Farmers preparing soybeans in Kharip
Farmers preparing soybeans in Kharip esakal
नाशिक

Nashik : खरिपाने झोपवले; पण रब्बीची चांगली पायाभरणी!

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : पावसाअभावी खरिपाची वाट लागते की काय, अशी परिस्थिती असताना वेळेवर आलेल्या पावसाने खरीप हंगामाची पिके जोमात आली; पण सरतेशेवटी परतीच्या मुसळधारेने खरीप पिकांना झोपवून मोठे नुकसान केले. अर्थात, खरिपाची वाट लावणाऱ्या या पावसाने दुष्काळी तालुक्यात मात्र रब्बीची चांगली पायाभरणी केली. रब्बी हंगाम जोमदारपणे निघण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. किंबहूना दुष्काळी अवर्षण पूर्व भागात रब्बी पेरणीची तयारी सुरू आहे. (Rabi season will flourish due to abundant water Nashik news)

तालुक्याचा खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो, तर याच पावसावर रब्बीचे भवितव्य ठरते. उत्तर पूर्व भागातील ६० वर गावांना कुठल्याही कालव्याचा आधार नसल्याने जोरदार पाऊस झाला, तरच रब्बीची पिके निघतात. अन्यथा पालखेडच्या लाभक्षेत्रातील पश्चिम भागातच रब्बीची पिके घेतली जातात. या वर्षी मात्र दोन्हीही भागांत उपलब्ध पाण्यामुळे आनंदीआनंद आहे.

तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात अवर्षण पट्ट्यात जोरदार पाऊस पडला तरच अन् पश्चिम भागात पालखेड डाव्या कालव्याला तीन आवर्तने मिळाली तरच रब्बी पीक निघते. अन्यथा चारमाही खरिपावर समाधान मानावे लागते, असे चित्र एखादा वर्ष सोडले तर तालुक्यात असतेच. या वर्षी पावसाने शेवटीशेवटी जोरदार हजेरी लावून खरिपाची पिके सडविली. प्रथमच ऐन दिवाळीतही पाऊस सुरू असून, सध्या तालुक्यातील नदी, नाले, बंधारे, विहिरी भरल्या आहेत.

२०१७-१८ मध्ये तर पाणीच नसल्याने कृषी विभागाने पेरणीचा लक्षण शून्य टक्के ठेवला होता इतकी भयानक परिस्थिती होती. या वेळी मात्र समाधानकारक चित्र असून, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पालखेड डाव्या कालव्याला आतापर्यंत ओव्हरफ्लोचे पाणी सुरू होते. त्यामुळे पश्चिम भागात पाण्याची आबादी दिसली.

सर्वत्र सोडलेल्या पाण्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढली तर शेवटी मुसळधार पाऊसही झाल्याने आजही विहिरी तोंडापर्यत फुल आहेत. पालखेडलाही तीन आवर्तने मिळणार असल्याने लाभक्षेत्रातील पन्नासवर गावांना रब्बीचे पिके निघेपर्यंत टेन्शन नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्यासाठी शेततळेही भरून ठेवले आहे. पूर्व भागात विहिरीच्या भरवशावर गहू पेरणी सुरू असून ज्यांना पाण्याची शाश्वती नाही, त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे.

तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रात कांदे व गहू, तर खालोखाल हरभरा पिकाखाली क्षेत्र दिसणार आहे. शासकीय नोंदीत १२४ पैकी ५२ गावेच रब्बीची आहेत. तथापि, शंभरवर गावात रब्बीची पेरणी होते. पण पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ४२ गावांत हंगाम निघण्याची शश्वती असते. तालुक्याचे खरिपाचे क्षेत्र ५३ हजार हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र १३ हजार ४८६ हेक्टर आहे. त्यातही सर्वच शेतकरी आगाद पेरणी करतात, म्हणून जी काय होते, ती पेरणी मार्गी लागते. या वेळी रब्बीखाली २० हजारावर हेक़्टर क्षेत्र गुंतवले जाऊ शकेल.

● कांदा झाला लाडका

कांद्याचे भाव टिकून असल्याने कांदा पीक हक्काचे व लाडके झाले आहे. जिल्ह्यात खरीप लाल, रब्बीचा रांगडा व उन्हाळ कांद्याची मोठी लागवड होते. येवल्यासह निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा, देवळा तालुक्यांत लाल कांद्याची मोठी लागवड झाली असून, आता लेट खरीप कांद्याची लागवड सुरू आहे.

"अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला असून, मका पाण्यात तरंगत आहे, तर सोयाबीन सडण्याच्या मार्गावर आहे. या वर्षी जमिनीच्या पाण्याची पातळी चांगली आहे. शिवाय पालखेडची तीन आवर्तने मिळण्याची शक्यता असल्याने गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, उन्हाळी मका यांसारख्या पिकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत."-मच्छिंद्र गायकवाड, शेतकरी, अनकुटे

"खरिपाचे नुकसान झाले; पण पावसाने तालुक्‍यात रब्बीचा आशावाद जागविला आहे. गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ होईल. रांगडे व उन्हाळ कांद्याचे क्षेत्रदेखील वाढेल. शेतकऱ्यांनी त्यासाठी रोपे घेण्याची तयारीही चालवली आहे."-अरविंद आढाव, कृषी सहायक, येवला

■ अशी होईल रब्बीची पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक - सर्वसाधारण क्षेत्र - गेल्या वर्षीची पेरणी

ज्वारी - ७४१ - १४२

गहू - ६०८७ - ८२७१

मका - ३७१ - १३९२

हरभरा - ३७६७ - ४०८४

कांदा - ११५२५ - ----

एकूण - १०९६८ - १३८८९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT