नाशिक : राज्यात विविध पिकांखालील एकूण क्षेत्र एक कोटी 40 लाख 11 हजार हेक्टर असून, बियाणे बदलानुसार 16 लाख 15 हजार क्विंटल बियाण्यांची खरिपासाठी आवश्यकता आहे. प्रत्यक्षात 17 लाख 27 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. कृषी विभागातर्फे लॉकडाउनमध्ये खरिपाची कामे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. 6) मंत्रालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सांगितले.
शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेच्या लाभासाठी प्रयत्न
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या धर्तीवर फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. त्याअंतर्गत द्राक्षे, केळी, आंबा, डाळिंब, काजू, संत्री, मोसंबी, पेरू, लिंबू, चिकू या फळपिकांचा समावेश आहे. बैठकीत विमा संरक्षित रक्कम, विमादर, हवामान आदी विषयांवर चर्चा झाली. खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगाने मंत्रालयात कृषी विभागाची बैठक झाली असून, खरिपाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सादर केला जाईल. बैठकीत आराखड्याला मान्यता घेतली जाईल. हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे, असे श्री. भुसे यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात झालेल्या हवामान आधारित फळपीक विमा योजना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पुण्याहून विश्वजित कदम आणि नगरहून प्राजक्त तनपुरे या मंत्र्यांसह मुख्य सचिव अजोय मेहता, कृषी सचिव एकनाथ डवले, अर्थ विभागाचे प्रतिनिधी आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते.
दरम्यान, खरिपासाठी उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांमध्ये महाबीजतर्फे पाच लाख आठ हजार, राष्ट्रीय बीज निगमतर्फे 31 हजार, खासगी कंपन्यांकडून 11 लाख 86 हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश असेल.
पीकनिहाय बियाण्यांची उपलब्धता क्विंटलमध्ये :
ज्वारी- 34 हजार 935, बाजरी- 18 हजार 593,
भात- दोन लाख 22 हजार 685, मका- एक लाख 29 हजार 160,
तूर- 55 हजार 534, मूग- 11 हजार 221,
उडीद- 16 हजार 982, भूईमूग- 12 हजार 500,
तीळ व इतर तेलबिया- 480, कापूस- एक लाख 205.
सोयाबीन- 11 लाख 24 हजार 885,
दोन लाख टन खते उपलब्ध
राज्यातील 2019 च्या खरिपासाठी 33 लाख 27 हजार टन रासायनिक खतांचा वापर झाला होता. यंदाच्या खरिपासाठी 43 लाख टनाची मागणी करण्यात आली आहे. 40 लाख 50 हजार टन खताचे नियोजन आहे. खतनिहाय मंजूर नियोजन टनामध्ये असे ः युरिआ- 15 लाख 50 हजार, डीएपी- चार लाख 50 हजार, एमओपी- तीन लाख, संयुक्त खते- 11 लाख 50 हजार, एसएसपी- सहा लाख. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी मंजूर असलेल्या नियोजनापैकी गेल्या महिन्याखेरपर्यंत पाच लाख 40 हजार टनाचे आवंटन मंजूर आहे. त्यापैकी दोन लाख सात हजार टन खत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.