नांदगाव (जि. नाशिक) : नांदगाव स्टेशनवर बुधवारी (ता. २०) पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रवासी गाडीतून उतरलेल्या माथेफिरूने पाच इंची चाकूने रेल्वे पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला (Attack) चढवून जखमी केल्याने खळबळ उडाली.
हल्ल्यानंतर उपनिरीक्षक डी. के. तिवारी काही काळ बेशुद्ध झाले. माथेफिरूचे नाव सुकेश लीलाधर तिरडे (वय २५) आहे. तो गोंदियाचा असून, घटनेनंतर त्याने तोच चाकू मारून स्वत:ला जखमी केले. पोलिसांनी त्याला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर पोलिस उपनिरीक्षक तिवारी यांना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. (Madman knife attack on railway sub inspector Incident at Nandgaon Station Nashik Latest Crime News)
बुधवारी पहाटे एक व्यक्ती फलाटावर फिरत असल्याचे पाहून रेल्वे पोलिस खान यांनी त्याला पोलिस कक्षात आणून बसविले आणि ते तोंड धुण्यासाठी बाहेरच्या नळाकडे गेले. दरम्यान, पोलिस कक्षाच्या दरवाजाजवळ ही व्यक्ती दबा धरून उभी राहिली.
त्याच वेळी पोलिस उपनिरीक्षक डी. के. तिवारी यांनी आत प्रवेश केला. बेसावध असलेल्या तिवारींच्या पोटात त्या व्यक्तीने सपकन चाकू खुपसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तिवारींनी कशीबशी आपली सुटका करून घेत ते बाहेर धावले.
दरम्यान, या माथेफिरूने त्याच चाकूने स्वत:च्या पोटावर व मानेला जखमा करून घेतल्या. माझ्या जिवाला धोका आहे, असे म्हणत चांगलीच दहशत निर्माण केली. तेथून पळ काढत फलाटावर उभ्या असलेल्या कोळशाच्या बोगीवर चढला.
हातातील चाकू दाखवून ‘तुम्हाला मारीन, नाही तर माझ्या पोटात खुपसून घेईन’ अशा धमक्या देत त्याने कोळशाच्या ढिगावर उभा राहून बराच धिंगाणा घातला. त्याला काबूत कसे आणायचे, असा प्रश्न पडला असताना चेतन इघे या युवकाने मित्रांच्या मदतीने त्याला दगड मारण्याची धमकी देत कसाबसा खाली उतरविण्यात यश मिळविले.
नंतरही तो कोणाला जवळ येऊ द्यायला तयार नव्हता. अखेर वाल्मीक पवार, चेतन इघे, विशाल निकम यांनी त्याच्या हातातला चाकू इतर पोलिसांच्या मदतीने हिसकावून घेतला.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राख, उपनिरीक्षक शब्बीर शेख, जावेद शेख, कैलास आहेर तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.