पाटण (जि. सातारा) : कोरोना महामारीमुळे घरवापसी झालेल्या व संपूर्ण परिवार मुंबईला असणाऱ्या कुटुंबांनी अनेक वर्षे पडीक असणाऱ्या जमिनी यावर्षी वहिवाटीखाली आणल्या आहेत. त्याचा परिणाम कृषी सेवा केंद्रांतील बियाणे विक्रीवर झाला असून, यावर्षी विक्रमी भात बियाणांची विक्री झालेली आहे.
धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमुळे बागायती क्षेत्र कमी आणि खरिपाचे क्षेत्र जास्त असलेले पाहावयास मिळते. मॉन्सूनच्या लहरीपणामुळे कधी जादा, कधी उघडीप, तर कधी अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान होते. तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा उधरनिर्वाह होत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून पाटणच्या दऱ्याखोऱ्यातील युवक दहावीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबई- पुण्याचा मार्ग धरतात. दुर्गम भागातील कुटुंबे गावात रोजगार नसल्याने मुंबई-पुण्याच्या आसऱ्याला गेलेली पाहावयास मिळतात. त्यामुळे अशा कुटुंबांची जमीन काही वर्षांपूर्वी शेती करणाऱ्या गावातील लोकांना वाट्याने दिली जात होती. मात्र, शेतीसाठी मजुरांची कमतरता भासू लागली. शहरात न गेलेली व गावात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जमिनी मजुराविना कसणे अवघड झाले. मजूर मिळत नसल्याने मुंबईला असणाऱ्या कुटुंबांची वाटा पद्धतीने असणारी जमीन स्थानिक शेतकऱ्यांनी कसणे बंद केले. त्यामुळे या जमिनी कसण्याविना पडून राहू लागल्या.
काही काळ मुंबईवासियांनी स्वतः कसून पिके घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोकरी अथवा व्यवसायाचे होणारे नुकसान व शेतीत मिळणारे उत्पन्नाचा विचार करून शेतीचा विचार सोडून दिला. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी 65 हजार व लॉकडाउननंतर 25 हजारांच्या आसपास मुंबई - पुणे शहरातील तालुकावासियांची घरवापसी झाली. शहरात कोरोना नियंत्रणात येत नाही आणि त्यासाठी किती कालावधी जाईल, याची शाश्वती नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरवापसी केलेल्या कुटुंबांनी लॉकडाउनच्या काळात गेली अनेक वर्षे पडून असणाऱ्या शेतीची मशागत केली आहे. दगड, धोंडे वेचून शेत खरीप पेरणीसाठी गेल्या दोन महिन्यांच्या काळात तयार केले आहे. एक लाखाच्या आसपास लोकांची घरवापसी व पडीक शेती वहिवाटीखाली आणल्याने कृषी सेवा केंद्रांतील बियाणांची विक्रमी विक्री झाली आहे. प्रत्येक वर्षी 20 ते 30 टक्के बियाणे शिल्लक राहात होते, या वर्षी जादा मागवलेले बियाण्याचीही विक्री झाली आहे.
""कोरोनामुळे बियाणे विक्रीबाबत साशंकता होती. त्यामुळे कमी बियाणे मागणी केली होती. मात्र, यावर्षी गेल्या पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत बियाणे विक्री जास्त झाली आहे. पहिले आणलेले बियाणे लवकर संपल्याने पुन्हा बियाणे आणावे लागले. सलग पाच ते सहा वर्षे खरिपासाठी आणलेले बियाणे शिल्लक राहात होते.''
- बळिराम पवार,
संचालक, एबीपी एक्झॉटिका शेती सल्ला केंद्र, नेरळे गौंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.