Maldoli Chiplun
Maldoli Chiplun esakal
टूरिझम

खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?

सकाळ डिजिटल टीम

चिवेली आणि जगबुडीचे खोरे हे साधारण शंभर-सव्वाशे वर्षांच्या मगरीने भरलेले खोरे आहे.

-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com

खाडीत मस्त पहाटेचा लालभडक उगवता सूर्य..... साधारण शंभर-सव्वाशे वर्षे मगरीने भरलेले चिवेली आणि जगबुडीचे खोरे (Jagbudi Valley). पंधरा-पंधरा फुटी मगरी शेकड्याने खाडीकिनारी पहुडलेल्या. शंभर वर्षांपूर्वी कोकणात आंबा, काजू, फणस यांचे भरघोस उत्पन्न का यायचे? याचे सोपं उत्तर मिळेल, असा वाड्याचा परिसर. हे सर्व पाहायचं असेल तर सरळ मालदोली गाव गाठावं लागेल...!

खाडीच्या मध्यात उगवणारा सूर्य पाहायचा असेल तर सरळ मालदोली गाव (Maldoli Chiplun) गाठावं. मालदोलीमध्ये जाताना चिपळूण-गुहागर रस्ता आणि मध्ये मुंढे फाटा लागतो. तेथून भिले, केतकी, करंबवणे गाव करत जाता येते; पण माझ्या आवडीचा रस्ता म्हणजे चिपळूण बाजारपेठ ते गोवळकोट किल्ला (Gowalkot Fort) रस्ता. पुढे कालुस्ते गावाला प्रदक्षिणा घालत भिलेफाटा. तिकडून केतकी, करंबवणे करत मालदोली. हाच मार्ग का? तर दाभोळच्या बंदरात आत घुसलेली खाडी साधारण १५० किमी वळणे घेते. शेवटचे टोक म्हणजे गोवळकोट. हा १५० किमीच्या खाडीपट्ट्यात कोकणातील सागरी निसर्गजीवन अवलंबून असते.

लोटे एमआयडीसी टाकाऊ रसायने टाकते त्यामुळे हे जीवन सध्या शेवटचे घटका मोजत आहे. सतत आंदोलने आणि उपाय असा प्रकार चालू असतो तर मालदोलीला जाताना वाटेत गोवळकोट (गोविंदगड) नावाचा किल्ला लागतो. या किल्ल्याला छत्रपती शिवरायांनी भेट दिल्याचा संदर्भ आहे. किल्ला साधारण चार ते पाच एकरवर वसलेला. चहुबाजूंनी चिपळूणचे विहंगम दृश दिसते आणि संपूर्ण गोवळकोट खाडी. एकदा सहज साडेसहा वाजता या किल्ल्यावर गेलो असता साधारण दीडशे ते दोनशे धनेश पक्षी बसलेले दिसले. एवढे एकत्र धनेश पक्षी प्रथमच पाहायला मिळाले. नंतर माहिती काढली असता साधारण आठ दिवसाकरिता हे पक्षी या गडावर येतात आणि नंतर पुढे जातात, असे पक्षी निरीक्षण आहे; पण तुफान मजा आली होती.

गोविंदगड, शिवकालीन बुरूज, चुनाभट्टी, पाण्याचे टाके आणि तोफा असे अवशेष दाखवत आजही उभा आहे. तेथून तुम्ही कालुस्ते गावाला वळसा घालायचा. हा वळसा म्हणजे एक सुंदर कविता आहे. एका बाजूला मोठमोठे बंगले आणि एका बाजूला जपलेले गावपण याची सांगड आणि सोबत अतिशय दुर्मिळ असणाऱ्या खाड्यांपैकी एक खाडी गोवळकोट. तेथून अतिशय वाकडे असे कोकणी टर्न मारले की, आपण लागतो भिले रोडला आणि तेथून भिलेफाटा.

या भिलेफाट्यावर वृद्ध आजी-आजोबांचे एक दुकान आहे. तेथील कांदापोहे, बटाटावडा आणि उसळपाव एकदम चविष्ट असतात. कुठेही नाश्ता न करता पहिला मुक्काम येथे आणि मग भिले, केतकी आणि करंबवणे करत आपण मालदोली गावात पोहचतो. तेथे शैलेंद्र संसारे याचे एक छोटेखानी घरगुती रिसॉर्ट आहे. खाडीला लागूनच असल्याने पाय पसरत मस्त जेवणाची ऑर्डर द्यायची. शैलेंद्र तुम्हाला या खाडीचे वैशिष्ट्य असलेले अनव नावाचा करंगळीएवढा मासा त्याचे तिखट आणि गरम मऊ भाकरी खायला घालतो. मग निघायचे मालदोली पाहायला. मालदोलीमध्ये काय पाहायचे तर येथे खाडीत मस्त पहाटेचा लालभडक उगवता सूर्य पाहता येतो, फोटोग्राफर खुश होतात. तेथून शेकड्यात मगरी पाहायला जाता येते.

चिवेली आणि जगबुडीचे खोरे हे साधारण शंभर-सव्वाशे वर्षांच्या मगरीने भरलेले खोरे आहे. पंधरा-पंधरा फुटी मगरी शेकड्याने सहजपणे खाडीकिनारी पहुडलेल्या असतात. हे मगरदर्शन झाले की, ट्रेझरहंट करायला दिवा बेटाकडे जायचे. स्थानिक वाटाड्या झाडे तोडत तुम्हाला या बेटावर नेतो आणि साधारण दोन-तीन हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडू लागतात. भांडी, नाणी वगैरे वगैरे. हे करून दमला असाल तर पुन्हा मालदोली यायचे आणि ताम्बोशी नावाचा मासा खायचा अतिशय चविष्ट.

आता एवढं सर्व झाल्यावर डोक अजून शार्प बनवायला निघायचे मराठेवाड्याकडे. शंभर वर्षांपूर्वी कोकणात आंबा, काजू, फणस यांचे भरघोस उत्पन्न का यायचे? याचे सोपं उत्तर जाणून घ्यायला हा वाडा आवश्यक पाहायला हवा. मालदोली गावातच (कै.) रामचंद्र वासुदेव मराठे यांची हेरिटेज ठरेल, असे वास्तू आहे. हा वाडा एकूण साडेसात एकर परिसरात दोन हजार चौ. फूट बांधकामात पसरलेला आहे. वाड्याचे आरेखन , भारतरत्न अभियंता डॉ. विश्वेशरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्यांना ही वास्तू पाहण्यासारखी आहे. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य इथे जी आंब्याची बाग आहे तिथे दर चार-पाच झाडामागे सोनचाफा, बकूळ, खुरीची सुंगधित फुले देणारी झाडे लावण्यात आलेली आहेत जेणेकरून नैसर्गिकरित्या मधमाशा तिथेच फिरत राहाव्यात व परागीभवन होऊन उत्पन्न वाढावे.

सध्या आंब्याच्या बागा कमी उत्पन्नाने ग्रस्त आहेत. त्या आंबा बागायतदारांनी हा उपाय जरूर करावा. सर्वात महत्वाचे, हा वाडा वास्तूशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. अतिशय उजेड येणारी रचना, वाड्याचे दोन समान उभे भाग, संपूर्ण लाकडी काम, शंभर वर्षापूर्वीचे ड्रेनेजने गंजलेले ड्रेनेज पाईप आणि वाड्याच्या कोणत्याची मजल्यावर उभे राहिले की, दिसणारी सात एकराची आंब्याची बाग अशी रचना. जरूर हा वाडा पाहा. अर्थात, सध्या तेथे मराठे यांच्या वंशजांनी हा वाडा विश्व हिंदू परिषदेला दान केला आहे. तेथे एक वृद्धाश्रम चालवले जाते. तोही पाहता येतो. दुर्मिळ खाडी, दुर्मिळ मासे, आशियातील सर्वात मोठे नैसर्गिक मगरीचे अधिवास, विविध पक्षी आणि हेरिटेज वाडा अशी डिश भन्नाट आंब्याचा मोहराच्या वासासकट हे मालदोली गाव सर्व्ह करते. हे ठिकाण नक्कीच पाहावे असेच आहे!

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT