saptashrungi Devi temple wani
saptashrungi Devi temple wani esakal
नाशिक

श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती : आदिमाया ते नाथ अन् संत वाङ्‍मय

महेंद्र महाजन

नाशिक :

कुळधर्मु चाळीं। विधिनिषेध पाळीं।

मग सुखें तुज सरळी। दिधली आहे॥

ज्ञानेश्‍वरीमधील बाराव्या अध्यायातील ११६ वी ही ओवी आहे. परंपरेने आलेले कुलधर्म, कुलाचार हे आचरण केल्याने सुख प्राप्त होते. ही संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींची मांडणी आहे. अन्य मार्ग स्वीकारत असताना कुलस्वामिनीची उपासना सोडू नये. म्हणजेच, ज्ञानोबा माउलींनी कुलदेवता पूजनाचा स्वीकार केला आहे.

मुळातच, आदिनाथांपासून संत निवृत्तिनाथांपर्यंत नाथ परंपरा आली. त्याची दीक्षा ज्ञानोबा माउलींनी घेतली. पुढे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्तिमार्गाचा प्रचार अन् प्रसार जनसामान्यांपर्यंत केला. हे काम करत असताना नाथ संप्रदायातील तंत्रशास्त्र, कुलधर्म, कुलाचाराचा निषेध न करता समन्वय साधून भक्तिमार्ग हा परंपरेतून पुढे आणला. (Sri Saptashring Niwasini Adimaya Adisakti Literature Nashik Latest Marathi News)

श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती महिषासुरमर्दिनी भगवती मूर्तीच्या संवर्धन कामानिमित्त धार्मिक विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असताना नाशिकचे स्मार्त चुडामणि शांतारामशास्त्री भानोसे यांनी केलेल्या अभ्यास अन् संशोधनातून ही माहिती पुढे आली. श्री. भानोसे म्हणाले, की त्र्यंबकेश्‍वर येथे समाधी घेण्यास जाण्यापूर्वी संत निवृत्तिनाथ श्री सप्तशृंग निवासिनी गडावर गेले होते. नामदेव गाथेतील समाधी प्रकरणात त्यासंबंधीचे वर्णन मिळते. ते असे :

सप्तशृंगी आले देवसुरगण। उतरिली विमाने नामा म्हणे।

देवी देवेश शिवी शिवेश। अगम्य सुरस आदिमाया।।

सप्तशृंगालागी केली प्रदक्षिणा।। आता नारायणा सिद्ध व्हावे।।

मार्गी आदिमाया पूजिली आनंदी। म्हणती धन्य मांदी वैष्णवांची।।

श्री सप्तशृंगगडावर संत निवृत्तिनाथ तीन दिवस राहिले. देवदेवतांचे कुलधर्म, कुलाचार करून गडाला त्यांनी प्रदक्षिणा घातली. मग संत निवृत्तिनाथ हे समाधीसाठी प्रस्थानकर्ते झाले. याही अगोदर ज्ञानोबा माउली आणि भावंडांनी संतांसह भगवतीचे दर्शन घेतल्याचे उल्लेख आहेत. संत ज्ञानोबा माउली आणि भावंडांची भगवती कुलस्वामिनी होती, असेही श्री. भानोसे यांनी सांगितले.

श्री सप्तशृंगगडाचा ज्ञानेश्‍वरीतील उल्लेख

ज्ञानेश्‍वरीमधील श्री सप्तशृंगगडाच्या उल्लेखाबद्दल सांगताना श्री. भानोसे म्हणाले, की ज्ञानेश्‍वरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी आपली नाथ आणि गुरुपरंपरा सांगत असताना श्री सप्तशृंगगडाचा उल्लेख केला आहे. ज्ञानेश्‍वरीमधील अठराव्या अध्यायातील एक हजार ७५३ वी ओवी याप्रमाणे :

तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं। भग्नावयवा चौरंगी।

भेटला कीं तो सर्वांगीं। संपूर्ण जाला॥

अर्थात, आदिनाथांकडून मच्छिंद्रनाथापर्यंत ही गुरुपरंपरा लाभली. मच्छिंद्रनाथांपासून गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ आणि चौरंगीनाथ अशी गुरुपरंपरा सांगत असताना ज्ञानोबा माउलींनी सप्तशृंग कुलदेवतेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील भक्तजन सप्तशृंग भगवतीला कुलदैवत मानू शकतात.

तो हा तूं घेऊनि आघवा। कळीं गिळितयां जीवां।

सर्व प्रकारीं धांवा। करीं पां वेगीं॥

ज्ञानेश्‍वरीमधील अठराव्या अध्यायातील ही ओवी. त्याअनुषंगाने सांगताना श्री. भानोसे म्हणाले, की संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउली यांनी आदिमाया, आदिगुरू श्री शंकरांपासून आमच्यापर्यंत आलेल्या परंपरेला बोध झाला, असे म्हटले आहे. त्याचे सार काय आहे? कलियुगातील जे जीव असतील, त्या जीवांचा उद्धार होण्यासाठी श्री सप्तशृंग भगवतीला शरण गेले पाहिजे.

वारकरी संप्रदायाच्या आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून व कुलदेवता उपासनेतून पुढे जायला हवे. महर्षी पाणिनी यांनी सांगितलेल्या ‘वंशोद्विविधा विदयाजन्मनाच’ या सूत्रानुसार गुरू-शिष्य परंपरा हादेखील एक वंश आहे. एखाद्याला आपल्या परंपरेप्रमाणे कुलदेवता माहिती नसेल, तर गुरुपरंपरेतील गुरूंची कुलदेवता आपल्या कुळातील कुलदेवता आहे, या भावाने ती स्वीकारली पाहिजे.

"संत निरंजन रघुनाथ हे गिरनार पर्वताकडे श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी निघाले असताना श्री सप्तशृंग निवासिनी गडावर आले होते. त्यांनी सप्तशृंग स्तवन करत आरती केली. तसेच कवी त्रिंबक यांनी तुळजापूरला सात वर्षे तप केले. त्या वेळी त्यांना तुळजापूरच्या भवानीमातेचा दृष्टान्त झाला, की माझे मूळस्थान सप्तशंगगडावर आहे, तिथे जा. त्यानुसार तेही गडावर आले होते. यासंबंधीच्या नोंदी दोघांच्या आत्मकथनांमधून मिळतात. दासगणू महाराजांसह अनेक संत-महात्मे दर्शनासाठी गडावर येऊन येऊन गेले आहेत."

-शांतारामशास्त्री भानोसे, स्मार्त चुडामणि, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: पॉवर-प्ले कोलकाताच्या गोलंदाजांनी गाजवला, सलामीवीरांनंतर शाय होपदेखील परतला पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT