Potholes on the newly constructed Wavi-Shah road. esakal
नाशिक

Gram Sadak Yojana : मुख्यमंत्री ग्रामसडकच्या 6 कोटींच्या रस्त्यावर खड्डे! वावी-शहा रस्त्यावर पिंपरवाडी शिवारातील प्रकार

Nashik News : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नवीन काम झालेल्या रस्त्यावर पिंपरवाडी शिवारात खड्डे पडल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अजित देसाई

सिन्नर : गेल्या वीस वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या वावी-शहा रस्त्याला दीर्घ कालावधीनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सहा कोटी रुपयांचा निधी मिळाला. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नवीन काम झालेल्या या रस्त्यावर पिंपरवाडी शिवारात खड्डे पडल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Potholes on 6 crore road of Mukhyamantri Gram Sadak)

ज्या ठिकाणी खड्डे पडले ती जागा खारवट मातीची असल्याने तेथे तळापासून भराव टाकून रस्त्याचे काम नव्याने करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या वावी-शहा रस्त्याच्या कामात ठेकेदार व संबंधित यंत्रणेकडून झालेल्या दुर्लक्षाची पोलखोल स्थानिकांनी केली. गेल्या आठवड्यात या रस्त्याला पिंपरवाडी शिवारात खड्डे पडले.

हातांनी डांबरीकरणाचे अस्तर स्थानिकांनी काढून दाखवल्याने कामाची एकूणच गुणवत्ता निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता व ठेकेदाराने खड्डे पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असल्याने रस्त्याला खड्डे पडल्याचे अभियंत्यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या भागात साईडपट्टीला मुरमाचा भरावा अधिक असल्याने पावसाचे पाणी जाऊन काही प्रमाणात डांबरीकरण उखडल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. रस्त्याच्या कामाची पाच वर्ष देखभाल ठेकेदाराला करावयाची असल्याने खड्डे पडलेल्या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल, असे देखील सांगण्यात आले. स्थानिकांनी मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी रस्ता फुटल्याचे म्हटले आहे. (latest marathi news)

पिंपरवाडी शिवारात शेलार वस्तीपासून जाम नदीपर्यंत जमिनीचा पोत खारवट आहे. त्या ठिकाणी रस्त्याचे काम करताना खालचा भाग पूर्णपणे उकरून घ्यायला हवा होता. तेथे नव्याने पक्का भराव टाकून रस्त्याचे काम करण्याची गरज होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याला खड्डे पडल्याचा आरोप करण्यात आला.

"खराब झालेल्या रस्त्याचा भाग नव्याने बनवण्याची सूचना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना केली आहे. वावी-शहा रस्त्याची गेल्या वीस वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी भरीव निधी दिला आहे. त्या निधीतून होणाऱ्या कामाच्या गुणवत्तेशी कदापि तडजोड करणार नाही. ठेकेदाराला खराब झालेला पॅच नव्याने बनवावा लागेल. पुन्हा असे प्रकार घडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल." - माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

"शहा ग्रामस्थांचा वावीशी तुटलेला संपर्क आमदार कोकाटे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामाला भरीव निधी मिळाल्याने पुन्हा जोडला जाणार आहे. हा रस्ता आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. कामाच्या गुणवत्तेत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे." - काकासाहेब नाजगड, शहा

"मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होणारी रस्त्यांची कामे गुणवत्तेशी तडजोड न करता करावी लागतात. मात्र, वावी-शहा रस्त्यावर विशिष्ट ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जमिनीच्या स्तराची तपासणी करून पुन्हा भक्कमपणे काम करावे. वावी ते कोळपेवाडी दरम्यान दळणवळणाचा हा महत्वाचा रस्ता खड्ड्यांमुळे पुन्हा बंद व्हायला नको." - संतोष जोशी, काँग्रेस उपाध्यक्ष, सिन्नर

"वावी ते शहा रस्त्याच्या कामाला पिंपरवाडी शिवारात दोनशे मीटरच्या परिसरात तीन ते चार ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी मुरुमाच्या साईड पट्टीतून कार्पेटमध्ये शिरल्याने डांबरीकरण उखडण्याचा प्रकार घडला. तो दुरुस्त केला जाईल. पाच वर्ष रस्त्याची संपूर्ण देखभाल मुख्यमंत्री ग्राम सडक विभागाकडून केली जाणार आहे. या रस्त्यावर ५० टनापेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. ही क्षमता रस्ता सहन करणार नाही. आम्ही रस्त्याची तपासणी करत असताना वाळूने भरलेली दोन वाहने आली. या वाहनांवर नियंत्रण न आणल्यास रस्ता खराब व्हायला वेळ लागणार नाही." - किरण सानप, उप अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT