Market Committee nashik
Market Committee nashik esakal
नाशिक

Market Committee Election : बाजार समितीच्या मैदानात लोकसभा, विधानसभेची पेरणी; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांची सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात पोचलेली असताना अस्तित्व व प्रतिष्ठेसाठी मतदारांची पळवापळवी सुरू झाली आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा ज्वर चढला असून, या आरोप-प्रत्यारोपांनी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. (Preparations for Assembly and Lok Sabha elections are going on through election campaign of market committee nashik news)

बहुतेक नेत्यांनी उमेदवारी देताना आपल्या गटाचा फायदा व विरोधकांचे कसे खच्चीकरण होईल, काहींनी बेरजेचे, तर काहींनी मागील उट्टे काढण्याच्या दृष्टीने कुरघोडीचे राजकारण केले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तर एकमेकांविरोधात आरोपांची राळ उठविली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीआडून विधानसभा, लोकसभा निवडणुकीची तयारी नेत्यांकडून सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे रखडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मातब्बर नेत्यांची ‘एन्ट्री’ झाली आहे. इतकेच नाही तर लोकसभा व विधानसभेच्या आगामी निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही काही इच्छुक रिंगणात उतरले आहेत.

या निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक मोर्चेबांधणी करत आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच प्रत्येक तालुक्यातील स्थानिक राजकारण्यांनी आपले राजकीय गणिते मांडली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचाराचा अंतिम टप्पा असून, गुरुवारी (ता. २७) प्रचाराचा तोफा थंडावणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यामुळे दोन दिवसांपासून प्रत्येक तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. बाजार समितीच्या निवडणूक प्रचारातून थेट विधानसभा निवडणुकीचे आव्हान दिले जात आहे. कधी नव्हे ते तत्कालीन पालकमंत्री तथा हेवीवेट नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे जिल्ह्यातील बाजार समितीच्या आखाड्यात उतरले आहेत. यात भुजबळ यांनी येवला बाजार समितीत लक्ष केंद्रित केले असून, प्रचारसभा घेत आहेत.

यात भुजबळ यांनी थेट आमदार किशोर दराडे आणि नरेंद्र दराडे यांना माझ्या समोर उभे राहाच, असे खुले आव्हान दिले. नांदगाव व मनमाड बाजार समितीत आमदार सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर सुरू आहे. आमदार कांदे यांच्या विरोधात माजी खासदार समीर भुजबळ व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्यासह माजी आमदारांनी कंबर कसली आहे.

यंदा माजी आमदार अनिल कदम यांनी युवा नेते गोकुळ गिते यांच्या सोबतीने पिंपळगाव बसवंत बाजार समितीत जातीने लक्ष घातल्याने ही निवडणूक जिल्हाभर चर्चेची ठरली आहे. येथे आमदार दिलीप बनकर व कदम यांच्यात टक्कर होत असली तरी विधानसभा निवडणूक आखाड्याप्रमाणे एकमेकांवर आरोप होत आहे.

मालेगाव बाजार समितीच्या प्रचारात विद्यमान पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गटाचे अद्वय हिरे अगदी टोकाला जाऊन आरोप करीत आहेत. नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. लासलगाव बाजार समितीत माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षीरसागर विरुद्ध पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप यांच्यात हा सामना रंगला आहे. मात्र खरी लढाई भुजबळ विरुद्ध थोरे, अशीच रंगलेली दिसत आहे. दिंडोरी बाजार समितीच्या निमित्ताने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे फोटो दोन्ही पॅनलच्या पोस्टरवर झळकत असल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे. सिन्नरमध्ये विद्यमान आमदार अॅड. माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्यात अगदी घासून लढत रंगली आहे.

कळवणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार व माजी आमदार जे. पी. गावित या दोघांच्या पॅनलमध्येच चुरशीची लढत होत आहे. चांदवडमध्ये माजी आमदार अॅड. शिरीषकुमार कोतवाल व त्यांचे शिष्य म्हणून ओळख असलेले भाजप नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या पॅनलमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. देवळ्यात भाजपचे जिल्हाप्रमुख केदा आहेर यांच्यासमोर विरोधकांचे आव्हान कितपत टिकते, हे बघावे लागेल. या निवडणुकीनिमित्ताने लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच मतदारांना बघायला मिळत आहे.

मतदारांची पळवापळवी

स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबल्याने, तसेच या निवडणुका कधी होणार याची शाश्वती नसल्याने बाजार समितीची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी या निवडणुकीत उतरले आहे.

या निवडणुकीनिमित्ताने मतदारांचा कौल मिळणार असल्याने नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी साम-दंड-भेद वापरले जात आहे. यात मतदारांची पळवापळवीदेखील झाली आहे. अनेक तालुक्यांमधील मतदारांना सहलीस रवाना करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मतदारांचा ‘भाव’ वधरला

या निवडणुकीसाठी सोसायटी व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदार आहेत. ठराविक मतदार असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जात असल्याने मतदारांचा भाव वधरला असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: 'ससून संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही'; कल्याणीनगर अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

Eknath Shinde : पावसाळ्यात अप्रिय घटना टाळण्यासाठी 'या' उपाययोजना, मुख्यमंत्र्यांची बैठक; कोस्टल रोडच्या गळतीची शिंदेंकडून पाहाणी

Alyad Palyad Trailer: ‘अल्याड पल्याड' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; चित्रपट कधी होणार रिलीज? जाणून घ्या...

Ambati Rayudu: प्लीज हे थांबवा! रायुडूला ऑन-एअर जोकर म्हटल्याबद्दल केवीन पीटरसनने दिलं स्पष्टीकरण

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद; कोणते शेअर्स झाले घायाळ?

SCROLL FOR NEXT