उंब्रज (जि. सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या येथील ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे म्हणजे तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले असल्याने राज्यातील महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना- कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उंब्रज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपले स्वतंत्र पॅनेल उभे करणार की एकत्र लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तालुक्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील "प्रेम' सर्वश्रुत असल्याने या तीन पक्षांच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे, तर भाजपने कऱ्हाड तालुक्यात स्वबळावर निवडणुका लढण्याचा शड्डू ठोकला असून, येथील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून तालुक्यात भाजपची शक्ती दाखवून देणार का? हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघात उंब्रज हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. सर्व राजकीय पक्षांच्या घडामोडी येथून सुरू होतात. उंब्रज ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. 17 सदस्य असणारी तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्याने मतदारसंघातील राजकीय नेत्यांच्या केंद्रस्थानी राहात आहे. नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, तर युती शासनाचा थेट सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने मागे घेतला असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती; परंतु काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना, आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे गावांमधील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमध्ये नेहमी चुरस पाहायला मिळते. मात्र, या वेळी स्थानिक नेते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षे एकमेकांविरोधात लढणारे पक्ष आता आघाडीचे घटक बनले आहेत; परंतु त्याचा गाव पातळीवर फारसा परिणाम होणार नसला, तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी अडचण होण्याची शक्यता होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. याचा फायदा भाजपला होणार असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. यामुळे महाआघाडी स्थानिक मतभेद विसरून भाजप विरोधात एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचा निश्चय केला आहे. यामुळे स्थानिक प्रश्नांची चर्चा दिसण्याची शक्यता आहे. त्यातच पाच वर्षांत रखडलेले स्थानिक प्रश्न, विकासकामे, गटातटाचे राजकारण, विकासनिधीचे वाटप अशा विविध कारणांमुळे या निवडणुकीत रंगत येणार आहे. गावांत दोन ते तीन गट सक्रिय आहेत. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप अशा विविध पक्षांची विचारधारा असलेले गट गाव पातळीवर आहेत. त्यामुळे काही नेते सोयीचे राजकारण म्हणून प्रस्थापित, विरोधकांच्या वळचणीला जातात. यामुळे यंदा चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी सर्वच पक्षांच्या हाती असल्यामुळे आपण कोणत्या प्रभागात कमी पडलो आहोत, यावरून सर्व पक्षांकडून डागडुजीला वेग आला आहे.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत विराजमान असलेली ही आघाडी एकजुटीने स्थानिक निवडणुकांनाही सामोरी जात आहे. त्यामुळेच गावपातळीवरही त्याचे पडसाद उमटणार आहेत. राज्यात निर्माण झालेल्या नवीन समीकरणांमुळे गावातील राजकारणातही नवे रंग भरले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यामुळेच चुरस वाढणार हे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांची प्रतिष्ठाही या निमित्ताने पणास लागणार आहे; परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी स्थानिक मतभेद विसरून एकसंध होणार का? असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष : ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत; परंतु सरपंच आरक्षण सोडत अजून गुलदस्त्यातच असल्याने इच्छुक उमेदवार टक लावून बसले आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.