Fatakadi Bird
Fatakadi Bird Sakal
टूरिझम

लाजाळू फटाकडी

अवतरण टीम

चांदोली अभयारण्यात फिरत असताना शेरणीच्या झुडपात काहीशी हालचाल जाणवली. दुर्बिणीतून पाहिले असता दिसली फटाकडी. ही अत्यंत लाजाळू जात.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

चांदोली अभयारण्यात फिरत असताना शेरणीच्या झुडपात काहीशी हालचाल जाणवली. दुर्बिणीतून पाहिले असता दिसली फटाकडी. ही अत्यंत लाजाळू जात. जरादेखील आवाज झाला तरी झाडीत लपून बसतात. पाच मिनिटे शांततेत गेली. थोड्याच वेळात सावधपणे दबकत दबकत एक नाही, तर चक्क दोन फटाकड्या अवतीभवती पाहत बाहेर आल्या.

टीम कोयनाच्या विकास माने व संग्राम कांबळे यांच्यासोबत दोन दिवस कोयना अभयारण्य अक्षरशः पिंजून काढले. इतके घनदाट जंगल, दुर्मिळ वनस्पती, झाडे व अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडले.

कोयनेच्या धरणामुळे परिसर जवळजवळ सदाहरितच असतो. वनसंवर्धनाचे काम उत्तम केले आहे. विशेषतः सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, कोयना वनक्षेत्रपाल संदीप कुंभार हे सातत्याने विविध उपक्रम राबवून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी तसेच वन्यजीव पर्यटनाला चालना मिळेल याकरिता परिश्रम घेत असतात. मानवी हस्तक्षेप नसलेले असे हे अप्रतिम जंगल, डोंगररांगा व विविध फुलपाखरे यांनी समृद्ध असले तरी येथील अस्वलांची व बिबट यांची चांगली संख्या हे येथील मुख्य आकर्षण.

दोन दिवसांत आम्हाला ६५ हून अधिक पक्षी कॅमेऱ्यात टिपता आले. दौऱ्याच्या पहिल्याच संध्याकाळी संपूर्ण ग्रुपसोबत एका झऱ्याजवळ पक्षी येण्याची वाट पाहत थांबलो असताना अचानक आमच्या समोर अस्वल आले. अगदी समोर आलेले ते अस्वल तसेच त्यानंतर कोयनेच्या काठी सोबत आणलेला चहा घेताना टिपलेले ग्रुपचे छायाचित्र व ती रम्य संध्याकाळ कायम लक्षात राहील.

कोयनेच्या परिसरातील छायाचित्रण आटोपून तिसऱ्या दिवशी चांदोली अभयारण्याला भेट द्यायचे ठरले. हा परिसरही खूप सुंदर असल्याचे ऐकले होते. खरे तर येथेही दोन दिवस फिरावे असे मनात होते; परंतु या खेपेस वेळ अपुरा होता. जेवढे होईल तितके जंगल त्या सकाळी फिरून घ्यावे असे ठरले. कोयना व चांदोली अभयारण्याच्या सीमा एकमेकांना लागूनच व ही दोन्ही अभयारण्ये सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा भाग आहेत.

चांदोलीच्या सीमेत प्रवेश करताच पाच मिनिटांच्या अंतरावर रस्त्याला लागूनच एक छोटा वहाळ होता. टीम कोयनेतील सागर जाधव म्हणाला, येथे काही मिळतंय का बघू या. रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्या. ग्रुपमधील मेंबर्स पटकन उतरून समोरून दिसणारे पांढरा धोबी, पिवळा धोबी टिपू लागले. इतक्यात, शेरणीच्या झुडपात आम्हाला काहीशी हालचाल जाणवली. दुर्बिणीतून पहिले. बहुधा कुठल्या तरी प्रजातीची फटाकडी असावी असे वाटले. पटकन मागे या असे सर्वांना सांगितले.

फटाकडी (क्रेक) ही अत्यंत लाजाळू जात. जरादेखील आवाज झाला तरी झाडीत लपून बसतात. पाच मिनिटे शांततेत गेली. कुणीही बोलू नका असे सर्वांना इशाऱ्यानेच बजावले. फार वाट पाहावी लागली नाही. आम्ही पाणवठ्यापासून तसे लांबच होतो. त्यामुळे थोड्याच वेळात सावधपणे दबकत दबकत एक नाही तर चक्क दोन फटाकड्या अवती-भवती पाहत, सुरक्षित असल्याची खात्री करत बाहेर आल्या.

मातकट फटाकड्या (ब्राऊन क्रेक)... आनंदाने सर्वांना सांगत ‘शूट-शूट’ असे फर्मानच सोडले. दुर्मिळ पक्षी इतक्या उघड्यावर पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे कुणीही चुका करू नका असे सर्वांना बजावले. अनेक वर्षे प्रयत्न करून मलाही त्याचे चांगले छायाचित्र मिळाले नव्हते. येथे मात्र लॉटरी लागली होती. इतक्यात नर-मादी दोघेही एका फ्रेममध्ये मावतील इतक्या एकमेकांच्या जवळ आले. पुढची दहा मिनिटे ती जोडी झाडीआड जाईपर्यंत सर्वांनी मनसोक्त छायाचित्रण केले. आमच्या कोयना-चांदोलीच्या यादीत अजून एका दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाली. सर्वच खूश होते. तिथून पुढे निघालो. पाणवठ्यांवर आणखी काही दुर्मिळ पक्षी दिसण्याची शक्यता होती, परंतु वेळेचे बंधन असल्याने संयम राखून एकाच ठिकाणी वाट पाहत बसलो. सामान्य खरूची, तांबूस छातीच्या सातभाईला मात्र छान टिपता आले. एका पाणवठ्यावर रानमांजरीचे ठसेदेखील पाहिले व पुन्हा निवांतपणे येऊ, असे ठरवून चांदोलीला निरोप दिला.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT