groun report
groun report SYSTEM
नाशिक

ग्राउंड रिपोर्ट : जिल्हाबंदीचे वाजलेत तीन तेरा; पाहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेवेळी जिल्हाबंदी करत तपासणीची खबरदारी घेतली गेली. स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे त्याही व्यवस्थेने मान टाकली होती. आताच्या दुसऱ्या लाटेत जिल्हाबंदी अन् ई-पासचे नेमके काय चाललंय आहे, याची ‘सकाळ’च्या बातमीदारांनी ‘ग्राउंड रिॲलिटी’ तपासली. त्यामध्ये जिल्हाबंदीचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर)पासून जवळ असलेल्या करे घाटात नगर-पुण्याहून येणाऱ्या वाहनांची तपासणी ‘रामभरोसे’ असल्याचे आढळले. हे कमी काय म्हणून मुंबईच्या प्रवेशद्वारावर घाटनदेवी परिसरात तपासणीसाठी पोलिस बंदोबस्ताचा तळ असला, तरीही आरोग्य तपासणीची बोंब असल्याचे नजरेतून सुटू शकले नाही. जिल्हाभरातील विविध मार्गांवरील ‘ग्राउंड रिपोर्ट' आजपासून…

रिपोर्ट - प्रकाश शेळके

नांदूरशिंगोटे (जि. नाशिक) : वेळ… रविवार, दुपारी तीनची… नाशिक-पुणे महामार्गावरील करे घाटातील लोखंडी जाळ्यांचा अडथळा पार करून नाशिककडून जाणारी आणि नाशिककडे जाणारी वाहने बिनदक्कत धावत होती. हे असं कसं, असा प्रश्‍न स्वाभाविकपणे तयार झाला आणि मग तंबूमध्ये डोकावून पाहिलं, तर एक पोलिस कर्मचारी बसलेले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर दोन जण ‘ड्यूटी’वर आहोत, आता पावसाळी वातावरण असल्याने बसलो आहोत, असे त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्या वेळी मात्र गेल्या वर्षीच्या तपासणीची आठवण झाली. गेल्या वर्षी येथे कडक तपासणी होत असल्याने बहुतांश वाहनचालक तळेगावमार्गे निमोण अशी निघून जात होती. येथे तंबू आणि पोलिस उपस्थित असले, तरीही एकतर वाहन तपासणी केली जात नव्हती. दुसरे म्हणजे, सीमेवर कोरोना चाचणीचा मागमूस पाहायला मिळाला नाही. म्हणजेच काय, तर सरकार जिल्हाबंदी, तपासणीचे धोरण जाहीर करते, परंतु जिल्हास्तरावरून त्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे पद्धतशीर काम केले जात असल्याचे विदारक चित्र नाशिक-पुणे महामार्गावर पाहायला मिळाले.

Nashik

ना आरोग्य कर्मचारी-ना तपासणी

रिपोर्ट - पोपट गवांदे

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घाटनदेवी मंदिराजवळील तपासणी नाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतो. ई-पासधारकांना नाशिककडे आणि मुंबईकडे प्रवेश दिला जातो. इथून दिवसाला सर्वसाधारपणे पाचशेच्या आसपास चारचाकी ई-पास घेऊन प्रवास करतात. त्याच वेळी दोनशे चारचाकी वाहनचालकांना ई-पास नसल्याने परतावे लागते. हे जरी एकीकडे असले, तरीही कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून तपासणी करणारे आरोग्य कर्मचारी इथे आढळत नाहीत. त्यामुळे शारीरिक तपासणी करण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही.

जीवनावश्‍यक वस्तूंच्या गाड्या, सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना अडथळा न येऊ देता सोडण्यात येते. इथे दोन ‘शिफ्ट’मध्ये १२ पोलिस, दोन अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान आणि शिक्षक तैनात आहेत. लोखंडी बॅरिकेडिंगद्वारे वाहनांसाठी अडथळे उभारण्यात आले आहेत. बिनतारी संदेशयंत्रणा, एलईडी प्रूफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र आरोग्य तपासणीची व्यवस्था नसल्याने कोरोना संसर्गात सीमावर्ती भागात संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाबंदीचा आदेश असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे पोलिस निरीक्षक समाधान नागरे सतत सांगत असतात.

Nashik

अधूनमधून तपासणी, इतर वेळेला बिनधास्तपणे वाहने सुसाट!

रिपोर्ट - संतोष विंचू

पिंपळगाव जलाल टोलनाका (येवला) : नगर-मनमाड महामार्गावर पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर नाशिक व नगर जिल्ह्याची सीमा. येथे पोलिस तैनात असतात. मात्र, अधूनमधून मूडनुसार वाहनांची तपासणी व विचारपूस होते. इतर वेळेला हजारो वाहने बिनधास्तपणे सुसाट प्रवास करत असल्याची स्थिती आहे. गुजरात, मध्य प्रदेशसह खानदेश, मालेगाव, मनमाडमार्गे येऊन थेट नगर, पुण्यापर्यंत जाणारा हा महामार्ग. त्यामुळे येथून मालवाहतूक करणारे ट्रक व कंटेनरचा, तसेच प्रवाशांची वाहतूकही या रस्त्यावरून होत असते. टोलनाका हद्द संपत असल्याने त्याच्या पुढे येवला पोलिसांचा तपासणी नाका आहे. येथे तंबू ठोकला असून, पोलिस व शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. येथे येवल्याकडून जाताना एकाही वाहनाला विचारपूस होत नाही. मात्र, कोपरगावकडून येणाऱ्या खासगी वाहनांना थांबविले जाते. विविध प्रश्‍न विचारल्यावर गाडीतून दवाखान्याची कागदपत्रे, अत्यावश्यक सेवेची माहिती अथवा सयुक्तिक कारण सांगितले जाते आणि गाडी सोडून दिली जाते. क्वचितप्रसंगी दोनशे रुपयांचा दंड केला जातो. मात्र, पूर्वीप्रमाणे जिल्हाबंदी आता आढळत नाही. विशेष म्हणजे पिंपळगाव जलाल, नाटेगाव, बदापूर, आडगाव चोथवा भागातील शेतकरी शेतमाल विक्रीला कोपरगावकडे जाण्याचे प्रमाण अधिक आहे. कोपरगावकडून येवल्यात शेतमाल विक्री, व्यवसाय व दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या अधिक दिसते. अनेकदा सयुक्तिक कारणे व दवाखान्याची कारणे प्रवाशांकडून सांगितली जात असल्याने नाइलाजाने वाहने सोडावी लागत असल्याचे एका पोलिसाने सांगितले. मागील लॉकडाउनमध्ये या मार्गावर कोपरगावचे वाहतूक पोलिस थांबून वाहनांना अडवत असायचे. आता मात्र फक्त येवल्याचे पोलिस दिसत असून, नियमांपेक्षा सहानुभूती अधिक असल्याचे चित्र टोलनाक्यावर रोज दिसत आहे.

Nashik

तेव्हा बहिष्कार… आता दुर्लक्ष!

पहिल्या लॉकडाउनमध्ये येवल्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण होते. कोपरगावची संख्या शून्यावर होती. त्यामुळे कोपरगावकरांनी येवल्यावर जणू बहिष्कार टाकल्याची स्थिती होती. येवल्याची व्यक्ती चुकूनही दोन्ही तालुक्यांची सीमा पार करून कोपरगावकडे जाऊ शकत नव्हता. किंबहुना कोणी चुकून तिकडे गेले, तर तेथील पोलिस निरीक्षक व तहसीलदारांकडून गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे सोशल मीडियातून कोपरगावकरांच्या या वागण्यावर येवलेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता येवला व कोपरगावमध्येही रुग्ण असल्याने अधिकारी इतके मनावर घेत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जाण्या-येण्यावरील निर्बंध नाममात्र आहेत..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT