सिन्नर (जि. नाशिक) : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने इंधन विक्रीसंदर्भात पेट्रोलपंपचालकांना निर्बंध घालून देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनाखेरीज अन्य कोणत्याही प्रवासी वाहन अथवा दुचाकीस इंधन देण्यास जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना सिन्नर तालुक्यातील खोपडी व पाथरे येथील दोन पेट्रोलपंपांवर सर्रासपणे इंधन विक्री केली जात असल्याचा प्रकार वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांच्या पथकास आढळला. दोन्ही पेट्रोलपंपचालकांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (Two petrol pump operators were charged under the Disaster Management Act)
अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणेनिहाय स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. साध्या वेशातील कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पेट्रोलपंपावरून होणाऱ्या नियमबाह्य इंधन विक्रीबाबत शहानिशा करणार आहेत. रविवारी (ता. १७) रात्री वावी सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना डमी ग्राहक बनवून साध्या वेशात खोपडी शिवारातील दत्त मंदिराजवळ धन्वंतरी पेट्रोलपंपावर दुचाकीवरून पाठवले. या कर्मचाऱ्यांनी तेथे ५० रुपयांच्या पेट्रोलची मागणी केल्यानंतर त्यांना इंधन देण्यात आले. त्यानंतर तेथे पोचत कोते यांनी इंधन विक्रीचे रजिस्टर तपासले. कोणतीही खातरजमा न करताच बनावट ग्राहक म्हणून आलेल्या पोलिसांना इंधनाची विक्री करण्यात आल्याचे उघड झाले. दुसऱ्या प्रकारात पाथरे येथील साईलक्ष्मी पेट्रोलपंपावरदेखील अशाच पद्धतीने इंधन विक्री होत असल्याचे आढळले. सोमवारी दुपारी शिर्डी महामार्गावरील जिल्हा चेकपोस्टची तपासणी करून झाल्यावर जवळच असलेल्या पेट्रोलपंपावर श्री. कोते यांनी भेट दिली. तेथे प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये इंधन विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. पेट्रोलपंपांवर नियमबाह्य इंधन विक्री केल्याचे आढळल्यास संबंधित पेट्रोलपंपचालकास दहा हजारांचा दंड करण्यात येणार आहे. वावी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल तहसीलदारांना देण्यात आला. महसूल विभागाचे पथक पेट्रोलपंपांवर झालेल्या इंधन विक्रीची व शिल्लक इंधन साठ्याची तपासणी करून दंडात्मक कारवाई करणार आहे.
शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टरला इंधन लागते. इंधन द्यायला पेट्रोलपंपचालक नकार देतात. ग्रामीण भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. चार किलोमीटर अंतरावरून दूध विक्रीसाठी आणावे लागते. अशावेळी दुचाकीला पेट्रोल नसेल तर करायचे काय, असा प्रश्न आहे. प्रशासनाचे कठोर निर्बंध जनतेच्या हितासाठीच असले तरी शेतकऱ्यांची परवड होणार नाही याकडेही लक्ष द्यावे.
-मच्छिंद्र चिने, माजी सरपंच पाथरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.