमाची आदी गावे संवदेनशील आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र पोलिस बंदोबस्तही देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT