Sparrow sakal
टूरिझम

खेळताखेळता स्तब्ध झाल्या तीरचिमण्या..!

ठाणे खाडीमध्ये २०११ पासून अनेकदा छायाचित्रणाकरिता जाण्याची संधी मिळाली. अनेक दुर्मिळ पक्षी छायाचित्रित करता आले.

अवतरण टीम

ठाणे खाडीमध्ये २०११ पासून अनेकदा छायाचित्रणाकरिता जाण्याची संधी मिळाली. अनेक दुर्मिळ पक्षी छायाचित्रित करता आले.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

येऊरच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या पक्ष्यांची छायाचित्र टिपत असताना शेवाळी पाठीच्या तीरचिमण्या पाणवठ्यावर आल्या. त्या पाणी पिऊन परत जातील असे वाटत असतानाच त्या चक्क अंघोळ करू लागल्या. अचानक त्या सर्व स्तब्ध झाल्या. अजिबात हालचाल नाही, जणू त्यांचा पुतळा झाला होता. त्यापैकी दोघींची नजर मी ज्या लापनात बसलो होतो, त्याच्या मागच्या झाडावर खिळली होती...

ठाणे खाडीमध्ये २०११ पासून अनेकदा छायाचित्रणाकरिता जाण्याची संधी मिळाली. अनेक दुर्मिळ पक्षी छायाचित्रित करता आले. येऊरलादेखील अनेकदा जाणे झाले. येऊर मात्र अलिबाबाच्या गुहेसारखे आहे, कधी कुठला दुर्मिळ पक्षी दिसेल सांगता येत नाही. मॉर्निंग वॉककरिता भरपूर लोक हल्ली येऊरला जात असतात. त्यामुळे सहजपणे रस्त्याच्या कडेला दिसणारे पक्षीही आत जंगलात शोधावे लागतात. येऊरचे वनाधिकारी राजन खरात यांच्याशी काही वर्षांपूर्वी ओळख झाली. नंतर घट्ट मैत्रीसुद्धा. आम्ही त्यांना प्रेमाने खरात काका म्हणतो. पक्षीविषयक आवड जर वनाधिकाऱ्यांना असेल तर त्यांच्याकडून पक्षी निरीक्षणाकरिता विशेष प्रयत्न केला जातो आणि तोच प्रत्यय येऊरचे वन अधिकारी राजन खरात व गणेश सोनटक्के यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्यातून येतो. आम्हा पक्षीनिरीक्षकांबरोबर अनेक वेळा चर्चा करून त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या येऊर येथील मानपाडा क्षेत्रात पाणवठा तयार करण्याचे योजले. तो पाणवठा अधिकाधिक नैसर्गिक कसा दिसेल याची दक्षता घेतली. पक्षीनिरीक्षणासाठी अल्पावधीतच लापण तयार केले. बाजूला फुलपाखरू उद्यानही तयार झाले.

मध्यंतरी रीतसर परवानगी घेऊन त्या लापणात पक्षीनिरीक्षणाकरिता जायचे ठरवले. पहाटे सूर्योदयापूर्वीच पाणवठ्यासमोरील लापणात स्थानापन्न झालो. थोड्याच वेळात पक्ष्यांची किलबिल सुरू झाली; पण पाणवठ्यावर येत नव्हते. झाडाच्या फांदीवर बसून पांढऱ्या छातीचा खंड्या मात्र ओरडून आपले अस्तित्व सिद्ध करत होता. थोड्याच वेळात व्हिगॉरचा शिंजीर समोरच्या फांदीवर येऊन अंदाज घेऊ लागला. कोतवालही जवळच कुठे तरी होता, हे त्याच्या आवाजावरून कळत होते. हा नकलाकार पक्षी अनेक पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करू शकतो. लापणाच्या मागील बाजूस हळद्या मंजूळ आवाजात साद घालत होता. त्याला पाहण्यासाठी लापणाच्या बाहेर आलो. हळद्या दिसला. त्याला कॅमेऱ्यात टिपण्याकरिता तो मोकळ्या फांदीवर येण्याची वाट पाहत होतो, तोच बाजूच्या शिसमावरून भारतीय राखी धनेश उडाला. चपळतेने त्याचे उडतानाचे काही फोटो टिपले व पुन्हा लापणात येऊन बसलो. क्षणभरानंतर गवतात हालचाल दिसली. खारुताई किंवा साप असेल असे वाटले. तेवढ्यातच मोकळ्या जागेत सहासात इवल्याशा शेवाळी पाठीच्या तीरचिमण्या (ऑलिव्ह बॅक्ड पीपीट) हजर झाल्या. तुरुतुरु चालत त्या सर्व पाणवठ्यात आल्या व थेंब थेंब पाणी पिऊ लागल्या. चटकन पुन्हा गवतात शिरल्या.

एव्हाना समोरच्या उक्षीच्या झाडावर स्वर्गीय नर्तक येऊन बसला होता. पाणवठ्यावर कुणीच नाही याची खात्री करून भुर्रकन पाणवठ्याभोवती गिरकी मारून गेला, पाणी मात्र प्यायला नाही. याचे पाणी पिणे मोठे कसरतीचे काम असते. लांबलचक शेपूट पाण्यात भिजू नये म्हणून हा उडता-उडताच हवेतूनच तोंड पाणवठ्याला लावून पाणी पिऊन जातो. पोपटांचा एक थवा मात्र दुरूनच उडत गेला, त्यांना कदाचित या पाणवठ्याच्या अस्तित्वाची कल्पनाच नसेल. थिरचीव थिरचीव असा जवळूनच आवाज ऐकू येत होता. हा सोनकपाळी पर्ण पक्ष्याचा खास आवाज. त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात शेवाळी पाठीच्या तीरचिमण्या पुन्हा पाणवठ्यावर आल्या. या वेळेस मात्र नुसतेच पाणी न पिता, त्या चक्क अंघोळ करू लागल्या. त्यांचा तो खेळ मी व्यवस्थित व्हिडीओ चित्रित करत होतो. अचानक त्या सर्व स्तब्ध झाल्या. अजिबात हालचाल नाही, जणू त्यांचा पुतळा झाला होता. त्यापैकी दोघींची नजर वर लापनामागच्या झाडावर खिळली होती.

दहा मिनिटे, वीस मिनिटे, अर्धा तास झाला तरीही त्या तशाच. एव्हाना ऊन वर आले. इतर पक्ष्यांची फारशी हालचाल दिसत नव्हती. त्या तीरचिमण्या मात्र अजूनही तशाच होत्या. तासभर होत आला, माझा मात्र संयम संपला होता. बहुधा एखादा शिकारी पक्षी मागच्या झाडावर टपून बसला असेल व त्याच्या भीतीने या तीरचिमण्या स्तब्ध राहून आपले अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. निसर्गाने त्यांना स्वरक्षणाकरिता शिकवलेला हा उपाय होता. उत्सुकतेने मी लापणाबाहेर आलो. माझ्या त्या अवचित येण्याने लापणाबाहेर अगदी जवळच झाडावर बसलेला शिक्रा बावरला व लगेच पाणवठ्यावरून उडून गेला. पुन्हा येऊन बघतो तर त्या सर्व तीरचिमण्या गायब झाल्या होत्या. शांतपणे अजून काही वेळ लापणात बसलो असतो तर कदाचित थरार पाहायला मिळाला असता. एव्हाना ऊन चांगलेच वर आले होते. त्यामुळे कॅमेरा, ट्रायपॉडची आवराआवर करून घरी परतायचा निर्णय घेतला. राजन खरात यांचे आभार मानले व बाहेर पडलो, परंतु पाणवठ्यावरील ते दोन तास कायमस्वरूपी स्मरणात राहिले.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT