Belapur Fort
Belapur Fort Sakal
टूरिझम

ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार

प्रशांत ननावरे

नवी मुंबईच्या बेलापूरमधील एकमेव ऐतिहासिक वास्तू असलेला बेलापूर किल्ला अतिशय छोटा असला तरी आवर्जून भेट देण्यासारखा आहे. सुट्टीची मजा लुटण्यासाठी शहरापासून लांब जायचे नसल्यास नजीकच्या या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देता येऊ शकते.

अधिकृतरीत्या जलदुर्ग नसला तरी जलदुर्गांच्या पंक्तीत सहज सामील केला जाऊ शकला असता, असा शहराच्या वेशीवरील एक किल्ला अलीकडच्या काळात चर्चेत आला होता. निमित्त होते जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे टेहळणी बुरूज ढासळण्याचे. एकेकाळी खाडीकिनारी वसलेला, कल्याण शहर अत्यंत भरभराटीला असताना ज्यामार्गे कल्याणला जाणे सोयीचे होते असा, राघोबादादा पेशव्याच्या बंडाईच्या वेळी ब्रिटिशांच्या फौजा कल्याणवर चालून जाण्याच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा, खाडी असल्यामुळे पोर्तुगीजांना गलबतांमधून पळून जाण्यास मदतनीस ठरलेला आणि पोर्तुगीजांकडून चिमाजी आप्पांनी जिंकलेला किल्ला म्हणजे बेलापूरचा किल्ला होय!

एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला उंचचउंच इमारती असलेल्या पाम बीचच्या मख्खन रस्त्यावरून वेगाची मजा लुटत बेलापूरचा किल्ला गाठता येतो. थंडीच्या दिवसात तर या रस्त्याला लागून असलेल्या खाडीमध्ये हजारो मैलांचे अंतर कापून आलेल्या फ्लेमिंगोंचे दर्शनसुद्धा घडते. रेल्वेने आल्यास बेलापूर रेल्वेस्थानकात उतरून पाम बीच रोडच्या दिशेने जाताना उरण फाटा रस्त्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर एक रस्ता बंदराच्या किंवा खाडीच्या दिशेने जातो. या रस्त्यावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर बेलापूर किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने कोणतेही प्रवेशद्वार नाही. त्यासाठी मुख्य रस्ता सोडून मागच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या रेस्ट हाऊसच्या आवाराच्या बाजूने किल्ल्यात जाता येते. मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच असल्याने सुट्टीच्या दिवशी सायकल राईड करूनही किल्ल्याला भेट देता येऊ शकते. खरंतर सायकलने आजूबाजूचा परिसरही अधिक चांगल्या पद्धतीने धुंडाळून काढता येऊ शकतो.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी बांधलेल्या या किल्ल्याचे त्यांनी ठेवलेले नाव होते ‘सॅबेज’. ऐतिहासिक कागदपत्रानुसार किल्ल्याला पाच बुरुज असून बंदराच्या रक्षणाकरता त्यावर तोफा ठेवण्यात आल्या होत्या. फार पूर्वीपासून या खाडीचा हेरगिरीसाठी उपयोग केला जात असल्याने बेलापूरचा किल्ला धोरणात्मकदृष्ट्या कायमच महत्त्वाची कामगिरी बजावत असे. रूढार्थाने किल्ला म्हणून अतिशय उंच ठिकाणी, मोठी तटबंदी, लाकडी दरवाजे किंवा विस्तृत परिसर बेलापूर किल्ल्याला नाही, तरी अस्तित्त्वात असलेल्या अवशेषांवरून त्याची सामरिकपणे केलेली बांधणी लक्ष वेधून घेते.

किल्ल्यावर जाण्याच्या रस्त्यावर देवीचे मंदिर आहे. अलीकडच्या काळातील या मंदिरामध्ये जाण्यासाठी काही पायऱ्या चढून वर जावे लागते. वर पोहोचल्यावर निळ्या-हिरव्या-गुलाबी रंगात रंगविलेले मंदिराचे प्रवेशद्वार नजरेस पडते. मंदिरांच्या पायऱ्यांसमोर एक अतिशय जुने कौलारू घरदेखील आहे. जुन्या पद्धतीची लाकडी बांधणी, समोर मोठाले आवार आणि आत प्रवेश करण्यासाठी छोट्याशा गेटकडे नजर न जाणे केवळ अशक्यच. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर केवळ ‘दुर्ग बेलापूरकडे’ असं लिहिलेली एकमेव पाटी एका झाडावर लावलेली दिसते. ती नजरेतून सहज सुटू शकते, त्यामुळे पाटी न दिसल्यास स्थानिकांना किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग विचारणे योग्य ठरेल. किल्ल्याकडे जाणारा जवळपास अर्धा किलोमीटरचा रस्ता अतिशय चांगला डांबरी असून दुतर्फा झाडी आहेत. महानगरपालिकेच्या रेस्ट हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दहा मीटर आधी डावीकडे एक वाट वर जाते. ही मातीची वाट चढून गेल्यावर किल्ल्याचे अवशेष दिसू लागतात.

किल्ल्याचा परिसर आखून देईल, अशी उंच तटबंदी किल्ल्याला नाही. काही बाजूंनी दगडाचे बांधकाम केलेली भिंत दिसते; पण त्याच्या तटावर सहज चढता येईल इतकीच त्याची उंची आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला एक मोठी दुमजली वास्तू दिसते. वास्तूच्या खालच्या बाजूला स्थानिकांनी काही मूर्ती ठेवल्या असून, शेजारीच बुरूज असा फलकही ठेवलेला दिसतो. पोर्तुगीज स्थापत्यशैलीच्या या वास्तूच्या पहिल्या मजल्याची जमीन किंवा तळमजल्याचे छत पडलेले आहे. तळमजल्याच्या उंचीपर्यंत इतर भिंती टिकून आहेत. वरच्या मजल्याच्या जमिनीसाठी आधार म्हणून भिंतीमध्ये ज्या जागी तुळया रोवण्यात आल्या होत्या त्या खाचा तीनही बाजूंना स्पष्टपणे दिसतात. या बुरुजावरून वरच्या बाजूला तोफांसाठीच्या खिडक्या दिसतात. या खिडक्यांमधून बाहेर डोकावून पाहिल्यास खाडीचा खरा विस्तार लक्षात येतो. उरणच्या दिशेने जाणारा उड्डाणपूल, त्यावरील वाहतूक, खाडीतील बोटी, आजूबाजूला उभं राहिलेलं सिमेंट काँक्रीटचं जंगल आणि कांदळवन पाहिल्यावर या किल्ल्याचं त्या काळचं महत्त्व लक्षात येतं. किल्ल्यामध्ये एक छोटासा हौददेखील आहे. या हौदाला जिवंत झरे नाहीत, त्यामुळे हौद केवळ पाणी साठवण्याचा आहे. हौदाच्या पूर्वेला किल्ल्याची पूर्वेकडील तटबंदी दिसते. तटबंदीचा फक्त पायाच शिल्लक असला तरी अवशेषांवरून ती अत्यंत भक्कम स्वरूपाची होती हे सहजपणे लक्षात येते.

पनवेलच्या खाडीचा विस्तार, नेरूळ ते उरण रेल्वेमार्ग आणि संपूर्ण बेलापूरचे दर्शन या किल्ल्यावरून होते. अतिशय आटोपशीर आणि शहराच्या वेशीवरील हा किल्ला भौगोलिक स्थानाचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने पटवून देतो.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT