farm.jpg
farm.jpg 
नाशिक

'काळ्या आईच्या कुशीत रमली शहरी सूनबाई!'...खानदेशच्या पाखरांची अजब दुनियादारी

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) कोरोनामुळे खानदेशातील ओस पडलेली खेडी हाउसफुल झाली आहेत. जुजबी नोकरी व मिळणारा कामधंदा कोरोनाने हिरावून घेतल्याने हजारो कुटुंबीय गावीच काळ्या आईच्या कुशीत रमू लागली आहेत. नवऱ्याची नोकरी गेल्याने शहरी सूनबाईला आता शेतात कामाला जावे लागत आहे. यामुळे शेताला खरे मालकही मिळाले आहेत. मोठी शहरे पूर्वपदावर येण्यास दिवाळी उजाडण्याची शक्‍यता असल्याने यातील अनेकांचा आता शहरी भागाला राम राम करून गावातच राहण्याचा विचार आहे. 

शहराला राम राम 

नैसर्गिक आपत्ती व दुष्काळ उत्तर महाराष्ट्राला नेहमीच चिकटून राहिला आहे. त्यामुळे खानदेशमधील हजारो कुटुंबीय नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, सुरत, बडोदा, अहमदाबाद आदी शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. दहा-पंधरा हजारांची नोकरी व भाड्याच्या घरात राहून त्यांचा उदरनिर्वाह असायचा. काहींनी ठेले, हातगाड्यांवर किरकोळ व्यवसाय करून पोट भरले. खासगी कंपन्यांच्या नोकऱ्या गेल्याने घरभाडे भरणेही अवघड झाल्याने अनेकांनी गावाचा रस्ता धरला. विस्कटलेली घडी पुन्हा बसते की नाही, याची शाश्‍वती नसल्याने शहरी झालेला हा मजूरराजा पुन्हा गावकुशीत विसावताना दिसत आहे. 

शेताला मिळाला मालक 

सुरवातीला कोरोनाचा विषय महिना-पंधरा दिवसांत मिटेल, असे वाटत असल्याने ही कुटुंबे शहरातच थांबली. कोरोना लांबल्याने व हातचे काम गेल्याने कष्टकऱ्यांनी आपल्या गावाला पसंती दिली. शहरात राहायचे व गावातील शेती कोणाला तरी भाडे स्वरूपात कसायला द्यायची, असे करणाऱ्यांनी आता शेतीतच घाम गाळायचे ठरविले आहे. त्यामुळे शेताला खरा मालकही मिळाला आहे. ज्यांच्याकडे गावी शेती नाही, अशा जोडप्यांनी मिळेल त्या मजुरीला प्राधान्य दिले आहे. अनेक महिला तर प्रथमच रानावनात कामाला जात आहेत. गाव-वाड्या-वस्त्यांना नावे ठेवणाऱ्या भल्याभल्यांना कोरोनाने जमिनीवर आणले आहे. 

गड्या आपला गावच बरा
 
कोरोनामुळे गावाकडच्या कष्टकऱ्यांचे हाल झाले. आर्थिक चणचण झाली. रोजगाराची शाश्‍वती राहिली नाही. मोठ्या शहरांमधील कोरोना संकट वाढतच आहे. लाखो मजुरांची पोट भरणारी ही शहरे पूर्वपदावर येण्यास मोठा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे गावी आलेली बहुतांशी कुटुंबे पुन्हा शहरात परतणे अवघड दिसते. "गड्या आपला गावच बरा' अशी मानसिकता अनेकांची झाली आहे. 

-शहरात परत जायचे की ग्रामीण भागातच राहायचे अशा द्विधा मनःस्थितीत काही कुटुंबे. 
-शहरातून परतलेला पोटार्थी परिवार मिळेल त्या रोजगारासाठी सरसावला. 
-जुजबी नोकरी गमावलेल्यांचा गावाकडेच कल. 
-उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सुरत, अहमदाबाद, बडोदा, बारडोली या भागातील औद्योगिक वसाहतीत हजारोंना रोजगार. 
-हिरे घासणे व कपडा व्यवसायात पुरुष मंडळी, तर कपडा व्यवसायात विक्री, रंगकाम, विणकाम, सजावट या कामात महिलांना रोजगार. 
-हातगाडीवर किरकोळ व्यवसाय करणारेही परतले गावी.  

कोरोनाच्या भीतीमुळे मोठ्या शहरांमधील घरेलू कामगारांचा रोजगार गेला. गावी आलेले हजारो कामगार रोजगार शोधत आहेत. अनेक महिला बचतगटांकडे कामाची विचारणा करीत आहेत. शहरी महिला शेतीतील कामात कितपत यशस्वी होतील हा प्रश्‍न आहे. त्यापेक्षा ग्रामीण भागात बचतगटांना बळकटी देऊन त्यांना रोजगार दिला पाहिजे. - सुनीता कुलकर्णी अध्यक्षा, आयटक संघटना, मालेगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT