नाशिक/मुखेड : भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर माजी सैनिकांना प्रत्येक क्षेत्रात शासनाकडून ठराविक कोटा ठरवून पुन्हा करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली असल्याने या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यास बहुतेक माजी सैनिक प्राधान्य देतात. मात्र जळगाव नेऊर ता.येवला येथील माजी सैनिक योगेश कोंडाजी शिंदे यांनी देशसेवेनंतर आपली शेती आपला अभिमान डोळ्यासमोर ठेवत शेतीची अर्थात धरणी मातेच्या सेवेचे ब्रीद अंगिकारून सेंद्रिय शेतीची कास धरली.शेतकरी पुत्रांसाठी ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे.
माजी सैनिक निस्वार्थ देशसेवा करून उत्कृष्टपणे शेती करू शकतो याचा उत्तम नमुना श्री.शिंदे यांनी बहरात आणलेली निर्यातक्षम फळबाग शेती बघून होतो.डाळिंब व पपई फळबाग शेती बहरात आणून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले.योगेश शिंदे 128 एअर डिफेन्स रेजिमेंट मध्ये 17 वर्ष सेवा करून नायक या पदावर सेवानिवृत्त झाल्यानंतर 2016 मध्ये आपल्या गावी परतले. देशसेवा समर्पित झाल्यानंतर नोकरीचा विचार न करता प्रथम पाण्याचे योग्य नियोजन करून सेंद्रिय शेती विकसित करण्याचा निर्णय घेतला.
योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा
त्यानुसार तीन एकर क्षेत्रात शेंद्रीय वाण डाळींब लागवड केली. आंतरपीक म्हणून दिड एकर क्षेत्रात तैवान पपई वाण लागवड केली.त्यात रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून फळबाग शेती बरोबर कोबी,मका व कांदा आदी पिकाचेही उत्तम प्रकारे नियोजन करत पिके बहरात आणली. पिकांना योग्य भाव मिळाला तर लाखो रूपयाच्या उत्पन्नाचे स्त्रोत कुटुंबासाठी उपलब्ध करून दिले. शेतीवर आलेल्या नैसर्गिक संकटांना शेतकरी काहीच करू शकत नाही.शेतमालाचा भावही शेतकरी स्वतः ठरवू शकत नाही.मात्र शासनाने प्रत्येक पिकाच्या खर्चाच्या तुलनेत योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा माजी सैनिक श्री.शिंदे यांनी व्यक्त केली.वडील कोंडाजी शिंदे,आई लक्ष्मीबाई शिंदे,बंधू संतोष शिंदे,जयश्री शिंदे आदी कुटुंबातील सदस्य सेंद्रिय फळबाग शेती संवर्धनास नेहमीच तयार असतात.
शेतकरी पुत्रांसाठी प्रेरणा
नोकरीची संधी उपलब्ध असतानाही माजी सैनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती फुलवत आहे.ही अभिमानाची गोष्ट आहे.शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकरी पुत्रांना माजी सैनिकाकडून नक्कीच प्रेरणा मिळेल.
देशसेवेनंतर धरणीमातेची सेवा करण्याचा निश्चय ठाम असल्याने कोणत्याही नोकरीचा प्रयत्न केला नाही.रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेतीतून फळबाग संवर्धन करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे.शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता प्रयोगशील,नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अत्याधुनिक शेती करावी. - योगेश शिंदे,सेवानिवृत्त सैनिक,जळगाव नेऊर.
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.