नाशिक : जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये संशयित टोळक्याने दोघा विक्रेत्यांकडे पैशांची मागणी केली असता, ते न दिल्याने दोघांना जबर मारहाण करीत लोखंडी वस्तूने मारून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयित टोळक्याविरोधात गुन्हे दाखल असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. जेलरोडच्या पाण्याच्या टाकीजवळ भाजी बाजार भरतो. (Gang brutally beat up two vendors in Jail Road vegetable market for demanding money for liquor )
पहिल्या घटनेतील गणेश डोगरे, कार्तिक गोरे, दादू जाधव (सर्व रा श्रमिकनगर, कॅनलरोड, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. विकास बाळासाहेब गायकवाड (रा. आंबेडकरनगर, कॅनल रोड, जेलरोड) याच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता.२) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विकास हा भाजी पाला विक्री करीत होता. त्यावेळी संशयित तिघे हे त्याच्याकडे आले आणि त्यांनी दारु पिण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली. विकास याने पैसे देण्यास नकार दिला असता, त्याचा राग मनात धरून संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
विकास त्यांना समजावून सांगत असतानाही संशयित दादू जाधव याने त्याच्या हातातील लोखंडी वस्तूने विकास याच्या डोक्याला मारले. यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, याचठिकाणी दुसर्या घटनेतही संशयित टोळक्याला ५०० रुपये न दिल्याने त्यांनी मासेविक्रेत्याला बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार घडला. मनोज धोत्रे, अविनाश धोत्रे, गणेश डोगरे, कार्तिक गोरे, संदीप धोत्रे (सर्व रा. श्रमिकनगर, कॅनलरोड) असे संशयितांची नावे आहेत.
संदीप इंद्रजित जाधव (रा. साईनगर, कॅनल रोड, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयित टोळके हे संदीपच्या दुकानावर आले आणि त्यांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. संदीपने नकार देताच टोळक्याने त्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी मनोज धोत्रे याने त्याच्याकडील लोखंडी वस्तूने डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हे दाखल असून, उपनिरीक्षक पंडित आहिरे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.