वाडीवऱ्हे : कुशेगाव (ता. इगतपूरी) येथे २००७मध्ये पाटबंधारे खात्याने पाझर तलाव बांधला. त्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांची वीस एकर जमीन संपादित करण्यात आली. या पाझर तलावाला सतरा वर्ष झाली, तरीही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.
त्यामुळे, संतप्त प्रकल्पबाधीत महिलांनी धरणावर जाऊन ठिय्या आंदोलन केले. मात्र, पाटबंधारे विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने त्यांना भेट देण्याचेही सौजन्य दाखवले नाही.
या वेळी ‘जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत या शेतकरी महिलांनी निदर्शने केली. दरम्यान, शासनाने जमिनीचा मोबदला न दिल्यास पाझर तलावात जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा संतापलेल्या शेतकरी कुटुंबांनी दिला आहे.
उत्पन्नाचे एकमेव साधन असलेल्या जमिनी धरणासाठी संपादित केल्याने येथील आदिवासी शेतकरी उपासमारीने होरपळून निघत आहेत. धरणात संपादित केलेल्या वीस एकर क्षेत्रात या शेतकऱ्यांचे भात, नागली, भुईमूग शेती हे आर्थिक उत्पन्नाचे एकमेव साधन होते.
''पाझर तलावाला सतरा वर्ष झाली. देखभाल नसल्याने धरणाला गळती लागली आहे. पाटबंधारे विभागाने दुरुस्तीसाठीही अद्याप भेट देऊन निधीची तरतूद केलेली नाही. पाझर तलावांचे दगडी बांधकाम केलेले नसल्याने व देखभालीअभावी खालून पाणी झीरपत आहे.
परिणामी, बांध फुटण्याची शक्यता आहे. पाझर तलावाच्या सांडव्यात सिमेंटचे बांधकाम केलेले आहे. त्या खालील माती धुवून गेल्याने अतिरिक्त पाणी वाहून जाते. त्यामुळे धरणाची साठवण क्षमताही कमी झाली आहे. पाण्याचा अपव्यय होत आहे.'' -रोहिदास सोनवणे, ग्रामस्थ, कुशेगाव
''माझी पाच एकर जागा या पाझर तलावात गेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत मला जमिनीचा मोबदला मिळाला नाही. निवडणुका आल्या की हे लोक येतात. आमच्या समस्या कोण जाणून घेईल? आम्हाला आर्थिक मदत कोण देईल? आदिवासी शेतकऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. भात जमीन आमच्याकडून हिरावून घेऊन आमचे आर्थिक उत्पन्न बंद केले आहे.'' -सोमिबाई पारधी, प्रकल्पग्रस्त
प्रकल्पबाधीत शेतकरी
* सोमिबाई सोमा पारधी : पाच एकर
* गंगाराम सोमा सराई : सोळा गुंठे
* मंगळू मंगा सराई : दहा गुंठे
* दामू गांगड : सोळा गुंठे
* पांडू सराई : बारा एकर
* शंकर पारधी : आठ एकर
* सकु सराई : दोन एकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.