उत्तर महाराष्ट्र

पोलिस नाही गस्तीवर चोरटे, दरोडेखोर वस्तीवर!

रईस शेख, जळगाव

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरात गेल्या वर्षभरापासून चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, जबरी लूट या गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून, यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिस पूर्णत: अपयशी ठरल्याचे चित्र आहे. गुन्हे शाखा, डीबी पथकातील कर्मचाऱ्यांच्या खबऱ्यांचे नेटवर्क, टोळ्यांचा अभ्यास नसणे हेच ‘लूज पोलिसिंग’चे एकमेव कारण आहे. पोलिस केवळ अंगाने गस्तीला असतात, दिवस उजाडला की घरफोडी-दरोड्याचे गुन्हे समोर येतात. साकेगाव दरोडा, यावल रस्तालूट, बोहर्डी पेट्रोलपंपावरील लूट, फैजपूर लूट, पिंप्राळा दरोडा, पारोळ्यातील डेअरीतून १६ लाख लंपास आदी रोज नव्या गुन्ह्यांची भर पडत असून, गेल्या दोन वर्षांत घडलेल्या मोठ्या गुन्ह्यांतही तपासाचे भिजत घोंगडे आहे. ज्या गुन्ह्यांत संशयितांना अटक झाली आहे, त्यात मात्र पोलिस कुठलीही ‘रिकव्हरी’ अटकेतील गुन्हेगारांकडून करू शकले नाहीत. नियंत्रणाबाहेर गेलेल्या गुन्हेगारीचा हा धावता आलेख...

जळगाव शहरात गेल्या दोन वर्षांत घडलेल्या मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाच्या फायली एकापाठोपाठ बंद करण्याचा सपाटाच पोलिस ठाण्यांनी लावला आहे. तक्रारीत तथ्य असूनही गुन्हेगार सापडून येत नसल्याने तपास बंदची प्रकरणे वाढत आहेत. अत्यंत दाट लोकवस्तीच्या शनिपेठ, रिधुरवाडा भागात भरदुपारी सहा-सात दरोडेखोर येतात अन्‌  ते ६० लाखांचे सोने लुटून नेतात. दाखल गुन्ह्यात मुद्देमाल कमी दाखविला जातो. गुन्ह्याचा तपास दोन वर्षे उलटल्यानंतरही होत नाही. जामनेर येथील व्यावसायिकाच्या कारमधून ५० लाखांची रोकड अजिंठा चौफुलीसारख्या वर्दळीच्या ठिकाणावरून चोरीस जाते, या गुन्ह्याचाही तपास लागलेला नाही. गुन्हेशाखेच्या पथकाने हैदराबादची टोळी या गुन्ह्यात अटक करून आणली. मात्र त्यात गुन्ह्यात ‘रिकव्हरी’ पोलिसांना घेता आली नाही. भजे गल्लीतील चोपडा मार्केट परिसरातील सिगारेट गुदाम फोडत आंतरराज्यीय टोळीने चक्क अर्धाकोटी रुपयांची सिगारेट लंपास केली. या गुन्ह्यातही संशयित अटक झाले, मात्र, कुठलाही मुद्देमाल मिळू शकला नाही. जे. टी. चेंबर येथील मोबाईल शोरूम फोडून वीस लाखांचे मोबाईल लंपास झाले. याही गुन्ह्याचा तपास नाही. ज्या गुन्ह्यात संशयित मिळून आले, त्याकडून ‘रिकव्हरी’ होत नाही. परिणामी गुन्हा घडला, संशयित अटकही झाले; मात्र गुन्हा शाबितच होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊन संशयित काही दिवस जेल भोगून परत आपल्या गुन्हेगारी विश्‍वात परततो. 

वेगळ्या प्रयत्नांची गरज
‘डीवायएसपी’ सचिन सांगळे, अप्पर अधीक्षक बच्चनसिंह यांनी शहरात मोठे गुन्हे करणाऱ्या जवळपास सात हजारांवर गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. गुन्हेगार दत्तक योजनेअंतर्गत त्यांच्यावर नजरही ठेवली जाते. असे असताना गुन्हे नियंत्रणात येत नसतील तर यापेक्षा वेगळे प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरते. याला एकमेव उपाय अर्थात जुन्या पद्धतीचा अवलंब करीत गुन्हेगारी टोळ्यांची माहितीसह त्यांच्यातील संपर्क, कच्चे दुवे, टोळ्यांमधील किंवा गुन्हेगार-गुन्हेगारांतील द्वेष आणि वैर शोधणे, साधारण पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत खबऱ्यांचे स्ट्राँग नेटवर्किंग असलेलाच कर्मचारी स्थानिक गुन्हेशाखा, गुन्हेशोध पथक अशा महत्त्वाच्या ठिकाणावर नियुक्तीला येत असे. आता मात्र गुन्हेगारांचे नेटवर्किंग असो किंवा नसो, पॉलिटिकल नेटवर्क महत्त्वाचे आहे. गुन्हेशाखेत शंभर आणि पोलिस ठाणे निहाय प्रत्येकी पंधरा ते वीस कर्मचारी डीबी पथकात कार्यरत आहेत...हे सर्व आमदार-खासदार, मंत्री यांच्याशी संपर्कातील आणि वशिल्याने आले असल्याने त्यांना गुन्हेगारांची माहिती मिळणार तरी कशी हा प्रश्‍न आहे.

भुसावळला गुन्ह्यांचे वाढले प्रमाण 
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत यावर्षी जानेवारीपासून २५ नोव्हेंबरपर्यंत २० घरफोड्या, ३५ चोऱ्या, तीन खून, तीन बलात्कार आणि सदोष मनुष्यवधाचा एक गुन्हा दाखल झाला. घरफोडीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडे आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. खून आणि बलात्कार प्रकरणी सर्व संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. चोरी आणि घरफोडी प्रकरणात सराईत चोर पळून गेले असून त्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळालेले नाही. तर, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत यंदा एक जबरी जोरी, दहा चोऱ्या, दोन खून आणि एक बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्यापैकी पाच चोरी, बलात्कार, खुनाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

भुसावळ विभागात पोलिसांची गस्त वाढविली आहे. दोन चोरीच्या घटना तातडीने उघडकीस आणल्या असून, गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशील आहे. 
- लतीफ तडवी,  उपविभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ

मोजकेच कामगार, बाकी ठेकेदार
जळगाव शहरासह जिल्ह्यात प्रत्येकच पोलिस ठाण्यातील निरीक्षकांच्या नियंत्रणाबाहेर पोलिस ठाण्यांचा कारभार पोहोचला आहे. रात्रगस्तीला दुय्यम अधिकारी एक- दोन कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री साडेदहाला आस्थापना बंद करण्यासाठी सायरन वाजवत फिरतात. त्यानंतर गस्तीवाहन रात्री ठीक दोनलाच मोजक्‍या ठिकाणी सायरन वाजवताना दिसते. नंतर दिवस उजाडेपर्यंत चोरांसाठी शांतता असते. बिटमार्शल कुठेतरी बसून वॉकीटॉकीचे लोकेशन नियंत्रण कक्षाला सांगून रात्र काढतात. साहेबांच्या नजरेत कुचकामी, न आवडणारे कर्मचारी रात्रीच्या ड्युट्या घेतात, उर्वरित मात्र हजेरी मास्तरला ‘मॅनेज’ करूनच ठेकेदार पद्धतीने ड्यूटी करतात. 

‘आरएफआयडी’ यंत्रणा तरी घरफोड्या, दरोडे
जळगाव उपविभागात सर्व सहा पोलिस ठाण्यांमध्ये आरएफआयडी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रात्रगस्तीचे कर्मचारी इमाने इतबारे, हजेऱ्याही लावतात. एकेका पोलिस ठाण्याच्या हद्दीत विभागलेल्या टप्प्यात २० ते ३० पंचिंग करुन पोलिस कर्मचारी, गस्तीपथकातील वाहने पहाटे पाच वाजता परत येतात. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी बंद घर फोडल्याचे आणि दरोडा पडल्याचे गुन्हे समोर येत आहेत. 

पोलिसांचे नेटवर्किंग पिचले...
पूर्वीच्या पोलिसिंगमध्ये गुन्हेशोध पथकातील कर्मचाऱ्यांचे स्वत:चे नेटवर्किंग काम करीत होते. आता मात्र सर्व तांत्रिक तपासावर गुन्ह्यांची मदार आहे. प्रत्येकच पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकांमध्ये आपसांतील वादाची प्रकरणे, कर्मचाऱ्यांतील गट-तट असल्याचे निदर्शनास येते. घरफोडी झालीच तर डॉगस्कॉड, फिंगरप्रिंट आणि मोबाईल नेटवर्किंगच्या आधारावर तपासाला सुरवात होते. पोलिसांना आपसांतील वादातून अभ्यासाला वेळच मिळेनासा झाला आहे. घडल्या गुन्ह्याची पद्धत, सुटलेल्या गुन्हेगारांवरील नियंत्रण, परप्रांतीय टोळ्यांचा अभ्यास करण्यास पोलिस कर्मचाऱ्यांना वेळच उरलेला नाही. 

बेरोजगारी वाढल्याने गुन्हेगारीकडे कल 
गेल्या वर्षभरात बांधकाम व्यवसाय, मजुरी, कारखानदारीत हातावर पोट असणाऱ्या मजुरांना काम मिळेना, अशी अवस्था निर्माण झाली आहे. परिणामी, चोऱ्या, घरफोड्यांमध्ये स्थानिक गुन्हेगार सक्रिय झाल्याचे आढळून येते. मोठा गुन्हा घडताच पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांनाच शोधण्याची मोहीम अगोदर राबवली जात असल्याने या गुन्हेगारांकडे फारसे लक्ष जात नाही. नाइलाज म्हणून गुन्हेगारीत येणाऱ्या तरुणांना पूर्वीचा एखादा रेकॉर्डवरील गुन्हेगार जवळ करतो आणि आपली नवी टोळी तयार करून पाच-पंचवीस गुन्हे गुन्हे करून सहज निसटून जातो. 

महामार्ग चोरट्यांसाठी वरदान 
जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या एका टोकापासून ते थेट दुसऱ्या टोकापर्यंत समसमान विभागणी करणारा मुख्य रस्ता असल्याने महामार्गाजवळचे गाव तालुके आणि तेथील महामार्गालगतच्या नागरी वस्त्या घरफोड्या, दरोड्यांसाठी टार्गेटवर असतात. त्या सोबतच व्यावसायिक प्रतिष्ठानेही चोरट्यांकडून लक्ष केल्या जात आहेत. जिनिंग प्रेस, पेट्रोल पंप सहजासहजी लूट करता येणारे ठिकाण आहे. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करता येणे आज तरी जिल्हा पोलिसदलास आवश्‍यक असून जोपर्यंत एशियन महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही तो पर्यंत नाकाबंदी आणि गुन्हेगारांना आळा घालता येणे अशक्‍य आहे. 

स्थानिक, परप्रांतीय टोळ्यांचा उपद्रव 
तरसोद एचडीएफसी बॅंक दरोडा, भुसावळ-मुक्ताईनगर दरम्यान पेट्रोलपंपावर शस्त्र लावून केलेली लूट, यावल अंजाळा घाटातील नेहमीची रस्तालुटीचे प्रकार भीती निर्माण करणारे रस्त्यावरील मोठे गुन्हे गेल्या महिन्याभरात घडले आहे. गुन्ह्यांची पद्धत आणि मोडस्‌ प्रमाणे स्थानिक गुन्हेगारांसह परप्रांतीय टोळ्यांचा उपद्रवातून हे गुन्हे घडल्याचे पोलिसांचा अभ्यास सांगतो. भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण आणि रेल्वे, महामार्ग मुख्य रस्त्यांचे जाळे बघता जळगाव जिल्हा नेहमीच सातपुडा पर्वतमार्गे मध्यप्रदेशातून येणाऱ्या टोळ्या, औरंगाबाद अहमदनगरच्या या भागातील टोळ्यांसह मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील टोळ्या आदींच्या पसंतीचा जिल्हा झाला आहे. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चकवा 
जिल्ह्यात प्रत्येकच एटीएम यंत्राजवळ सीसीटीव्ही कॅमेरे असतात, पेट्रोलपंप, बॅंका, आणि मोठ्या उद्योगात अत्याधुनिक आणि रात्रीचे शूटिंग करणारे महागडे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. गुन्हा घडण्याची वेळ आणि संशयितांची पद्धत इतकेच या सीसीटीव्ही कॅमेरातून निष्पन्न होते. कारण, गुन्हेगार माकड टोप्या, तोंडाला रुमाल बांधून शिरतात आणि आत गेल्यावर कॅमेऱ्याची वायर तोडणे, शक्‍य झाल्यास डीव्हीआर यंत्रणा सोबत घेऊन जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. नुकत्याच घडलेल्या दरोड्यांच्या गुन्ह्यात मारहाण केल्यानंतर पोलिसांना फोन करू नये, यासाठी संबंधिताजवळचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून घेतला. मात्र, काही अंतरावर हा मोबाईल तोडून फेकल्याचे आढळले. परिणामी मोबाईल ट्रेसिंगही या गुन्ह्यात अपयशी ठरले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress in Action Mode : बिहार निवडणुकीसाठी विरोधकांच्या जागा वाटापाआधीच काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर!

'संधी मिळाली तर मी नक्कीच अभिनय करेल' लक्ष्याच्या लेकीनं व्यक्त केली मनातली इच्छा, म्हणाली...'मी प्रयत्न केले पण...'

Heavy Rain: पूर अन् अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत किती मिळणार? काय आहे प्रक्रिया?

Nashik Monsoon : भांडी बाजारापर्यंत पुराचे पाणी; ५६ वर्षांपूर्वीच्या १९६९ च्या महापुराच्या रौद्र स्मृतींचा नाशिककरांना उजाळा!

Latest Marathi News Live Update : मनसेच्या निषेधानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांनी हटवले काळे केलेले बोर्ड

SCROLL FOR NEXT