मालेगाव (नाशिक) : शहरातील महत्त्वाकांक्षी ८८ कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे, तसेच सुमारे २२ कोटी खर्चाच्या जुना आग्रा रस्त्यावरील नवीन बसस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. महापालिकेच्या मोठ्या व शहरहिताच्या प्रकल्पांना होणारी दिरंगाई चर्चेचा विषय आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने निविदेत निर्धारित केलेल्या मुदतीत एकही मोठा प्रकल्प आजवर मार्गी लागलेला नाही. या दिरंगाईमुळे काही बीओटीचे व्यापारी संकुल व महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणारे प्रकल्प कागदी भेंडोळ्यात अडकून पडले. कॅम्प सोमवार बाजार भागातील नाट्यगृहाचा प्रस्तावही असाच थंड बासनात पडला आहे.
कामाची मुदत सप्टेंबर २०१९ मध्येच संपली...
शहर विकासाचे प्रकल्प हाती घेताना प्रशासनाने कामासाठी चोख नियोजन करावे, अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कामाचा आढावा घ्यावा. दहा लाखाच्या उंबरठ्यावरील लोकसंख्या व महानगर असलेल्या शहरात तब्बल दोन दशकाच्या मागणीनंतर पहिला सिग्नल साकारला. पहिल्या वहिल्या उड्डाणपुलासाठीही मोठा कालावधी लागत असून, यात राजकीय वादविवादांची ठिणगी पडली. उड्डाणपूल कामाची मुदत सप्टेंबर २०१९ मध्येच संपली. महासभेत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकत ३० पेक्षा अधिक कारणे दाखवा नोटीस बजावल्या. वेळोवेळी बैठका झाल्या. अद्यापही उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. पुलाचे ६० टक्के काम झाले असून, कोरोना संसर्ग काळात मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत, ओझर येथील उड्डाणपुलांची कामे जोमाने झाली असताना येथील काम रखडले. शहरवासीयांना या पुलासाठी आणखी किमान वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल. यातच पुलामुळे हजारखोली भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन याच भागात अंडरपास करण्याचा प्रस्ताव महासभेत नव्याने मंजूर झाला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षाचे नगरसेवक पुलाची लांबी वाढविण्याची मागणी करीत आहेत.
प्रदुषण रोखण्यात होणार मदत
भुयारी गटार शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणे अत्यावश्यक आहे. या कामाला २४ महिन्यांची मुदत आहे. जानेवारी २०१९ पासून सुरू झालेले हे काम अवघे २० टक्के झाले आहे. ८८ कोटींच्या भुयार गटार योजनेत दोन एसटीपी प्रकल्प व नदीकिनारी ट्रंक सिव्हर (भुयारी गटार) करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील गटारींचे नदीपात्रात जाणाऱ्या सांडपाण्याचा अटकाव होऊन गिरणा धरणातील दूषित पाण्याचे प्रमाण कमी होण्यास, तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे पाच महिने वाया गेल्याचे ठेकेदाराचे मत आहे. आगामी काळात या कामाचा सातत्याने आढावा घेऊन हे काम त्वरेने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न
कृषिमंत्री दादा भुसे शहरातील विकासकामांचा वेळोवेळी आढावा घेतात. काम वेळेत करवून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मनुष्यबळ कमतरतेवर प्रशासनाने तोडगा काढावा.
-नीलेश आहेर,
उपमहापौर, मालेगाव महापालिका
प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. महासभेतील ठरावांची अंमलबजावणीही वेळेत होत नाही. याबाबत वेळोवेळी आवाज उठविला. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास प्रकल्प वेळेत मार्गी लागतील.
-सखाराम घोडके,
ज्येष्ठ नगरसेवक, मालेगाव महापालिका
महासभेतील झालेल्या ठरावांची अंमलबजावणी व्हावी. कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने आवाज उठवितो. काही किरकोळ कामेही मार्गी लागत नाहीत.
-सुनील गायकवाड,
भाजप गटनेते, मालेगाव महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.