तरवाडे (ता. चाळीसगाव) : सध्या कोरोनाचा इतरत्र प्रादुर्भाव वाढत असताना बाहेरून गावात येणाऱ्यांचा ओघ सुरुच आहे. सध्या जिल्हाबंदी असतानाही मुंबई येथून गावात दोन जण स्वतःच्या कारने आल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली. यापूर्वी गावात बाहेरून येणाऱ्यांना क्वारंटाइन केलेले असल्याने या दोघांनाही क्वारंटाइन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, हे दोघे गावातच नातलगांकडे असल्याने आज सकाळी नऊच्या सुमारास ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांना गावात राहण्यास मज्जाव केला. यावरून काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस गावात आल्यानंतर तणाव निवळला.
तरवाडे गावातील अनेक जण बाहेरगावी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणेसह विविध भागात कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मूळ गावातील असलेले रहिवासी मोठ्या संख्येने सुरक्षेच्या दृष्टीने गावात आले आहेत. त्यांच्यासह तरवाडेकरांचे नातलग देखील सध्या गावात वास्तव्यास आलेले आहेत. बाहेरून आलेल्यांमुळेच कोरोनाची लागण होत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये सध्या प्रचंड भीती पसरली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरून आलेल्यांपैकी अठरा जणांना गावालगतच्या महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या इमारतीत क्वारंटाइन केले आहे. काहींनी स्वतःहून गावापासून दूर अंतरावर असलेल्या शेतांमध्ये राहणे पसंत केले आहे.
१८ जण क्वारंटाइन
सुदैवाने चाळीसगाव तालुक्यात आजपर्यंत एकही कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांपासून निर्माण होणारा धोका लक्षात घेता, ग्रामपंचायतीने अशा १८ जणांना गावापासून जवळच असलेल्या महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्वारंटाइन केले आहे. ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन बाहेरून येणाऱ्यांना याच ठिकाणी राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला सर्वांचाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाहेर गावाहून आलेले अनेक जण आजही गावातच वास्तव्यास आहेत.
ग्रामस्थांचा संताप
कोरोनाची लागण बाहेरगावाहून आलेल्यांमुळे होऊ शकते, ही भीती लक्षात घेऊन बाहेरून येणाऱ्या सर्वांनाच क्वारंटाइन करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, सदन कुटुंबांतील तसेच आजी, माजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक कोणालाही न जुमानता सर्रास गावात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे केवळ गोरगरिबांनाच क्वारंटाइन करण्याचा नियम आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत आज सकाळी ग्रामस्थांचा तीव्र संताप झाला. गावातील पिठाची गिरणी असलेल्या ग्रामस्थाकडे त्यांचे जावई व मुलगी मुंबईहून आलेले होते. त्यांना क्वारंटाइन करण्याची मागणी होत असतानाही ते गावातच वास्तव्यास होते. त्यांना क्वारंटाइन केले जात नसल्याने ग्रामस्थांनी ‘त्या’ ग्रामस्थाच्या घराजवळ आज सकाळी गर्दी करुन ‘मुंबईहून आलेल्यांना क्वारंटाइन करा किंवा त्यांना त्यांच्या गावी जाऊ द्या’, अशी ग्रामस्थांची मागणी होती. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. ‘आम्ही आमच्या घरातच क्वारंटाइन राहू असे सांगून त्यांनी बाहेर जाण्याला विरोध केला. या प्रकारामुळे ज्या १८ जणांना ग्रामपंचायतीने क्वारंटाइन केले होते, त्यांना लगेचच सोडून देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.