कऱ्हाड (जि. सातारा) : सातारा जिल्हा परिषदेने पाझर तलावांची प्रति हेक्टर ठेका रक्कम सहापटीने वाढवली आहे. मच्छिमार संस्था व मच्छिमारांना ती रक्कम परवडणारी नसल्यामुळे ठेका पूर्वीप्रमाणेच प्रति हेक्टर 300 रुपये करावा, अशी मागणी जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष श्रीकांत मुळे यांनी सहकारी व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी संघाचे सचिव मोहनराव चव्हाण, शिवलिंग नलवडे, देवदास यादव, महेश काटवटे, अमोल भोकरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेने पाझर तलाव ठेक्याने देण्याबाबत जाहीर निविदा काढलेली आहे. त्यात सहापट वाढ केली असून, तलाव ठेका धोरण गोरगरीब व अडचणीत असलेल्या मच्छिमार संस्थांसाठी अन्यायकारक आहे. ज्या शासन निर्णयाचा आधार घेऊन 300 रुपये प्रति हेक्टर रक्कम एक हजार 800 रुपये केलेली आहे. तो निर्णय शासनाने रद्द केला आहे.
पाझर तलाव हे अपवाद वगळता बारमाही असत नाहीत. या बरोबरच पाणीसाठा कमी असल्याने पुरेशा प्रमाणात मत्स्य उत्पादन होत नाही. जिल्हा परिषदेचे 90 टक्के तलाव हंगामी आहेत. मत्स्य व्यवसाय खात्याकडून उपलब्ध होणारे मत्स्यबीज बारमाही व मोठ्या तलावांसाठी साठवणुकीसाठी योग्य असते. हंगामी पाणीसाठा असलेल्या पाझर तलावात महागडे मत्स्यबीज साठवणूक करणे प्रचंड तोट्याचे ठरू शकते. याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनाही निवेदन दिले आहे.
गेल्या वर्षी 2019 मधील जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन भरपाई मंजूर झाल्याचे समजते. तेव्हा ही भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणीही पालकमंत्री श्री. पाटील, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.