मालेगाव (जि.नाशिक) : कसमादे-खानदेशच्या भूमिपुत्रांच्या हाती राज्याचे प्रशासन यावे, अशी आपली अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची मुले आयएएस व आयपीएस अधिकारी व्हावीत, यासाठी स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देणाऱ्या दोन सुसज्ज विद्यालयांची निर्मिती करू. भूमिपुत्रांच्या ताब्यात महाराष्ट्राचे प्रशासन येत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरू राहील. निसर्ग प्रतिकूल असताना जिद्द व परिश्रमातून येथील शेतकरी वेगळे प्रयोग यशस्वीरीत्या राबवितात. आगामी काळात कसमादे इस्त्राईलबरोबर स्पर्धा करेल, असा विश्वास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी व्यक्त केला.
विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांचे प्रतिपादन
दहिदी (ता. मालेगाव) येथे प्रगतिशील शेतकरी रमेश कचवे यांच्या पुढाकाराने झालेल्या शेतकरी व पोलिसपाटलांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कृषिभूषण अरुण देवरे अध्यक्षस्थानी होते. श्री. दिघावकर म्हणाले, की शेतकरी व त्यांच्या मुलांची अवस्था हलाखीची आहे. शेतमालाला भाव नाही. नोकरीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना गंडविले जाते. नोकरीसाठी फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे त्यांना न्याय मिळवून देऊ. आजवर ३२ टोळ्यांना अटक करत फसवून लुटलेले दोन कोटी रुपये मिळवून दिले. शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची एक वर्षाची पगारवाढ रोखण्याची कारवाई केली. पोलिस ठाण्यात महिला व शेतकऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे. प्रशासन लोकाभिमुख झाल्यासच त्याचा लाभ होईल. आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, परिवहन अधिकारी व फौजदार अशा विविध पदांवर तरुणांना संधी मिळाली. शेतकरी आत्महत्या करतो. मात्र त्याच्यापेक्षा अधिक राबणारी महिला कधीही आत्महत्या करीत नाही. उलट पतीने आत्महत्या केल्यानंतर हताश न होता मुलांना अधिकारी बनविणाऱ्या अनेक महिला आहेत.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले
संकटांचा न डगमगता मुकाबला करा. आत्महत्येचा दुबळा विचार मनात आणू नका. कचवे कसमादेचे भूषण आहेत. त्यांचा शेतीचा अभ्यास अलौकिक आहे. कचवे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. शेतमाल विक्री, मुलांची नोकरी, विवाहातील उधळपट्टी यातून शेतकऱ्यांची फसवणूक थांबली पाहिजे. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पोलिस यंत्रणेने लक्ष घालावे. कायद्यामुळे नव्हे, तर कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाल्यासच शेतकरी सुखी होईल. या वेळी श्री. देवरे, खेमराज कोर यांची भाषणे झाली.
मेळाव्यास पोलिस उपअधीक्षक लता दोंदे, प्रदीप जाधव, कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, किशोर इंगळे, गुलाबराव पाटील, पृथ्वीराज शिंदे, विजय दशपुते, चंदूबापू बच्छाव, संजय निकम, पोलिसपाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बच्छाव, आप्पासाहेब देशमुख, रामा पवार, कैलास कचवे आदींसह कसमादे व उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी उपस्थित होते. केवळ हिरे यांनी प्रास्ताविक केले. देवीदास कचवे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.