उत्तर महाराष्ट्र

'पाऊस सुसाट पण शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट' !  

सम्राट महाजन

तळोदा : सततच्या संकटांना धैर्याने तोंड देत काबाडकष्ट करीत आपले हिरवे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळीराजाच्या आशेवर यंदाच्या पावसाने खरिपातही पाणी फिरवले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून 'पाऊस सुसाट आणि शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट' अशी विदारक परिस्थिती तळोदा तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

तळोदा शहरात व तालुक्यात खरिपाचा सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला. परंतु शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करुन योग्य ते नियोजन करीत आपली पिके वाचवली होती. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने संततधार लावून धरल्याने मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले. मूग, उडीद या पिकांच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले तर ज्वारी पिकाची पाने पिवळी पडून, सडून गळून पडली होती.

कापूस व सोयाबीनही हातचे गेल्यात जमा 
या परिस्थितीत शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकांपासून मोठी आशा होती. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांची उरलीसुरलेली आशा ही मावळली आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस सततच्या पावसामुळे अक्षरशः काळवंडले आहे तर सोयाबीनवर कोंब फुटले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना काढणीवर आलेले मूग, उडीद, कापूस, सोयाबीन काढण्याची संधी न मिळाल्याने ही पीके शेतातच मुरली आहेत. आता अश्या विपरीत परिस्थितीत जरी पिकांनी तग धरला तरी क्विंटलने येणारे उत्पादन पुढे किलोत येण्याची शक्यता जाणकरांनी वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली असून प्रशासनाने वेळीच दखल घेत त्वरीत पंचनामे करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

लागवड खर्चही वाया जाण्याची भीती 
आताचा परिस्थितीत सोयाबीन, कापूस व ज्वारी शेतकऱ्यांचा घरापर्यंत पोहचलीत तरी त्याचा दर्जा खालावलेला असेल. त्यामुळे दर्जा खालावलेल्या मालाला खरेदीदार मिळेल का? व मिळाला तरी तो चांगला भाव मिळेल का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्च तरी निघतो का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

प्रशासन, लोकप्रतिनिधी दोघांकडून शेतकरी बेदखल 
सततच्या पावसामुळे तळोदा शहरासह तालुक्यातील रांझनी, रोझवा, पाडळपुर, रोझवा पुर्नवसन, मोड, मोकसमाळ, रेवानगर बरोबरच सातपुड्याच्या दुर्गम भागातील पाड्यांमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र अद्यापपर्यंत ना कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले आहेत ना तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी काही विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शेतकरी प्रशासन, लोकप्रतिनिधी दोघांकडून बेदखल झाला आहे असेच म्हणावे लागेल.

संततधार पावसामुळे हैराण झालो असून सर्वच पिकांचे विशेषतः कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरिपात उत्पन्नात घट येणार असल्याने आर्थिक नियोजन कोलमडून पडणार आहे, त्यामुळे यापुढे संसाराचा गाडा कसा हाकावा व शेती कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. काय करावे काही सुचत नाही.
- परशराम पाचोरे, शेतकरी, रांझनी.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

Kedarnath Tourism: मुंबईहून केदारनाथपर्यंत ट्रिप प्लॅन करताय? मग सर्व मार्ग आणि टिप्स जाणून घ्या एका क्लिकवर

Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

Minister Chandrashekhar Bawankule: अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

मोठी बातमी! बसचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परतताना ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT