CM Eknath Shinde Group News
CM Eknath Shinde Group News esakal
नाशिक

Nashik News : नाशिकमधील ठाकरे गटाला खिंडार!; 12 माजी नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

विक्रांत मते

नाशिक : राज्यात शिंदे गटाचे सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले, तरी नाशिकमध्ये फारसे यश हाती मिळत नव्हते. मात्र डिसेंबर महिन्याचा अखेर शिंदे गटासाठी लाभदायक ठरला आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत जवळपास बारा माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गुरुवारी (ता. १५) रात्री मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश झाला आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेच्या शहराच्या एका नेत्याचा, तर भाजपच्या माजी नगरसेविकेच्या वडिलांचा समावेश आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जसा झटका मानला जात आहे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षासाठी देखील हा मोठा धक्का आहे. शहरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेतील नाराजांना सामावून घेता न आल्याचे अपयश गिरीश महाजन यांच्या पदरी पडले आहे. (12 former corporators admitted to CM shinde residence Nashik political Latest Marathi News)

जूनमध्ये राज्यात महाविकास आघाडीला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेचे जवळपास ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला जर्जर करण्याची भूमिका घेतली. या भूमिकेत शिवसेनेचे माजी नगरसेवकांचे प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सहभागी करून घेण्याची मोहीम राबविण्यात आली.

परंतु असे करत असताना शिंदे गटाला नाशिकमध्ये फारसे यश पदरात पडले नाही. त्यामुळे शिवसेनेचा माजी नगरसेवकांचा मोठा ट फोडण्याचे प्रयत्न होते. दोन-तीन महिन्यांपासून यासंदर्भात बोलणे सुरू होते. मात्र अपेक्षित यश मिळत नव्हते. आता मात्र शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेची गद्दारी करणाऱ्यांचे श्राद्ध घालू, असे वक्तव्य करत नाशिक सोडल्यानंतर तत्काळ राजकीय हालचालींना वेग आला.

होय, आम्ही शिंदे गटात चाललोय

आत्तापर्यंत शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, यासह मीडियामधून आलेल्या बातम्या चुकीच्या व पेरण्यात आल्याचा आरोप करणाऱ्यांनीच आघाडी घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्यांची यादी तयार करून सायंकाळी सहाला तयार होण्याच्या सूचना देण्यात आल्या. साडेसातला जवळपास बारा माजी नगरसेवकांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. आतापर्यंत स्पष्ट भूमिका न घेणाऱ्या माजी नगरसेवकांनीच होय, आम्ही शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले.

मध्यरात्रीच होणार प्रवेश

विधानसभेचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ नसल्याने १६ तारखेच्या पहाटेच प्रवेश सोहळा आटोपला जाणार आहे. त्यादृष्टीने गुरुवारीच (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पोचला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जेवणावळीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अधिकृत प्रवेश जाहीर करण्यात आल्याचे समजते.

या नावांची आहे चर्चा...

प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, श्याम साबळे, सुवर्णा मटाले, चंद्रकांत लवटे, ज्योती खोले, रमेश धोंगडे, पूनम मोगरे, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, सीमा निगळ यांची नावे समोर येत आहेत. मात्र वरील नावांपैकी एकानेही आपण प्रवेश करत असल्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. भाजपचा एक प्रवक्ता तसेच मनसेचा शहर विभागातील एक पदाधिकारीदेखील प्रवेश करणाऱ्यांमध्ये आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या माजी बारा नगरसेवकांची नावे समोर येत असली तरी एकूण नगरसेवकांची संख्या जवळपास १८ असल्याचे बोलले जात आहे.

गिरीश महाजन यांना धक्का

शिवसेनेच्या नाराज गटाला सामावून घेण्यात भाजपला अपयश आल्याचे सांगितले जात आहे. माजी पालकमंत्री व नाशिकची जबाबदारी असलेल्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना शिवसेनेचे माजी नगरसेवक पक्षात सामावून घेण्यात अपयश आल्याची नाराजी पक्षाच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली जात आहे. नाराजांची मते हेरता न आल्याने संघटनात्मक पातळीवर पक्षांतर्गत बदलाचे संकेत मिळत आहे.

आता खोके नव्हे पेट्या

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना ५० खोके मिळत नसले तरी पन्नास पेट्या मिळणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या पूर्वी व निवडणुकीच्या कालावधीत त्या दिल्या जातील असे सूत्र ठरल्याची चर्चा आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांना जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांची विकासकामे असे सूत्र ठरल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT