kanheri bauddha leni
kanheri bauddha leni sakal
टूरिझम

स्थापत्य कलेतील सर्वोत्तम कलाकृती

प्रशांत ननावरे

मुंबई रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील बोरिवली रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सहा किलोमीटर कान्हेरी लेणी आहेत.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेली कान्हेरी बौद्ध लेणी उत्तर मुंबईच्या साष्टी बेटाच्या अरण्यात आहेत. तब्बल ११० लेणी या हीनयान व महायान पंथाशी संबंधित बौद्ध स्थापत्य कलेतील सर्वोत्तम कलाकृती मानल्या जातात. इ.स.च्या पहिल्या शतकापासून या बौद्धमठाच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली. पहिल्या दीड-दोनशे वर्षांतच येथे जवळजवळ पाऊणशे लेणी खोदल्या गेल्या आणि उर्वरित लेणी पुढील कालखंडात टप्प्याटप्प्याने खोदण्यात आल्या.

मुंबई रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील बोरिवली रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सहा किलोमीटर कान्हेरी लेणी आहेत. उद्यानाच्या वेळेनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी त्या खुल्या असतात. लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवेशद्वारापासून टॅक्सी सेवा आहे. शिवाय सायकलही भाड्याने मिळतात. उद्यानाचे आणि कान्हेरीचे तिकीट मात्र वेगवेगळे असून लेणींच्या पायथ्याशी त्याचे तिकीट मिळते. कान्हेरीच्या ११० लेणी एका दिवासांत पाहणे आणि त्यामागचा इतिहास समजून घेणे केवळ अशक्य आहे; परंतु मुख्य लेण्यांनाही जरी धावती भेट द्यायची असेल तर एक संपूर्ण दिवस या लेण्यांच्या सानिध्यात घालवावा लागेल. कान्हेरीतील लेणी, त्यातील शिल्पे आणि इतर बाबी समजून घेण्यासाठी सोबत मार्गदर्शक घेतल्यास उत्तम, त्यासाठीची चौकशी उद्यानातील निसर्ग माहिती केंद्रात करता येईल.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला दगड तासून ही लेणी बनवलेली आहेत. दक्षिणेकडील डोंगर उतारावर वेगवेगळ्या स्तरांमध्ये लेणी खोदण्यात आलेल्या आहेत. बहुतेक लेणींमध्ये शिलालेख आढळून येतात. त्यात विविध भिक्षू आणि उपासकांनी लेणी व संबंधित कार्यांसाठी दिलेल्या दानधर्माचा व भेटीगाठींचा उल्लेख आहे. कान्हेरीचा प्राचीन उल्लेख येथूनच प्राप्त झालेल्या शिलालेख व ताम्रपटात ‘कन्हगिरी’ व ‘कृष्णगिरी’ असा आहे. हीनयान, महायान आणि वज्रयान संप्रदायाचा पगडा या लेणींवर दिसून येतो. येथील लेण्यांत शंभरावर अभिलेख असून, काही भित्तिचित्रेही आहेत. उत्कृष्ट जल व्यवस्थापन, दुर्मिळ बौद्ध शिल्पे व विशिष्ट लयन स्थापत्य रचना ही या लेण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या लेण्यांचे शैलीगत वैशिष्ट्य व शिलालेखांवरून या लेणी तीन कालखंडात विभागण्यात आल्या आहेत. पहिला ‘हीनयान लेणी’, दुसरा ‘प्रारंभिक महायान लेणी’ आणि तिसरा ‘महायान लेणी’. येथील बहुतेक लेण्यांची रचना खोल्यांसह मंडप, बाक व समोर व्हरांडा अशा प्रकारची आहे. भारतीय लयन स्थापत्याच्या इतिहासात अशा प्रकारची रचना अद्वितीय मानली जाते. लेण्यांमधील शिल्पांवरून त्यांचा इतिहास जाणून घेण्यास मदत होते. काही लेण्यांमध्ये निवडक तर काही लेण्यांची संपूर्ण भिंतच शिल्पांनी व्यापलेली दिसते, मात्र ते समजून घेण्यासाठी सोबत माहितगार व्यक्ती असणे आवश्यक आहे.

येथील प्रत्येक लेणी थेट कातळामध्ये कोरण्यात आली आहे. लेणीमध्ये प्रवेश करण्याच्या पायऱ्या, प्रवेशद्वार, खांब, आतील रचना, कलाकुसर आणि शिल्प पाहता त्या काळातील कारागीर आणि कलाकारांना असलेले स्थापत्यकलेचे ज्ञान पावलोपावली आपल्याला अचंबित करतं. बौद्ध धर्मीयांच्या पवित्र स्तूपांसोबतच बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी निर्माण केले विहार, सभागृह, खोल्या, स्तूप अशा वास्तू येथे आढळतात.

प्रत्येक लेणीचे वेगळे महत्त्व आहे. लेणी क्र. ४१ च्या प्रांगणातील एका छोट्या कक्षात कोरलेले एकादशमुखी अवलोकितेश्वराचे एक शिल्प ही या देवतेची जगातील सर्वांत प्राचीन ज्ञात दगडी मूर्ती मानली जाते. लेणी क्र. ३४ मध्ये सहाव्या शतकातील अर्धवट भित्तिचित्रे, लेणी क्र. ९३ मध्ये बुद्धांची ‘मुचलिंद’ नागासह एक सुंदर मूर्ती आहे. लेणी क्र. ११ हे कान्हेरीतील सर्वांत विशाल लेणी असून ‘दरबार लेणे’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. यात एक गाभारा व भिक्षूंसाठी खोल्या आहेत. यात बुद्ध, अवलोकितेश्वर, पद्मपाणी इ. प्रतिमा आहेत. हा विहार वेरूळ येथील लेणी क्र. पाचसारखा असून, सातव्या शतकात खोदला गेलाय. यात शिलाहार राजा कापार्दिनच्या काळातील एक शिलालेख असून, यात या लेण्याला ‘श्री कृष्णगिरी महाराज महाविहार’ असे संबोधित केले आहे. तिसऱ्या कालखंडातील लेणींत बोधिसत्त्व, ध्यानी बुद्ध, अक्षोभ्य, तारा व भृकुटी इ. महत्त्वाची शिल्पे आढळतात. विशेष म्हणजे लेणी क्र. १ अर्धवट असून कान्हेरीतील सर्वांत शेवटी खोदण्यात आलेली लेणी आहे.

कान्हेरीला वर्षभरात केव्हाही भेट देता येऊ शकते; पण तेथील जलव्यवस्थापन पाहायचे असल्यास पावसाळा हा उत्तम ऋतू ठरेल. मठातील भिक्षूंनी जवळपास अठराशे वर्षांपूर्वी जलव्यवस्थापन केल्याचे पुरावे आढळतात. कारण मुंबईतील सर्वांत प्राचीन कृत्रिम जलाशय कान्हेरीला बांधला गेलाय. कान्हेरीच्या लेणी तीन टेकड्यांवर पसरलेल्या आहेत. या तीन टेकड्यांच्या मधोमध सखल भाग आहे. याच भूरचनेचा वापर कृत्रिम जलाशयनिर्मितीसाठी केला जात असे. कान्हेरीच्या लेणी क्रमांक ४१ जवळच या प्राचीन धरणाचे अवशेष व शिलालेख पाहायला मिळतो. कान्हेरीच्या सर्वात वरच्या लेणीपासून तळाच्या लेणीपर्यंत पावसाचे पाणी आणण्याची रचना पाहण्यास मिळते. पावसाचे पाणी विशेषप्रकारे वळवून पाण्याच्या मोठ्या टाक्या भरल्या जात असत.

कान्हेरीबद्दल लिहावे तितके कमीच आहे. तो एक अचंबित करणारा अनुभव आहे, जो प्रत्यक्ष तिथे जाऊन घ्यायला हवा. वारंवार घ्यायला हवा. पहिल्या भेटीनंतर तुम्हाला याची अनुभूती नक्की येईल.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT